स्लिम ट्रिम व्हायचंय..? मग ग्रीन टी सोबत घ्या लिंबू आणि पुदिना; अधिक जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांच्या आयुष्यात वाढलेले वजन हा अतिशय गंभीर विषय झाला आहे. कारण हे वाढलेले वजन एकतर अनेक रोगांना आमंत्रण देते आणि त्याचसोबत हे वजन अगदी सहज सोप्प्या पद्धतीने घटवता देखील येत नाही. त्यामुळे खूप वेळ जिम आणि भला मोठा डाएट चार्ट यातच अर्धे आयुष्य सरते. मुख्य म्हणजे तरीसुद्धा वाढलेले वजन हवे तसे कमी होत नाही. अनेकांना तर दिवसभराच्या कामांमध्ये आपल्या वाढत्या वजनाकडे लक्ष देणे अगदीच अशक्य असते. मग अश्यावेळी नेमकं करायचं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होतो. तर याच प्रश्नाचे उत्तर आज आम्ही देणार आहोत. तुम्हाला अश्या एका पेयाची माहिती देणार आहोत जे पेय अधिक कष्ट न करता तुमच्या वाढत्या वजनाला कात्री लावू शकते.
ग्रीन टीमध्ये न्यूट्रिशन आणि अँटीऑक्सिडेंट घटक आढळतात. ज्यामुळे शरीरातील वाढलेले वजन आटोक्यात येण्याकरिता मदत होते. मात्र ग्रीन टीसोबत पुदिना आणि लिंबाची जोड असेल तर वाढत्या वजनाची काही खैरच नाही. पुदीन्याची पाने अन्नपचन करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. तर लिंबाचे सेवन अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी फायदेशीर असते. यामुळे जर ग्रीन टीसोबत लिंबाचा रस आणि पुदिन्याची पाने मिसळल्या पेयाचे सेवन केले तर आपले वजन कमी होण्यास बराच हातभार लागतो. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, लिंबाचा रस ग्रीन टीमध्ये मिसळल्याने त्यातील अँटीऑक्सिडेंट्सची मात्रा वाढते. यामुळे शरीरातील अन्य क्रिया सुरळीत होण्यास मदत मिळते.
वेगवान आणि चांगल्या परिणामांसाठी तुम्ही पाणी गरम करतेवेळी त्यात पुदिन्याचे ५ ते ७ पाने हाताने तोडून घाला. पाण्याला हलकी वाफ आली असता उकळवणे बंद करून ते किमान ८-१० मिनीटे तसेच ठेवा. त्यानंतर ग्रीन टीचे पॅकेट एका कपात घेऊन त्यावर हे गरम पाणी ओता. यानंतर ते पॅकेट पाण्यात १-२ मिनीटे तसेच ठेवा. पुढे ग्रीन टी आणि पाणी एकत्रित झाल्यानंतर त्यात १/२ छोटा चमचा लिंबाचा रस घ्या आणि तुमचा फॅट कटर ग्रीन टी तयार.
हे लक्षात ठेवा: जेवणानंतर ग्रीन टी पिण्याने लठ्ठपणा कमी होत नाही. जेवणाबरोबर किंवा नंतर लगेचच ग्रीन टीचे सेवन केल्याने जेवणात उपस्थित पोषकद्रव्ये शोषून घेण्यास अडथळा येऊ शकतो. ज्यामुळे शरीरात पोषक तत्वांचा अभाव जाणवतो. यामुळे ग्रीन टीचे सेवन केल्यानंतर किमान १ तासा नंतर काहीतरी खाणे योग्य आहे.