डोक्याला प्रचंड ताप देणारी मायग्रेन (अर्धशिशी) म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात ताण-तणाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या काळजी आणि चिंताचे रूपांतर शारिरक दुखण्यात कधी होते हे माणसाला कळतही नाही. आजकाल सर्वच वयोगटातील लोकांमध्ये डोकेदुखीची समस्या वाढू लागली आहे. सतत होणारी ही डोकेदुखी अचानक मायग्रेनचं (migraine) रूप धारण करू लागली आहे. मायग्रेन ही एक न्युरॉलॉजिकल आरोग्य समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या डोक्याची अर्धी बाजू दुखू लागते. कधी कधी मायग्रेनमुळे उलटीचाही त्रास जाणवतो. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसते.
कधी कधी ही डोकेदुखी सतत जाणवते तर कधी कधी कमी- जास्त प्रमाणात डोकं दुखण्याचा त्रास जाणवतो. एकदा सुरू झाल्यावर काही मिनीटांपासून ते अगदी काही दिवसांपर्यंत ही डोकेदुखी जाणवू शकते. काही वेळा मायग्रेनमुळे तुमचे डोके जोरजोरात थडथडत आहे असे वाटू लागते. काही जणांचा रक्तदाबही यामुळे वाढू शकतो. मात्र काहीही असलं तरी या समस्येवर डॉक्टरांचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. डॉक्टरांकडून तपासणी केल्यावरच तुमची डोकेदुखी मायग्रेनमुळे होणारी आहे का हे समजू शकतं. कारण प्रत्येक डोकेदुखी मायग्रेन असेलच असे मुळीच नाही. शिवाय प्रत्येक व्यक्तीमधील मायग्रेनच्या त्रासाचे कारण निरनिराळे असू शकते. मायग्रेन एक अनुवंशिक समस्या आहे. मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.
मायग्रेन कशामुळे होतो?
- उच्च रक्तदाब
- अपूरी झोप
- ताण-तणाव
- अधिक प्रमाणात पेनकिलर घेणं
- वातावरणातील बदल
- अॅलर्जी
- धूर
- हॉर्मोन्समधील बदल
- सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे
- लोणचं खाण्यामुळे किंवा मुरवलेले पदार्थ वारंवार खाण्यामुळे
मायग्रेनची लक्षणे अवश्य जाणून घ्या.
- भूक कमी लागणे
- कामात रस न वाटणे
- डोक्याचा अर्धा भाग दुखणे
- घाम सुटणे
- मळमळ, उलटी
- प्रखर उजेड आणि तीव्र आवाज सहन न होणे
- अशक्तपणा
- डोळे दुखणे
- धुसर दिसू लागणे
- काही विशिष्ट खाद्यपदार्थांची अॅलर्जी असणे
मायग्रेन दूर करण्यासाठी उपाय – जर तुमचं डोकं मायग्रेनमुळे दुखत असेल तर त्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे. शिवाय काही घरगुती उपचार करुनदेखील तुम्ही तुमची डोकेदुखी कमी करू शकता.
- साजूक तूप – मायग्रेन कमी करण्यासाठी नियमित तुमच्या नाकपुडयांमध्ये दोन थेंब शुद्ध तूप टाका.
- लवंग पावडर – डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही दुधात लवंग पावडर मिसळून ते घेऊ शकता.
- सफरचंद – मायग्रेनच्या त्रासातून वाचण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी एक सफरचंद खा
- पालक आणि गाजराचा रस- मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल तर पालक आणि गाजराचा रस घ्या.
- लिंबाची साले – लिंबाची साले सुकवून त्याची पावडर तयार करा. डोके दुखू लागल्यास या पावडरची पेस्ट कपाळावर लावा.ज्यामुळे तुम्हाला लवकर आराम मिळू शकेल.
- आले – एक चमचा आल्याच्या रसात थोडं मध मिसळा. हे मिश्रण पाण्यात मिसळा आणि प्या. ज्यामुळे तुमची डोकेदुखी कमी होईल. त्यासोबतच आल्याचा चहा घेतल्यास अथवा आल्याचा एक तुकडा तोंडात ठेवल्यासदेखील तुम्हाला आराम मिळू शकेल. आल्याचा रस पोटात गेल्याने तुमची डोकेदुखी कमी होऊ शकेल. एवढचं नाहीतर तुम्ही आल्याच्या सालांचा वापर ही करू शकता.
