पचनाचा त्रास..? मग आहाराबाबत ‘ही’ पथ्ये काटेकोरपणे पाळा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। रोजच्या आहारापेक्षा थोडा वेगळा आहार आणि वेगळे पदार्थ खाल्ले कि अनेकांना अपचनाचा त्रास होतो. शिवाय पोटदुखी, पोट दुखणे, पोटात मळमळणे, पोट फुगणे आणि पोटात गॅस तयार होणे अश्या समस्या देखील जोर धरतात. त्यामुळे आहाराची पथ्ये पाळणे जणू सगळ्यांची ड्युटी झाली आहे. कारण शरीराची चयापचय क्रिया उत्तम न झाल्यास खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. परिणामी पचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात.
खाण्यापिण्याच्या अगदी वेळादेखील बदलल्या तरीही ॲसिडिटी, मळमळ, गॅसेस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता हे त्रास सुरू होतात. ज्या व्यक्तींची चयापचय क्रिया उत्तम असते त्यांना असे त्रास कधीतरीच होतात. पण पथ्य पाळली नाहीत तर असे त्रास कोणत्याही व्यक्तीची पचनशक्ती कमजोर करू शकतात. म्हणूनच आज आपण अशा काही पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित त्रास होत नाहीत.
१. दुधासोबत प्रयोग करू नका.
वारंवार अपचनाचा त्रास होणाऱ्या लोकांनी दुधासोबत विविध पदार्थ मिसळून खाणे बंद करावे. जसे कि, गरम दुधात थंड आईस्क्रिम टाकून खाणे म्हणजेच हॉट चॉकलेट मिल्क विथ आईस्क्रिम. तसेच दूध आणि दही एकत्र खाणे. हे असे प्रकार बंद करा. यामुळे पचनक्रिया बिघडते. याकरिता दूध एकतर गरम प्या नाहीतर थंड प्या. पण गरम दुधात थंड पदार्थ टाकणे किंवा थंड दुधात गरम पदार्थ मिसळून खाणे बंद करा.
२. गहू आणि तीळ एकत्र खाऊ नका.
गहू आणि तीळ हे दोन वेगवेगळ्या गुणधर्माचे पदार्थ आहेत जे एकत्र करून खाल्ल्याने पोटाला त्रास होतो. त्यामुळे अनेकांना संक्रांतीच्या दिवशी केलेली तीळगुळाची पोळी पचत नाही. परिणामी अपचनाचा त्रास होतो. अशावेळी गव्हाची पुरी तिळाच्या तेलात तळणेही टाळा म्हणजे पचनक्रिया बिघडणार नाही.
३. हरभऱ्याचे पदार्थ खाऊ नका.
ज्या लोकांना पचनाचा त्रास होतो त्यांनी हरबरा वा हरभऱ्याच्या डाळीचे पिठ वापरलेले पदार्थ पाहू नये. हरबऱ्याची उसळ, भजे, ढोकळा अशा पदार्थांचे सेवन प्रामुख्याने कमी करा. तसेच हरबरा डाळ आणि मैदा असं कॉम्बिनेशन चुकूनही खाऊ नका.
बऱ्याचदा जेवताना आपण विरुद्ध अन्न खातो. ज्यामुळे आयुर्वेदानुसार आहाराशी संबंधित नियमांची पायमल्ली होते. त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या त्रासांना सामोरं जावं लागतं. म्हणूनच हे काही मोजके नियम लक्षात घेऊन अपचनाचा दूर करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी वरील पथ्ये काटेकोरपणे पाळा.