‘हे’ व्यायाम कराल तर गुबगुबीत मान होईल चरबीमुक्त; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुंदर चेहरा, लांबसडक केस, चाफेकळी नाक, लक्षवेधी नजर हि सर्व सौंदर्याची लक्षणे आहेत, असे अनेक लोक सांगतात. त्यामुळे आपण नेहमी आपली प्रतिभा उंचावण्यासाठी या सर्व विशेषणांमध्ये बसण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. मग मानेवर वाढलेले मांस दिसणारी चरबी कशी काय आपल्याला सहन होईल? बॉडी फिटनेसकडे लक्ष देणाऱ्या लोकांना शरीरावर अनावश्यक वाढलेली चरबी लगेच खटकते आणि मान हा भाग असा आहे जिथे चरबी जमा झालेली लगेच दिसते.
मानेभोवती वाढलेल्या चरबीमुळे हनुवटीच्या खाली चरबी जमा होते. यामुळे आपला संपूर्ण लुक खराब होतो. पण लक्षात ठेवा की, तुमच्या हनुवटीच्या खाली चरबी असली वा नसली तरीही तुम्ही सुंदर तसेच स्मार्ट आहात. त्यामुळे या चरबीमुळे तुम्हाला तुमचा आत्मविश्वास गमावण्याची गरज नाही. पण मानेच्या चरबीचा आरोग्याशी देखील संबंध आहे त्यामुळे व्यायामाची आवश्यकता आहे. म्हणून मानेवरील चरबी घटवण्यासाठी काही सोप्पे व्यायाम करणे गरजेचे आहे. अनेकदा आपले साधारण वजन जास्त नसले तरीही मानेवर साचलेली चरबी तुम्हाला जाड असण्याचा अनुभव देते. यासाठी ज्या लोकांना गुबगुबीत मानेची समस्या आहे त्यांनी चिंता करत राहणे आम्हाला मुळीच पटत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला मानेची चरबी कमी करून मान बारीक आणि आकर्षक दिसायला मदत करेल असे व्यायाम सांगणार आहोत. जे तुम्ही बसल्या बसल्या केलात तरीही लगेच फरक जाणवेल. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) फेस लिफ्ट मसाज – यासाठी तुम्ही खुर्चीवर अगदी आरामात बसा. आता फेस मिस्ट घ्या आणि त्यात फेस ऑइलचे २-३ थेंब मिसळा. आता ते हातावर ठेवा आणि चांगले स्मॅश करा. यानंतर तुमचा अंगठा हनुवटीवर ठेवा आणि पहिले बोट हलवून तोंडाजवळ आणा. आता काळजीपूर्वक दाब द्या आणि कानाकडे हात हलवा. क्षणभर थांबा. आता तीच प्रक्रिया पुन्हा करा. दिवसातून असे २० वेळा दररोज न चुकता करा. यामुळे अगदी २ आठवड्यात फरक जाणवेल.
२) चुंबनाचा आकार – आरामात बसा आणि कॉलर बोनच्या खाली आपल्या छातीवर आपला तळवा ठेवा. यानंतर मान वरच्या बाजूला करा आणि छताकडे पहा. यानंतर तोंड उघडा आणि ओ बनवा. आता आपले तोंड बंद करा आणि छताला चुंबन घेण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपले डोके खाली आणा आणि पुन्हा एकदा हे ५ वेळा करा. शिवाय उजवीकडे पाहून मान ताणण्याचा प्रयत्न करा.
३) नेक पुश स्माईल – आधी खुर्चीत आरामात बसा. यानंतर आपल्या कंबरेला आधार देण्यासाठी एक उशी घ्या. आता सरळ बसा आणि तुमचे बोट तुमच्या हनुवटीवर ठेवा. यानंतर हनुवटी बाहेर झुकवा. पुढे हाताच्या मदतीने हनुवटी दाबा आणि ओठ उघडून स्मितहास्य करा. सुमारे ३ सेकंद ह्या स्थितीत राहून दिवसातून १५ वेळा व्यायाम करा.
४) पर्स्ड नेक आणि लिप स्ट्रेच – यासाठी उभे रहा आता छताकडे पहा. यानंतर आपले ओठ बाहेर आणा आणि आपण छताचे चुंबन घेत आहोत असा प्रयत्न करा. ही स्थिती किमान १० सेकंद कायम ठेवा. हा व्यायाम दिवसातून २ वेळा करा.
५) एक्सटेंड नेक फेस – आरामात बसा आणि छताकडे पहा. आता तुमचे तोंड पूर्णपणे उघडा आणि नंतर बंद करा. त्याच प्रकारे, एका वेळी १५ वेळा तोंड उघडबंद करा. दिवसातून दोनदा हा व्यायाम करा.
६) चूळ भरण्याचा व्यायाम – पाय वाकवून जमिनीवर वा चटईवर व्यवस्थित बसा. तुमची टाच तुमच्या नितंबांना स्पर्श करेल अशा स्थितीत या. तुमच्या तोंडात पाणी भरले आहे आणि तुम्ही एका गालाच्या बाजूला पाणी फिरवत आहात असे स्वतःला भासवा. आता दुसरी बाजू त्याच प्रकारे करा. असे दिवसातून दोनदा आणि एका वेळी २० वेळा करा.