ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास; एवढीच की, ‘आणखी काही’ गंभीर आहेत कोरोनाची लक्षणे?
हॅलो आरोग्य ऑनलाईन । कोरोना! कोरोना!! कोरोना!!! वैताग आलाय या नावाचा. पण नक्की काय आहे कोरोना व्हायरस. आणि काय होतं त्यानं शरीरात की चांगला, धडधाकट माणूस बघता बघता मरणाच्या दारात जाऊन पोहोचतो. तर कोरोना म्हणजे व्हायरसमधील अशी एक मोठी जात ज्यामुळे मानव किंवा प्राणी आजारी पडतात. मानवाला या विषाणूचा संसर्ग झाल्यास सर्दीपासून ते श्वसन यंत्रणेत संसर्ग होण्याचा धोका असतो. कोरोना व्हायरसमुळे COVID -19 हा आजार होतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे चीनमधील वुहानमध्ये 2019 च्या डिसेंबरमध्ये पहिल्यांदा या विषाणूचा आणि आजाराचा प्रादुर्भाव झाला. तोपर्यंत जगाला या विषाणूची आणि आजाराची माहिती नव्हती.
COVID-19 आजाराची सर्वसामान्य लक्षणं म्हणजे ताप, थकवा आणि कोरडा खोकला. काही रुग्णांमध्ये अंगदुखी, वेदना, नाक बंद होणे, नाक वाहणे, घसा कोरडा पडणे किंवा डायरिया होणे अशीही लक्षणे दिसतात. सुरुवातीला अत्यंत कमी आणि सौम्य प्रमाणात ही लक्षणे जाणवतात. काही लोकांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात अशी लक्षणं दिसत नाहीत किंवा त्यांना अस्वस्थही वाटत नाही. या विषाणूची लागण झालेले 80 टक्के लोक कोणत्याही विशेष उपचाराशिवाय अंगदुखी, सर्दी-तापातून आराम आणि तापाची गोळी पॅरासिटमॉल घेऊन बरे झालेले आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या दर ६ पैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर होते आणि श्वास घ्यायला त्रास होतो. वृद्ध लोक आणि ज्यांना उच्च रक्तदाब, ह्रदयविकार किंवा मधुमेहाचा त्रास आहे त्यांना या संसर्गामुळे गंभीर त्रास होऊ शकतो. ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
प्रत्येक पातळीवरील कोरोनाची लक्षणे (STEP BY STEP)
- तापासारखी लक्षणं, पण ताप नाही : डोकेदुखी, वास न येणं, स्नायूदुखी, खोकला, घसा खवखवणं, छातीत दुखणं, ताप नाही.
- तापासारखी लक्षणं आणि ताप : डोकेदुखी, वास न येणं, खोकला, घसा खवखवणं, घसा बसणं, ताप, भूक न लागणं.
- गॅस्ट्रोइंटेस्टाईनल (आतडी आणि पचनसंस्था) : डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, अतिसार, घसा खवखवणं, छातीत दुखणं, खोकला नाही.
- थकवा (गांभीर्य पातळी 1) : डोकेदुखी, वास न येणं, खोकला, ताप, घसा बसणं, छातीत दुखणं, थकवा येणं.
- गोंधळल्यासारखं वाटणं (गांभीर्य पातळी 2) : डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, खोकला, ताप, घसा बसणं, घसा खवखवणं, छातीत दुखणं, थकवा, गोंधळून जाणं, स्नायूदुखी
- पोट आणि श्वसनयंत्रणा (गांभीर्य पातळी 3 ) : डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं, ताप, खोकला, घसा बसणं, घसा खवखवणं, छातीत दुखणं, थकवा, गोंधळल्यासारखं वाटणं, स्नायूदुखी, छाप लागणं, अतिसार, पोटदुखी
ज्याला या विषाणूचा संसर्ग झाला आहे त्याच्यापासून इतरांना COVID-19 होऊ शकतो. लागण झालेली व्यक्ती जेव्हा खोकते किंवा शिंकते तेव्हा त्या व्यक्तीच्या नाक किंवा तोंडातून उडालेल्या थेंबांमुळे इतरांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हे थेंब आजूबाजूच्या वस्तू किंवा पृष्ठभागांवर पडतात. त्यानंतर इतर व्यक्तींचा या वस्तू किंवा पृष्ठभागाला स्पर्श झाला आणि त्यांनी आपल्या त्याच हातांनी तोंड, डोळे किंवा नाकाला स्पर्श केला तर COVID-19ची लागण होते. त्यामुळे अशा आजारी व्यक्तीपासून १ मीटर(3 फूट) लांब राहावे. जागतिक आरोग्य संघटना(WHO) या आजाराचा प्रसार कसा होतो यावर अजून संशोधन करत आहे.
