चवीसोबत उत्तम पोषण हवे असेल तर आहारात ऑलिव्ह ऑइल जरूर वापरा; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर आपला आहार उत्तम असेल तर आपले आरोग्य निश्चितच निरोगी राहील. खरंतर हि सांगायची गोष्ट नाही. कारण याबाबत आपण सारेच जाणतो. पण यासाठी आपण किती काळजी घेतो? याचा विचार कधी केलाय का? आपल्या आहारात प्रामुख्याने डाळ, भात, भाजी, चपाती हे पदार्थ असतात. प्रत्येक पदार्थाला स्वतःची अशी एक विशेष चव असली तरीही ती वाढविण्यासाठी इतर पदार्थांची आवश्यकता असते. जसे कि तेलाशिवाय फोडणी कशी देणार.? बरोबर ना! प्रामुख्याने आहारात शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल, सोयाबीनचे तेल आणि सूर्यफुलाचे तेल वापरले जाते. आहारातील तेल हा विषय आपणा प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. कारण अमुक तेल खाल्ल्याने आरोग्याला त्रास होतो असे म्हटले जाते. तर तमुक तेल आरोग्यासाठी फायदेशीर असते असेही म्हटले जाते. पण आम्ही सांगू तेलातही एक असा पर्याय आहे जो खरोखरच आरोग्यदायी आहे. तो म्हणजे ऑलिव्ह ऑइल.
ऑलिव्ह ऑईल हे कोणाच्याही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे आहारात या तेलाचा आवर्जून समावेश करा. यामुळे शरीराचे पोषण होण्यास मदत होते. शिवाय पदार्थ चविष्टदेखील लागतात. ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, लोह, ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंटस असतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर असल्याचे तज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे.
ऑलिव्ह ऑईल खाण्याचे 7 फायदे खालीलप्रमाणे:-
1.प्रतिकारशक्तीत वाढ –
संसर्गजन्य आजारांवर रोख लावायचा असेल तर रोग प्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी ऑलिव्ह ऑईल मदतशीर आहे. त्यामुळे आहारात नियमित या तेलाचा वापर केल्यास संसर्गांपासून सुरक्षित राहता येते.
2.ताणतणाव दूर –
ऑलिव्ह ऑईल मेंदूतील सेरोटोनिनची पातळी वाढवते. हे रसायन आपल्या हार्मोन्स आणि मूडवर काम करते. त्यामुळे ऑलिव्ह ऑईल नियमित वापरल्यास मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
3.उच्च रक्तदाबावर नियंत्रण –
आजकाल कमी वयात अनेकांना ब्लडप्रेशरचा त्रास जाणवतो. यासाठी ऑलिव्ह ऑईल उत्तम पर्याय आहे. कारण यातील ओमेगा- ३ रक्तदाब नियंत्रित ठेवते. खास करून उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांसाठी हे ऑइल लाभदायी आहे.
4.मधुमेहात फायदेशीर –
ऑलिव्ह ऑईलमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहींनी आहाराच्या अन्य पथ्यांसोबत आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तब्येतीची गुंतागुंत होणार नाही.
5.बद्धकोष्ठतेत आराम –
ऑलिव्ह ऑईलमध्ये असणाऱ्या मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि व्हिटॅमीन ई, क, लोह आणि ओमेगा- ३, ६ फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्समुळे पचनक्रियेत सुधारणा होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी दिवसातून दोनदा १ चमचा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल रिकाम्या पोटी प्यावे. या तेलाचे सेवन करण्याआधी ४ तास काहीही खाऊ नका.
6.बॅड कॉलेस्ट्रॉल कमी –
ऑलिव्ह ऑईलमध्ये ७५% – ८०% मोनोसॅच्युरेटेड फॅटस असतात. यामुळे चांगले कॉलेस्ट्रॉल आणि HDL नियंत्रणात राहते. कोलेस्टेरॉलच्या तक्रारीमुळे हृदयविकार संभवतो. मात्र ऑलिव्ह ऑइलमुळे हा धोका काही प्रमाणात कमी होतो.
7.वाढत्या वजनावर रोख –
वाढलेले वजन कमी होत नसेल तर आहारात ऑलिव्ह ऑइल खा. कारण ऑलिव्ह ऑईलमध्ये इतर तेलांपेक्षा फार कमी फॅट्स असतात. ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.