एकुलत्या एक हृदयाची लेकरासारखी घ्या काळजी; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। गुंतता हृदय हे.. कमल दलाच्या पाशी… हृदयी वसंत फुलताना… दिल तो है दिल.. दिल का ऐतबार क्या कीजे.. मित्रांनो तुमच्या कधीतरी हे निदर्शनास आलंय का? कि या प्रत्येक गाण्यात आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाच्या अवयवाचा उल्लेख आहे. ज्याला इंग्रजीत हार्ट, हिंदीत दिल आणि मराठीत हृदय असे म्हणतात. हे हृदय आपल्या आयुष्यात कितीतरी गुंते वाढवतं न्हाई..? आता बघा ना.. भावनांचा गोंधळ हृदयातून सुरु मेंदूपर्यंत थेट आणि मोठ्या आजारांची सुरुवात हृदयापासून सुरु थेट आरोग्याची वाट. हो कि नाही? म्हणूनच आपल्याला आपल्या हृदयाची किमान ते कमाल अशी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आपले मुलं आजारी असेल तर तुम्ही काय करता? त्याची काळजी घेता ना? इतकाच काय आपलं मुल आजारी पडू नये म्हणूनदेखीलतुम्ही काळजी घेता. मग हृदयाची काळजी का घेत नाही? आजकालची बदललेली जीवनशैली, चुकीची आहार पद्धती आणि व्यायामाचा अभाव यामुळे आपले हृदय वारंवार आजारी पडत असते. याचे काही संकेत आपले शरीर देत असूनही आपण याकडे दुर्लक्ष करतो. परिणामी, आपले हृदय खूप आजारी पडते आणि यामुळे हृदयाचे विकार होतात. यापासून वाचायचे असेल तर खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. जाणून घ्या:-
१) नियमित व्यायाम करा – दररोज किमान ४५ मिनिटे ते १ तास व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये योगा, एरोबिक्स, पळणे, चालणे, पोहणे, सायकलिंग करणे, दोरी उड्या, जिमनेस्टीक यांपैकी कोणताही प्रकार करू शकता. याशिवाय ट्रेकिंगला जाणे, मैदानी गेम खेळणे हेदेखील तितकेच आवश्यक आहे. यामुळे ताणतणाव दूर होतो आणि शारीरिक हालचाल उत्तम रित्या झाल्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येत नाही. परिणामी रक्ताभिसरण व्यवस्थित झाल्यामुळे हृदयाचे रक्षण होते.
२) सकस व पौष्टिक आहार घ्या – आपल्या दैनंदिन आहारात तेलकट, मसालेदार, चटपटीत पदार्थ खाण्याऐवजी भाज्या आणि फळांचा समावेश करा. सोबत कर्बोदकं, फॅटस, प्रथिनं यांचं प्रमाण संतुलित ठेवा. आहारात तेल, मीठ, साखर यांचे प्रमाण कमी करा. यामुळे पचनास त्रास होत नाही आणि चयापचय सुरळीत राहिल्यामुळे नसा ब्लॉक होय नाहीत. परिणामी हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे घरी तयार केलेला सात्विक आणि संतुलित आहार घेणे कधीही फायदेशीर आहे.
३) धूम्रपान करणे टाळा – आजकाल पुरुष काय आणि स्त्रिया काय? दोन्ही वर्गांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण अधिक आहे. यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडते. त्यात हदयावर अँंजिओप्लास्टी सारख्या शस्त्रक्रिया झाल्या असतील आणि धूम्रपान करत असाल तर शस्त्रक्रिया व उपचारांचा काहीच फायदा होत नाही. धूम्रपान करण्याची सवय जुनी असल्यास तुटत नसेल तर तज्ञांचा सल्ला घ्या. पण हि सवय सोडा अन्यथा हृदयाचे गंभीर आजार होतील.
४) वेळोवेळी आरोग्य तपासणी करा – मित्रांनो आपल्याला कधी काय होत आहे? हे आपल्याला कळेलच असे नाही. अनेक आजारांचे संकेत लक्षात न आल्यामुळे मृत्यू येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मधुमेह, कर्करोग, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित कोणताही आजार वेळीच समजण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे. यात वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर वर्षातून एकदातरी हदयाचे आरोग्य तपासणार्या चाचण्या अवश्य करा. यात इसीजी, इकोडायोग्राफी, ट्रेडमिल टेस्ट या चाचण्यांचा समावेश होतो.