डायबेटिज आहे? ‘अशी’ घ्या पायांची काळजी
हॅलो आरोग्य ऑनलाईन : मधुमेह असलेल्या व्यक्तींना पायाची विशेष काळजी घ्या, असे कायम डॉक्टर्स सांगतात. पायाची काळजी का घ्यायची व कशी घ्यायची हे आपण या लेखात बघू या. अनियंत्रित मधुमेहामुळे पायांना मुख्यत्वे दोन त्रास होतात. पहिला त्रास म्हणजे पायांच्या नसांना हानी होते. त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात आणि दुसरा त्रास म्हणजे पायाच्या रक्तपुरवठ्यात बाधा येते व पायांचा रक्तपुरवठा कमी होतो. त्याला पेरिफेरल आरटेरिल डिसीज म्हणतात. मधुमेहामुळे साधारण १५टक्के रुग्णांवर पायाची जखम बरी न झाल्यामुळे पाय कापण्याची वेळ येऊ शकते. पायाची योग्य ती काळजी घेतल्यास पायाचा त्रास टाळणे शक्य आहे.
डायबेटिज व्यक्तींना पायाला त्रास झाल्यामुळे कुठली लक्षणे जाणवतात?
- पाय सून्न किंवा बधीर होणे.
- तळपायाची जळजळ होणे किंवा पायाला मुंग्या येणे.
- पायांचा अथवा बोटांचा आकार बदलणे.
- पायाची जखम अपेक्षेप्रमाणे बरी न होणे.
- विविध जिवाणुंमुळे पायाच्या त्वचेला, नखांना जंतूसंसर्ग होणे. (उदा. नखांमध्ये अथवा बोटांच्या बेचक्यांमध्ये बुरशीचा संसर्ग होणे.)
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली व पायाची काळजी घेतली तर पायांचे गंभीर आजार टाळले जाऊ शकतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या पायाच्या काळजीसाठी विशेष सल्ला अमलांत आणू शकतात.
- पायाची / पावलांची नियमित तपासणी करा. रोज पायाची तपासणी करा. स्वत:हून तपासणी करणे कठीण जात असल्यास आरसा वापरा अथवा नातेवाईकांची मदत घ्या.
- पाय रोज स्वच्छा धुवा व कोरडे करा. खूप गरम अथवा खूप गार पाण्यात पाय बुडवून ठेवू नका.
- पायाची त्वचा मऊ ठेवा. पायांना पेट्रोलियम जेली किंवा क्रीम लावा. बोटांच्या बेचक्यामध्ये लावू नका. तो भाग कोरडा ठेवा.
- कुरूप, घट्टा स्वत: कापू नका. त्याकरता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- पायाची नखे नियमित काळजीपूर्वक कापा. नखे कापताना जखम होणार नाही याची काळजी घ्या.
- पायमोजे व योग्य पादत्राणे वापरा.
- अनवाणी चालू नका.
- खूप घट्ट पायमोजे, घट्ट जोडवी. घट्ट पैंजण पायात घालू नका.
- धुम्रपान टाळा.
- नियमितपणे डॉक्टरांकडून / Podiatrist (पायाचे तज्ज्ञ) पायांची तपासणी करून घ्या. पायाला काहीही त्रास होत असल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. आंघोळ करताना पायाला प्लॅस्टिकची पिशवी गुंडाळा.
- त्या पायावर शरीराचे वजन देऊ नये. (Complete Offloading) व पायाला शक्य तेवढा आराम द्यावा. त्यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होईल.
- तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य ती पादत्राणे वापरा.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित जखमेचे ड्रेसिंग करावे.
- रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवा.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधी घ्या. (Antibiotics अथवा सूज कमी करणारी औषधे)
- आजच आपल्या पायांचे म्हणणे ऐका व त्यांच्याकडे लक्ष द्या.