उष्णतेमुळे तोंडात होणाऱ्या जखमांवर ‘हे’ घरगुती उपाय देतील आराम; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या गरमीचे अर्थातच उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. जसजसा उन्हाळा वाढेल तसतशा आरोग्यविषयक तक्रारी वाढतील. कारण उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान असंतुलित झाले तर आरोग्याच्या तक्रारींना आयते आमंत्रण मिळते. त्यामुळे शरीराची काळजी घेणे हि आपली प्राथमिक गरज आहे. दरम्यान तोंड पोळणे, सालपटणे वा छाले निघणे या समस्येने अनेक लोक त्रासल्याचे दिसून येते. हा त्रास अतिशय वेदनादायक आणि अस्वस्थ करणारा आहे.
तोंड पोळल्यास अन्न गिळायला त्रास होतो. शिवाय कोणताही पदार्थ खाताना जळजळ होते. परिणामी शरीराच्या आणखी आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होतात. म्हणूनच आज आपण तोंड पोळल्यास तोंडातील छाले कमी करण्यासाठी आणि बरे करण्यासाठी करावयाचे प्रभावी असे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. जे केल्याने आराम मिळेल आणि बरं वाटेल. चला तर मग जाणून घेऊया.
१. तुरटीचे पाणी –
तुरटी जखमा भरण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते. त्यामुळे जर तोंडाचे सालपट निघत असेल आणि जखमा होत असतील तर त्या बऱ्या करण्यासाठी तुरटीचे पाणी उपयुक्त ठरेल. यासाठी कोमट पाण्यात तुरटी मिसळून गुळण्या करा. दिवसातून २ ते ३ वेळा असे केल्याने जखम आणि वेदना दोन्ही कमी होतील.
२. हळद –
हळदीतील अँटीसेप्टिक गुणधर्म जंतुसंसर्गाशी लढा देण्याबरोबरच, तोंडातील त्वचेवर होणाऱ्या जखमा, जळजळ आणि वेदना कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच हळदीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात. जे तोंडातील त्वचेची काळजी घेतात. यासाठी तोंडात हळदीची पेस्ट लावून पाण्याने धुवा किंवा हळदीच्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळेल.
३. मध –
मधातील बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म हे जखमा भरून वेदना कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी कापसाच्या मदतीने तोंडातील फोडांवर मध लावा. दिवसातून २ ते ३ वेळा असे केल्यास जळजळ आणि वेदना कमी होतील.
४. कोरफड –
कोरफडीतील अँटिसेप्टिक गुणधर्म तोंडातील छाल्यांपासून त्वरित आराम देतात. त्यामुळे कोरफड त्वचेशिवाय तोंडाचे आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर आहे. यासाठी ताज्या कोरफडीचा रस छाल्यावर लावा. यामुळे जखमा भरून जळजळ कमी होण्यासाठी मदत मिळेल.
या समस्येचे मुख्य कारण पोट खराब होणे हे मानले जाते. पण तोंडातील त्वचा सतत निघत असेल तर व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असू शकते. तसेच व्हायरल इन्फेक्शन, काही औषधांचा प्रभाव आणि उच्च तापमान यामुळे तोंडातील त्वचेचे नुकसान होते. मात्र अशी स्थिती वारंवार होणे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.