‘लिव्हर सिरॉसिस’ म्हणजे काय?; जाणून घ्या कारणे, लक्षणे आणि उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। यकृत म्हणजेच लिव्हर. हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण, यकृत खाल्लेले अन्न पचायला मदत करते. शिवाय शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासदेखील मदत करते. इतक्या महत्वाच्या अवयवाशी संबंधित असणारा आजार ‘लिव्हर सिरॉसिस’ यावर वेळीच उपचार केले नाहीत तर याचे स्वरूप गंभीर होऊ शकते. म्हणून आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत.
० ‘लिव्हर सिरॉसिस’ म्हणजे काय?
– ‘लिव्हर सिरॉसिस’ हा आजार यकृताशी संबंधित आजार आहे. या आजारामध्ये यकृताच्या ऊतींवर सर्वाधिक परिणाम होतो आणि त्यामुळे यकृताचे कार्य थांबते. हि स्थिती या या आजाराचा शेवटचा टप्पा आहे. यामध्ये लिव्हर टिश्यू काम करणे बंद करतात आणि जखमी होतात. यामुळे, विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं वा पचन आणि प्रोटीन्स तयार करण्याचं काम होत नाही. जाणून घ्या कारणे आणि लक्षणे खालीलप्रमाणे:-
० ‘लिव्हर सिरॉसिस’ होण्याची कारणे –
१) खाण्या- पिण्याकडे दुर्लक्ष करणे.
२) चुकीच्या वेळी चुकीचे पदार्थ खाणे.
३) अतिशय प्रमाणात अल्कोहोलचे सेवन करणे.
४) यकृताचे तीव्र विषाणूजन्य संक्रमण (हिपॅटायटीस बी आणि हिपॅटायटीस सी)
५) फॅटी लिव्हर
६) यकृताचे आजार
७) लठ्ठपणा
८) चरबीचे प्रमाण वाढणे.
९) शरीरातील पाण्याची कमतरता
१०) तीव्र मधुमेह प्रकार २
० ‘लिव्हर सिरॉसिस’ची लक्षणे –
१) शारीरिक थकवा
२) मूत्र – मलवाटे रक्तस्त्राव वा जखम
३) भूक न लागणे
४) पाय वा घोट्यात सूज येणे (एडेमा)
५) अचानक वजन कमी होणे
६) अंगावर खाज सुटणे
७) त्वचा आणि डोळ्यांमध्ये पिवळा रंग येणे (कावीळ)
८) ओटीपोटात द्रव साठणे (जलोदर)
९) तळव्यामध्ये अति लालसरपणा
१०) स्त्रियांसाठी – मासिक पाळीची अनुपस्थिती. (रजोनिवृत्तीशी संबंधित नाही)
११) पुरुषांसाठी – सेक्स ड्राइव्ह कमी होणे. स्तन वाढणे (गायनेकोमास्टिया) वा टेस्टिक्युलर ऍट्रोफी.
० ‘लिव्हर सिरॉसिस’ची उपाय –
१) कॉफी प्या.
– कॉफी लिव्हर एंझाइमचे उत्पादन उत्तेजित करते. यामुळे लिव्हरची सूज बरी करण्यासाठी कॉफी फायदेशीर आहे. शिवाय कॉफी नियमित प्यायल्याने लिव्हरचं नुकसान होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. दरम्यान शरीराला अपाय न करता उपाय म्हणून ब्लॅक कॉफी प्या. कारण यात जास्त साखर नसते.
२) मीठ कमी खा.
– लिव्हर सिरॉसिसमध्ये शरीरात द्रवपदार्थ टिकून राहतात. यामुळे मीठाचं सेवन कमी करा. तसेच ज्या पदार्थांमध्ये मीठ जास्त असतं जसं की, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूड कमी खा.
३) भाज्या खा.
– दैनंदिन आहारात सेंद्रिय भाज्या खा. जर तुम्ही जास्त केमिकल, विषारी पदार्थ आणि कीटकनाशके मिसळलेल्या गोष्टी खाल्ल्या तर लिव्हरला धोका निर्माण होतो. यासाठी कोबी, हिरव्या पालेभाज्या खा. या भाज्या यकृतासाठी फायदेशीर आहेत. पुदिना, ओवा, तुळस हे पदार्थ देखील लिव्हरची फायदेशीर आहेत.
४) दारू पिणे टाळा.
– यकृताच्या आरोग्यासाठी दारूचे व्यसन सोडा. निश्चितच शरीराच्या सवयीप्रमाणे दारू पूर्णपणे सोडणे कठीण होऊ शकतं. म्हणून किमान दारू सोडता आली नाही तर कमी प्या. म्हणून लिव्हरसाठी फायदेशीर आहार घ्या.
५) वाढलेले वजन कमी करा.
– लठ्ठपणा यकृताचे आजार वाढण्याचं कारण आहे. लठ्ठपणामुळे नॉन अल्कोहलिक लिव्हर डीसिज होतात. यामुळे तुमची सिरॉसिसची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. म्हणून वजन नियंत्रणात आण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.