लहान मुलांमध्ये दिसणारी न्यूमोनियाची लक्षणे काय?; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्यात वातावरणात होणारे बदल लहान मुलांच्या आरोग्याला नुकसान पोहचवतात. दरम्यान मुलांना ताप, सर्दी असे आजार होतात. दिसताना सर्वसामान्य वाटणारे हे आजार गंभीर स्वरूपाचे कधी होतात समजत नाही. सुरुवातीला सामान्य समजून या आजाराकडे दुर्लक्ष करणे मुलांच्या आरोग्याचे नुकसान करते. कारण यामुळे मुले न्यूमोनियाच्या विकाराने ग्रासण्याची शक्यता असते. वेळेपूर्वीच दक्षता बाळगल्यास न्यूमोनियाला प्राथमिक टप्प्यावरच प्रतिबंध करता येतो. मात्र यासाठी लहान मुलांमध्ये दिसणारी लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे.
० न्यूमोनिया म्हणजे काय?
– न्यूमोनिया हा एक श्वसन विकार आहे. न्यूमोनियाच्या तीव्र संसर्गामुळे फुप्फुसांना बाधा होते. न्यूमोनियाच्या संसर्गामुळे फुप्फुसाला सूज येते. मानवी शरीरातील फुप्फुसात द्रव पदार्थाचा संचय झाल्याने विकाराची तीव्रता अधिक वाढते. याचा थेट परिणाम शरीरातील ऑक्सिजनच्या वहनावर होतो. परिणामी श्वसन मार्गात अडथळा येतो.
० न्यूमोनियाची लक्षणे
प्राथमिक लक्षणे – रुग्णांना सर्दी,
ताप,
खोकला,
श्वास घेण्यास त्रास,
फुप्फुसांचा दाह जाणवतो.
– प्राथमिक स्वरुपात न्यूमोनियाची लक्षणे मुलांमध्ये दिसून येत नाहीत.
– वैद्यकीय चाचण्यांना सामोरे गेल्याविना हि लक्षणे स्पष्ट होत नाहीत.
– न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर काही वैद्यकीय चाचण्यांच्या आधारावर न्यूमोनियाचे स्तर स्पष्ट होतात. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
० न्यूमोनियाच्या चाचण्या
– न्यूमोनियाची तीव्रता जाणून घेण्यासाठी छातीचा एक्स-रे काढला जातो.
– यासह मानवी रक्ताचे परिक्षण केले जाते. यातून शरीरातील ऑक्सिजन व कार्बन-डायऑक्साईडचे प्रमाण दिसून येते.
– फुप्फुसांच्या निरोगी असण्याचे मापन करण्यासाठी संसर्गाची चाचणी,
पल्स ऑक्सिमेट्री (रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण),
छातीचा सीटी स्कॅन या चाचण्या कराव्या लागतात.
० न्यूमोनियाचे स्तर –
स्तर १ – संसर्ग होण्याआधीच्या २४ तासांच्या कालावधीत विषाणूंचा फुप्फुसात प्रवेश होतो. या विषाणूंशी रक्तातील पांढऱ्या पेशी सामना करतात. अधिक रक्ताच्या मागणीमुळे पेशींना सुज येते आणि फुप्फुसांना लाल रंग प्राप्त होतो.
स्तर २ – विषाणू संसर्गाच्या ४८ – ७२ तासांचा कालावधीमध्ये फुप्फुसाला शुष्कता प्राप्त होते. ही अवस्था २-८ दिवस राहते.
स्तर ३ – विषाणूच्या संसर्गाची सर्वाधिक तीव्रता तिसऱ्या स्तरात दिसते. यात फुप्फुसांचा रंग लाल वा जांभळा होतो. शरीरातील लाल रक्त पेशींचे मोठ्या प्रमाणात तीव्र विघटन होते.