| | | |

कोरोना रुग्णांच्या आहारात नक्की काय काय असावं? जाणुन घ्या महत्वाची गोष्ट

हॅलो आरोग्य ऑनलाईन । संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे देशभरात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी, आहार आणि व्यायाम यामुळेच कोरोनावर मात करता येते, असा मागील एक वर्षाचा अनुभव आहे योग्य आहार हाच प्रतिकारशक्ती सर्वात महत्वाचे काम करतो.  त्यामुळेच कोरोना लागण झालेल्या रुग्णांना देण्यात येणारा संतुलित आहाराचे महत्त्व अन्ययसाधारण आहे. जाणून घेवूया कोरोना रुग्णांसाठी आहार कसा असावा ते. कोणत्याही आजारामध्ये विशेषत सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गामध्ये रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होत असते त्यामुळेच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी आहार व व्यायाम दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.

न्याहरी ही अत्यंत आवश्यक बाब आहे कितीही धावपळ असली तरी निरोगी राहण्यासाठी आहारात न्याहरीचे महत्त्व अन्ययसाधारण आहे. यामध्ये पारंपरिक पौष्टिक नाष्टा जसे शिरा, पोहे, उप्पीट आदीचा समावेश असावा. आहारात पुरेसे प्रथिने आणि कोर्बोहायड्रेट यांचे मिश्रण असावे त्याचबरोबर फळे दूध अंडी यांचाही समावेश केल्यास प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. दुपारी सकस आणि संतुलित आहात घ्यावा. रात्रीचा आहार हा हलका असावा त्याचबरोबर आहारात फळाचाही समावेश करावा त्याचबरोबर दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी पिणे आवश्यक आहे.

 

 

काय टाळावे

कोणत्याही आजारामध्ये विशेषत सध्याच्या कोरोना विषाणू संसर्गामध्ये रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी होत असते त्यामुळे शरीराला पोषक असाच आहार असावा याकाळात पॅकबंद सॅक्स, चिप्स बेकरी पदार्थ फास्ट फूड टाळावे त्याचबरोबर पुन्हा पुन्हा तळलेले तेलाचा वापरही करु नये अलिकडे अजिनोमोटो, रंगीत द्रव्ये यांचा वापर वाढता आहे, याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो त्यामुळे याचाही वापर टाळावा.  कार्बनिटेड सॉफ्ट ड्रिंक्सचाही वापर करु नये त्याऐवजी कैरीचे पन्हे, आवळा आणि लिंबू सरबत यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असते यामुळे प्रतिकार शक्ती वाटण्यास मदत होते.  त्याचबरोबर  टरबूजे, खरबूज कलिंगड या फळांचा रस, सरबत घ्यावा, यामध्ये भरपूर कैल्शियम, पोटॅशियम व कॅलरी असते याचा आहारात समावेश करावा.

 

सकारात्मक मानसिकतेसाठी व्यायाम आवश्यकच

कोरोनामध्ये रुग्णास विलगीकरणात रहावे लागते. त्यामुळे त्याच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची शक्यता असते.  सकस आणि परिपूर्ण आहाराबरोबर मानसिक ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.  मोकळ्या हवेत फिरणे,  व्यायाम आणि योगासने याचाही शरीर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो कोणताही आजारामध्ये रुग्णाची मानसिकता सकारात्मक राहण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक असते त्यामुळेच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांनी संतुलित आहारातून प्रतिकार शक्ती वाढविण्याबरोबरच मानसिक आरोग्यही जपणं महत्वाचे आहे. आतापर्यंत भारतात लाखो लोकांनी कोव्हिड-19 वर यशस्वीरित्या मात केली आहे. योग्यवेळी निदान, औषधोपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर लोकांनी कोरोनावर विजय मिळवलाय. कोव्हिड-19 विरोधातील युद्ध जिंकल्यानंतर, खरी लढाई सुरू होते पूर्ववत आयुष्य जगण्याची. पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्याची.

ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर अधिक काळ राहून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांना इजा होण्याची प्रकरणं वाढली आहेत. या रुग्णांना दम लागणे, श्वास घेण्यास अडथळा यांसारखे त्रास सुरू झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील काही कोव्हिडमुक्त रुग्णांना पुन्हा ऑक्सिजनवर ठेवावं लागलं होतं. कोरोनामुक्त झालो म्हणजे गाफिल राहून चालणार नाही. कोरोनामुक्त झालेल्यांनी स्वत:ची विशेष काळजी घेतली पाहिजे.

 

कोव्हिडमुक्त रुग्णांनी काय काळजी घ्यावी?

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, रुग्णालयात राहिल्यानंतर श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणं आणि आजारामुळे शरीरातील ताकद कमी होणं साहजिक आहे. त्यामुळे श्वास घ्यायला खूप त्रास होतो.