- काकडी – काकडीचा रस डोक्यावर लावल्याने अथवा काकडीचा वास घेतल्याने तुमची डोकेदुखी कमी होईल
- द्राक्षाचा रस – ताजी द्राक्ष मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याचा रस काढा. डोकं दुखत असल्यास दिवसभरात दोन वेळा पाण्यासोबत हे सरबत प्या. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए , व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेड असतात ज्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळतो.
- दालचिनी – दालचिनी पावडर हा मसाल्याचा एक असा पदार्थ आहे ज्यामुळे तुमचं जेवण तर स्वादिष्ट होतच. याशिवाय दालचिनीचे आरोग्य आणि सौंदर्यासाठीही फायदे आहेत. जसं तुम्हाला मायग्रेनपासूनदेखील सुटका मिळू शकते. यासाठी दालचिनी पावडर पाण्यात मिसळून तुमच्या कपाळावर लावा. तुम्हाला निवांत वाटू लागेल.
- तिळाचं तेल – तिळाच्या तेलात एक दालचिनीचा तुकडा आणि दोन वेलची टाका आणि तेल गरम करा. तेल कोमट झाल्यावर त्या तेलाने हेड मसाज करा. यामुळे तुमचे सिरोटोनिन वाढते ज्यामुळे तुमचे डोके दुखणं कमी होतं. तिळाचं तेल हे त्वचा आणि केसांसाठी अत्यंत गुणकारी आहे.
- पेपरमिंट – पेपरमिंटमुळे सूज कमी होते आणि आराम मिळतो. मायग्रेनच्या त्रासावरही तुम्ही याचा वापर करू शकता. यासाठी पेपरमिंटची चहा प्या अथवा पाण्यात पेपरमिंट आणि मध टाकून प्या. शिवाय डोकेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही पेपरमिंट ऑईलने हेडमसाज सुद्धा करू शकता.
- कापूर – गायीच्या शुद्ध तूपात थोडेसं कापूर मिसळा आणि त्या तुपाने डोक्याला मसाज करा.
- उपाशी राहू नका – मायग्रेनचा त्रास कमी व्हावा असे वाटत असेल तर जास्त वेळ उपाशी राहू नका.
- पुरेशी झोप घ्या – मायग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांनी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे.
मायग्रेन चा अटॅक कधीही येऊ शकतो. त्यामुळे मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांनी सतत सावध असणं फार गरजेचं आहे. आधीच काही गोष्टींची काळजी घेतली तर मायग्रेनच्या त्रासापासून वाचणं नक्कीच शक्य आहे.
- कडक उन्हात घराबाहेर पडू नका
- उग्र वासचे परफ्युम लावू नका
- प्रखर उजेडात काम करू नका. झोपताना दिवे बंद करा.
- पुरेशी झोप घ्या. झोपमोड होणार नाही याची दक्षता घ्या. यासाठी झोपण्यापूर्वीच आजूबाजूचे वातावरण शांत ठेवण्यासाठी घरच्यांना विनंती करा.
- कमी प्रकाशात डोळ्यांवर ताण येईल असे काम करणे टाळा.
- दररोज कमीत कमी 12-15 ग्लास पाणी प्या. रात्री तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.
- वातावरणात बदल झाल्यामुळे मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. यासाठी अचानक थंड वातावरणात जाणे टाळा शिवाय उन्हाळ्यात थंड पाणी पिऊ नका.
- स्त्रियांसाठी – गर्भ निरोधक गोळ्यांचा अती वापर करू नका. कारण ओरल पिल्समध्ये प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे हॉर्मोन्स असंतुलित होतात. हॉर्मोन्समधील बदलांमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
- ताण- तणावामुळे मायग्रेन वाढण्याची अधिक शक्यता असते. दैनंदिन जीवनात अनेक समस्या आणि चिंताना तोंड द्यावे लागते. म्हणूनच नियमित मेडीटेशन करा. योगा आणि व्यायामामुळे तुमचे मन शांत राहण्यास मदत होईल.
मायग्रेनसाठी काही उपुयक्त योगासने आणि प्राणायम
योगासने आणि मेडीटेशनमुळे मन शांत राहण्यास मदत होते. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे योगासने आणि प्राणायमाचा सराव करा. शिवाय झोपताना अथवा झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनीटे केलेल्या मेडीटेशनमुळे तुम्हाला निवांत वाटू लागेल. यासाठी ही काही योगासने अवश्य करा.
- अनुलोम विलोम प्राणायम
- अधोमुख शवासन
- सेतुबंध आसन
- शिशुआसन
- जानु शिरसासन
वरील उपायांनीही जर आपला त्रास कमी होत नसेल तर मात्र तज्ञ् डॉक्टरांना दाखून पुढील उपचार केलेले उत्तमच.