बाहेरून काटेरी आणि आतून रसाळ; फणसाबद्दल माहीत आहेत का ‘या’ गोष्टी
हॅलो आरोग्य ऑनलाईन । फणस!!! नुसतं नांव ऐकलं तरी नाकात पिकल्या फणसांचा सुगंध आपोआप दरवळू लागतो. आता फणस ही भाजी आहे किंवा फळ आहे याबद्दल अनेक मतांतरे आहेत. असू दे, आपल्याला काय त्याचं. कारण काही लोक फणसाचे गरे फळ समजून खातात, तर काहींना त्याच फणसाच्या गऱ्यांची भाजी मनापासून प्रिय असते. फणस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे, हे मात्र नक्की. फणसामध्ये अनेक पौष्टिक तत्वे आहेत. यामध्ये अ, क, ही जीवनसत्वे, थियामीन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लाविन, नियासिन आणि झिंक सारखी पोषक तत्वे आहेत. फणसामध्ये फायबर ची मात्रा देखील भरपूर आहे. फणसाला नियमित फुले व फळे येतात.
फणसामध्ये नैसर्गिकरीत्या दोन प्रकार आढळतात एक म्हणजे कापा, तर दुसरा बरका. गरे म्हणून कापा फणसाला प्राधान्य दिले जाते. तर पचनास बरका फणस हा चांगला असतो. फणसामध्ये नर व संयुक्त (मादी फुले) वेगवेगळी येतात; पण ती एकाच झाडावर असतात. नर फुले ही गोलसर असतात आणि हाताने स्पर्श केल्यानंतर गुळगुळीतपणा जाणवतो, तर मादी फुले लांबट असून काटेरी दिसतात. फणसाच्या फांद्यांवर फुले लागतात; पण बहुतेक वेळा मुख्य खोडावर म्हणजेच मधल्या जाड्या खोडावर किंवा मुख्य खोडालगतच्या आलेल्या मोठ्या फांद्यांवर जी मादी फुले असतात, त्यांचेच रूपांतर फळांमध्ये होते. फांद्या जेवढ्या जाड असतील, तेवढी सशक्त आणि जोमदार फुले लागतील, त्यामुळे उत्पादनातदेखील वाढ मिळेल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने कापा आणि बरका ही दोन्ही प्रकारची झाडे महत्त्वाची आहेत.
फणसाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. फणसामध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असून, त्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. फणसामध्ये फायबर मोठ्या मात्रेवर असून, त्यामुळे शरीराची पाचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते, तसेच यामध्ये असलेले लोह शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास सहायक आहे. फणसाच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण ही चांगले राहते.
फणसाच्या सेवनाने पोटामधील अल्सर दूर होण्यास मदत होते. तसेच पचनाशी संबंधित तक्रारी देखील दूर होतात. फणसाच्या झाडाची पाने तोडून आणावीत, व ती स्वच्छ धुवून वाळवून घ्यावीत. पाने वाळल्यावर ती चुरून त्यांची पावडर बनवून ठेवावी. पोटामध्ये अल्सर असल्यास हे चूर्ण त्या व्यक्तीस खाण्यास द्यावे. लवकरच अल्सर बरे होऊन त्या व्यक्तीस आराम पडेल.
फणसाच्या झाडाची मुळे दम्यावर गुणकारी आहेत. फणसाच्या झाडाची मुळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालून त्यामध्ये ही मुळे टाकावीत. पाणी निम्मे होईपर्यंत मुळे पाण्यामध्ये उकळू द्यावीत. त्यानंतर उरलेले पाणी गाळून घ्यावे. दम्याचा विकार असलेल्या व्यक्तीला हे पाणी पिण्यास दिल्यास दम्यापासून आराम मिळू शकतो. तसेच थायरॉइड संबंधी तक्रारी असल्यासही फणसाचे सेवन करावे. फणसामध्ये असलेली सूक्ष्म खनिजे आणि तांबे ही तत्वे थायरॉइड च्या चयापचयासाठी प्रभावी उपाय समजली जातात. फणसाच्या सेवनाने शरीराचा अनेक तऱ्हेच्या बॅक्टेरियल व व्हायरल इन्फेक्शन्स पासून बचाव होतो.
फणसाच्या सालीतून निघणारा चीक सांधेदुखी साठी चांगला असतो. शरीराच्या कोणत्याही भागावर काही कारणाने सूज असल्यास, किंवा लहान घाव असल्यास, फणसाच्या सालीतील चीक त्यावर लावावा. त्याने त्वरित आराम मिळतो. तसेच सांधे दुखत असल्यासही त्यावर फणसाच्या सालीच्या चिकाने मालिश केल्यास आराम मिळतो.
ज्यांच्या अंगामध्ये उष्णता जास्त असते, त्यांना वारंवार तोंड येते, तर कित्येकांना ते घेत असलेल्या अँटीबायोटिक्स मुळे ही तोंडामध्ये अल्सर येतात. अश्या वेळी फणसाच्या झाडाची कोवळी हिरवी पाने काही सेकंद चावून मग थुंकून टाकावीत. ह्या पानांच्या रसामुळे तोंडातील अल्सर, किंवा उष्णतेमुळे आलेले तोंड कमी होण्यास मदत होते. फणसामध्ये असणारी अनेक खनिजे शरीरातील होर्मोन्सना देखील नियंत्रित करीत असतात.
पिकलेल्या फणसाचे गरे कुस्करून घेऊन ते गरे पाण्यामध्ये उकळून घ्यावेत. हे पाणी प्याल्याने दृष्टी सुधारते. फणसामध्ये असलेले अ जीवनसत्व हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी व त्वचेसाठीही उत्तम आहे. फणसाच्या आठळ्यांचे चूर्ण बनवून त्यामध्ये थोडे मध घालावे, हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत होऊन चेहरा साफ दिसू लागतो. ज्या व्यक्तींची त्वचा अगदी रुक्ष, निस्तेज दिसते, त्यांनी ही फणसाच्या गऱ्याचा रस चेहऱ्याला लावल्याने त्वचा नितळ, सुंदर दिसू लागते. फणसाच्या गऱ्याची पेस्ट बनवून त्यामध्ये थोडे दूध घालून ही पेस्ट चेहऱ्याला लावावी. काही वेळ ही पेस्ट चेहऱ्यावर तशीच राहू देऊन नंतर कोमट पाण्याने धुवून टाकावी. या उपायाने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते.
फणस आरोग्यासाठी असला, तरीही त्याचे थोडेसे तोटे देखील आहेत.
पिकलेल्या फणसामुळे कफ होतो, त्यामुळे सर्दी-खोकला, अजीर्ण इत्यादी आजार तसेच गर्भवती स्त्रियांनी फणसचे सेवन करू नये. ज्यांची पचनसंस्था नाजुक असेल त्यांनी मात्र तोलून-मापून फणसाचे गरे खावेत. कारण त्यामुळे अजीर्ण होण्याचा धोका असतो. तसेच फणस सेवन केल्यानंतर विडयाचे पान खाण्यामुळे पोट फुगते. त्यामुळे फणस खाल्ल्यानंतर पान खाऊ नये नाहीतर पोटदुखीचा त्रास संभवतो.