त्यामुळे खालील गोष्टी करणं आवश्यक आहे-

1) झोपताना डाव्या कुशीवर झोपावं. डोकं आणि मानेला आधारासाठी डोक्याखाली उशी घ्यावी. पाय गुडघ्यातून थोडे दुमडून घ्यावेत.

2) टेबलवर बसून काम करत असताना श्वास घेण्यास त्रास झाला, तर कमरेतून पुढे वाकून डोकं आणि मान टेबलवर ठेवलेल्या उशीवर ठेवावेत. हात टेबलवर आरामात ठेवावेत. उशी घेतली नाही तरी चालेल.

3) खुर्चीवर बसल्यावर त्रास झाल्यास, थोडं पुढे वाकावं आणि हात मांड्यांवर ठेवावेत.

श्वास कसा घ्यावा?

एका ठिकाणी शांत बसावं. एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवून डोळे बंद करून शांत बसावं. हळूवर नाकाने श्वास घ्यावा आणि तोंडाने सोडावा. नाकाने श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर तोंडाने श्वास घ्यावा. शक्यतो श्वास हळूवार घेण्याचा प्रयत्न करावा.

सोपे व्यायाम – खांदे पुढे-मागे रोल करावेत. उभं राहून किंवा खुर्चीवर बसून डाव्या आणि उजव्या बाजूस थोडं वाकावं. पाय गुडघ्यात वाकवून उचलण्याचा प्रयत्न करावा. याला ‘वॉर्मअप’ असं म्हणतात.

थोडे कठीण व्यायाम- जागच्या जागी चालण्याचा प्रयत्न करावा. बाहेर चालताना शक्यतो सपाट जमीन असेल त्याठिकाणी चालावं. हळूहळू चालण्याचा वेग आणि अंतर वाढवावं.

 

कोव्हिडमुक्त झाल्यावरही शक्यतो बाहेर पडू नये

कोव्हिडमुक्त झालेल्या रुग्णांनी घरी गेल्यानंतरही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कोरोनामुक्त रुग्णांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे बरे झालेल्यांनी शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं. नियमित श्वसानाचे व्यायाम करावेत. योग अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. त्याशिवाय व्हिटॅमीन-सीच्या गोळ्या घेणं गरजेच आहे. जेवताना गरम पाणी प्यावं. पौष्टिक आहार घ्यावा. शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित तपासावी. कुठलाही त्रास जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क करावा.

कोव्हिड-19 आणि परिणाम

कोविड-19 शी झुंज दिलेल्या रुग्णांमध्ये व्यायामाचा ताण सहन न होणे, झोपेचं वेळापत्रक बिघडणे, स्नायूंची हानी, भूक न लागणे असे लक्षणीय बदल आढळून आले आहे. नैराश्य, निद्रानाश यासारखे न्यूरोसायकियॅट्रिक परिणाम गंभीर आहेत. आधीपासून असलेल्या आजारांच पुनर्मूल्यांकन फार महत्त्वाचं आहे. कोव्हिड-19 होण्यापूर्वी या आजारांची तीव्रता काय होती नंतर त्यावर काय परिणाम झाला. उदाहरणार्थ-एखाद्या मधुमेही व्यक्तीला कोव्हिड होण्याआधी ‘क्ष’ मात्रेमध्ये इन्सुलिनची गरज होती, पण त्याला आता तेच इन्सुलिन अधिक किंवा उण्या मात्रेमध्ये आवश्यक असू शकेल, हीच गोष्ट उच्च रक्तदाबालाही लागू आहे. यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.

 

स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशन कसं करावं दूर

तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, रुग्ण कोव्हिडमुक्त झाला तरी त्याला सतत भीती वाटत राहते. समाज काय म्हणेल, कशी वागणूक देईल याचा स्ट्रेस त्या व्यक्तीवर खूप जास्त असतो. त्यामुळे शारीरीक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याकडेही लोकांनी लक्ष द्यायला हवं.  अनेकवेळा कोव्हिडमुक्त झालेल्या रुग्णाला समाजाकडून चुकीची वागणूक मिळाल्यामुळे मानसिक धक्का बसतो. रागाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांनी सकारात्मक विचार केला पाहिजे. लोकं बोलतील याची मानसिक तयारी केली पाहिजे. माझं चुकलं नाहीये, लोकं भीतीपोटी असं बोलतात हा विचार केला पाहिजे. ही मानसिक तयारी असली तर पोस्ट कोव्हिड केअर फार कठिण नाही.”

कोव्हिडनंतर बहुधा रुग्ण घरी एकटेच असतात. अशावेळी मनात उलटे-सुलटे विचार येतात. त्यामुळे लोकांनी 10 मिनिटं माइंडफुल मेडिटेशन करावं. यामुळे मानसिक खच्चीकरण होणार नाही. काही रुग्णांना झोप येत नाही, सतत बेचैनी असते, दिवसभर मनात विचार येत असतात. अशावेळी डॉक्टरांना जावून भेटावं.