उत्तम आरोग्यासाठी मिश्र डाळींच्या हेल्दी रेसिपीजचा आस्वाद घ्या; जाणून घ्या साहित्य आणि कृती
हॅलो आरोग्य ऑनलाईन| विविध डाळी आपल्या आरोग्याला विविध फायदे देत असतात. त्यामुळे आपल्या आहारात डाळींचे विशेष महत्व आहे. अनेक घरांमध्ये फक्त मुगडाळ खाल्ली जाते. तर अनेक घरात फक्त मसूर डाळ. तर अनेक घरात फक्त तुर डाळ. आवड तशी निवड. पण फक्त एकच डाळ वारंवार खाल्ल्यामुळे इतर डाळींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. यामुळे शरीराला इतर डाळींच्या माध्यमातून शरीराला मिळणारे पोषक घटक वगळले जातात. म्हणून प्रत्येक डाळ महत्वाची.
यासाठी तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी मिक्स करून त्याचे विविध पदार्थ बनवून खाऊ शकता. अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे असे मिश्र डाळींचे पदार्थ आवडीने खातात.
० कोणत्या डाळीत कोणते पोषक घटक असतात?
मिश्र डाळीचे पदार्थ
१) सूप – शरीरात थकवा असेल, तोंडाची चव गेली असेल तर अश्यावेळी पौष्टिक मिश्र डाळीचे सूप प्या.
० साहित्य: १ वाटी मिश्र डाळ, १ कांदा बारीक चिरलेला, १ टोमॅटो मध्यम आकाराचा, १ हिरवी मिरची, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १/२ चमचा जिरे, चिमूटभर हिंग, १/४ चमचा हळद, १/२ चमचा धणा पावडर, १/२चमचा गरम मसाला (आवश्यक असल्यास), विविध भाज्या (आवडीप्रमाणे), तेल (आवश्यकतेप्रमाणे), मीठ (चवीप्रमाणे).
० कृती: यासाठी मिश्र डाळी धुवून कुकरमध्ये मीठ न घालता मऊसूद शिजवून घ्या. आता डाळ स्मॅश करुन घ्या. एका कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये जिरे, हिंग, आलं लसूण पेस्टची फोडणी द्या. यावर कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर टोमॅटो घालून सगळे मसाले घाला. चवीनुसार मीठ, भाज्या असल्यास भाज्या (पटकन शिजणाऱ्या भाज्या निवडा) आणि शिजलेली डाळ घालून साधारण २ ते ३ ग्लास पाणी घाला. आता आवडीप्रमाणे कोथिंबीर पेरून मस्त गरम गरम सूप घ्या.
२) डोसा – हेल्दी नाश्ता म्हणून मिश्र डाळींचा डोसा फायदेशीर आहे.
० साहित्य: ३/४ कप तांदूळ, २ चमचे चणा डाळ, १ चमचा उडिद डाळ, १ चमचा मूग डाळ, १ चमचा सालीसकट मूग, १ चमचा तूर डाळ, १चमचा मसूर डाळ, ३ लाल सुक्या मिरच्या, १ चमचा जिरे, चिमूटभर हिंग, मीठ (चवीप्रमाणे), ५ते ७ पाने कडिपत्ता, तेल (आवश्यकतेप्रमाणे)
० कृती: एका भांड्यात सगळ्या डाळी, तांदूळ आणि सुक्या मिरच्या घेऊन त्यात २ कप पाणी घाला. हे मिश्रण ३ ते ४ तास भिजवून ठेवा. नंतर पाणी काढून मिक्सरमधून जाडसर वाटा. आता तयार मिश्रणात जिरे, कडिपत्ता, हिंग, मीठ घाला. यानंतर डोसा पॅनवर तेल लावून डोसा बनवा. नंतर मस्त चटणीसोबत डोसा सर्व्ह करा.
३) अप्पे – साध्या अप्प्यांचा कंटाळा आला कि मिश्र डाळींचे अप्पे जरूर करून पहा.
० साहित्य: २ वाटी जाड तांदूळ, १/२ वाटी चणा डाळ, १ वाटी मूग डाळ, १ वाटी उडिद डाळ, १ टेबलस्पून मेथी, १ बारीक चिरलेला कांदा, ४ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, कोथिंबीर (आवडीप्रमाणे), तेल (आवश्यकतेनुसार), मीठ (चवीप्रमाणे), १ चमचा जीर, १ चमचा मोहरी, चिमूटभर हिंग
० कृती: सर्व डाळी एकत्र करुन स्वच्छ धुवून त्यात थोडे पाणी घालून भिजत ठेवा. नंतर तांदूळ स्वच्छ धुवून भिजवा. साधारण ४ ते ५ तास हे जिन्नस भिजवून ठेवा. यानंतर डाळ -तांदूळ वाटून घ्या. हे मिश्रण आता डोशाप्रमाणे फुगण्यासाठी साधारण ८ ते ९ तास ठेवा. सकाळी पीठ फुगून आल्यानंतर त्यामध्ये कांदा, कोथिंबीर घाला. फोडणी पात्राय तेल घालून जीर, मोहरी, हिंग, मिरची घाला. फोडणी तयार करून अप्पे पिठात एकजीव करुन घ्या. आता अप्पे पात्रात अप्पे बनवा.