गहु नका खाऊ सांगणाऱ्यांचे सल्ले ऐकालं तर आरोग्याचे होईल नुकसान; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण अनेकदा ऐकले असेल कि, गव्हामुळे कॅलरी वाढतात. गहू खाल्ला कि वजन वाढते. त्यामुळे आहारातून गहू वगळून ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी खावी. मित्रांनो तुम्हाला जर यात तथ्य वाटत असेल आणि जर तुम्ही असे करत असाल तर तुम्ही स्वतःच स्वतःच्या आरोग्याचे नुकसान करून घेताय. कारण गव्हातील पोषणमूल्ये आणि त्याचे फायदे तुम्हाला ठाऊक नाहीत. परिणामी तुम्ही ते खाणे बिंधास्त टाळत आहात. चला तर आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पोषणमूल्यांची माहिती देतो म्हणजे तुमचं टेंशन मिनिटांत दूर होईल आणि गहू खाऊ नका सांगणाऱ्यांपासून तुम्ही लांब रहालं.
गव्हाचे पीठ आपल्या भारतीय आहारातील मुख्य पदार्थ आहे. गव्हाचे पीठ किंवा गव्हाचा दलिया या स्वरुपात गहू खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला त्याचे फायदे मिळतात. मात्र गव्हापासून तयार होणाऱ्या मैद्यातून शरीराला फक्त ऊर्जा मिळते. गव्हातील इतर फायदे मैद्यामुळे मिळत नाही. त्यामुळे तो शरीरासाठी चांगला नसतो. त्यामुळे मैदा जरूर खाणे टाळा. पण अख्खा गहू किंवा दलिया खाणे आरोग्यासाठी फायदेशरी आहेत. यातून आवश्यक कॅलरी आणि ऊर्जा शरीराला मिळते. यामुळे हृदयरोग, मधुमेह, हाडांचे त्रास होत नाहीत.
गव्हात कर्बोदकांचे प्रमाण इतर धान्यांपेक्षा जास्त असते. त्यामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळण्यासाठी गहू खाणे फायदेशीर आहे. याबरोबरच गव्हामध्ये तंतूमय पदार्थ, खनिजे, अँटीऑक्सिडंटस, जीवनसत्त्वांचे प्रमाणही पुरेसे असते. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी गहू एक चांगला पर्याय आहे. मात्र कोणतीही चांगली वस्तू हानिकारक नसते असे आमचे अजिबात म्हणणे नाही. त्यामुळे गहू देखील प्रमाणात खायला हवा. त्यासोबत इतर धान्यांचाही आहारात आवर्जून समावेश करा.
गव्हामध्ये असणाऱ्या फायबरमुळे अपचन, बद्धकोष्ठता यांसारखे त्रास दूर होण्यास मदत होते. याशिवाय गव्हामध्ये व्हिटॅमिन बी ९ म्हणजेच फॉलेटचे प्रमाण जास्त असते. याचा आपल्या शरीरातील रक्तात असणाऱ्या लाल रक्तपेशींच्या वाढीसाठी चांगला उपयोग होतो.
चपातीसाठी आपण कणिक मळताना, घडी करताना आणि भाजल्यावर वरून तेलाचा वापर करतो. तर भाकरीसाठी तेलाचा उपयोग होत नाही. म्हणून अनेकदा उत्तम आणि पौष्टिक आहार म्हणून भाकरीकडे बोट दाखवले जाते. मात्र पोळीपेक्षा भाकरीचा आकार जास्त मोठा असतो वा भाकरीसाठी जास्त पीठ वापरलेले असल्याने त्याचा म्हणावा तसा आरोग्याला फायदा होत नाही याकडे आपले लक्ष जात नाही. त्यामुळे तुम्ही भाकरी खाणार असाल तर ती पोळी इतकी पातळ आणि लहान आकाराची असेल याची काळजी घ्या. शिवाय कोणत्याही धान्यातून मिळायचे तेव्हढे कॅलरी मिळतातच. त्यामुळे पोळीपेक्षा भाकरी अव्वल असे काहीही नाही.
गव्हामध्ये ग्लुटेन असते. पोटाचे विकार असणाऱ्यांमध्ये ग्लुटेन पचवण्याची क्षमता कमी असते. त्यांना गव्हाची पोळी वा अन्य पदार्थ खाल्ल्यास त्रास होतो. अशावेळी गव्हाचे पदार्थ जरूर खाणे टाळा. त्यामुळे पोटाला आराम मिळेल. अश्या रुग्णांनी गहूऐवजी आपण राहतो त्याठिकाणी जे धान्य पिकते त्याचा वापर आहारात करा. जसे कि, मराठवाड्यामध्ये ज्वारी, बाजरी पीकते तर कोकणात तांदूळ जास्त पिकतो.