चीनसह इतर काही देशांना या आजाराचा प्रसार कमी करण्यात किंवा रोखण्यात यश आले आहे. काही साध्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही COVID-19ची लागण किंवा प्रसाराचा धोका कमी करु शकता.
- तुम्ही तुमचे हात नियमितपणे अल्कोहोल मिश्रित सॅनिटायझर किंवा साबण आणि पाण्याने स्वच्छ करा. यामुळे तुमच्या हातावर असलेले व्हायरस नष्ट होऊ शकतात.
- खोकला किंवा शिंक येणाऱ्या व्यक्तीपासून किमान १ मीटर(३ फूट) अंतर ठेवा. डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे लोक श्वसनाचे आरोग्य सांभाळण्याची खबरदारी घ्या, म्हणजे खोकताना किंवा शिंकताना तुमच्या हाताच्या कोपराचा भाग, टिश्यू पेपर तोंडासमोर किंवा नाकासमोर धरा. त्यानंतर वापरलेला टिश्यू पेपर कचरापेटीत टाकून द्या. यामुळे तुम्ही तुमचे आणि तुमच्या आसपासच्या लोकांचे सर्दी, खोकला आणि COVID-19 संरक्षण करु शकता.
- तुम्हाला बरे वाटत नसेल तर घरीच थांबा. तुम्हाला जर ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या.
- जर तुम्ही वयस्कर आहात किंवा तुम्हाला मधुमेह, ह्रदयविकार किंवा फुफ्फुसाचा आजार असेल तर अशा ठिकाणांना भेट देणे टाळा, कारण तुम्हाला या आजाराचा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. COVID-19चा प्रसार झालेल्या ठिकाणी असलेल्या किंवा (गेल्या 14 दिवसात) त्या ठिकाणाला भेट दिलेल्या व्यक्तींसाठी खबरदारीच्या सूचना वर दिलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा (सर्वांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना)
- जर तुम्हाला बरे वाटत नसेल किंवा डोकेदुखी, ताप, नाक वाहणे अशी सौम्य लक्षणे जाणवली तर बरे वाटेपर्यंत घरीत स्वयं विलगीकरणात राहा. जर तुम्हाला आवश्यक वस्तुंसाठी बाहेर जावे लागणार असेल तर तोंडावर मास्क बांधा, त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका टळतो. जर तुम्हाला ताप, खोकला आणि श्वसनासा त्रास होत असेल तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या, कारण तुम्हाला हा त्रास श्वसन यंत्रणेतील संसर्ग किंवा इतर गंभीर परिस्थितीमुळे होऊ शकतो. तसेच तुम्ही नुकताच कुठे प्रवास केला असेल किंवा कुठल्या प्रवाशांच्या संपर्कात आला असाल तरी त्याची माहिती आधीच देऊन ठेवा.
लोकांनी हॉस्पिटलमध्ये केव्हा जावं?
कोरोना व्हायरसची बाधा झालेले बहुतांश जण अंगदुखी, सर्दी -तापातून आराम आणि तापाची गोळी पॅरासिटमॉल घेऊन बरे झालेले आहेत. पण, जेव्हा श्वास घ्यायला त्रास झाला, शरीरातली ऑक्सिजनची पातळी कमी झाली, तर मात्र तात्काळ हॉस्पिटलमध्ये जायला हवं. डॉक्टर अशावेळी रुग्णाच्या छातीचा एक्स-रे काढून छातीत किती कफ साठला आहे ते पाहतात. त्यानुसार रुग्णाला ऑक्सिजनचा पुरवठा द्यायचा की थेट व्हेंटीलेटरवर ठेवायचं याचा निर्णय घेतला जातो.
आयसीयूमध्ये नेमकं काय होतं?
अत्यंत गंभीर आजारी झालेल्या रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार केले जातात. कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन मास्कद्वारे प्राणवायू मिळतो. रुग्णाला शक्य होत नसेल तर नाकापर्यंत नळीही पोहोचवली जाते. अगदीच एखाद्या रुग्णाची परिस्थिती जास्त गंभीर झाली तर त्याला आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येतं. यात एक नळी थेट नाक किंवा तोंडामार्गे शरीरात टाकली जाते. या नळीतून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन हा थेट फुप्फुसापर्यंत पोहचवला जातो.