|

‘डोमेस्टीक फॉल्स’ची प्रमुख कारणे कोणती? आणि कसा कराल बचाव?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। भारत हा लोकसंख्येनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकावर येतो. या लोकसंख्येत ८ कोटींपेक्षा जास्त लोक हि ६० वयोवर्षापेक्षा अधिक वय असलेली आहेत. यांना ज्येष्ठ नागरिक असे संबोधले जाते. मुख्य म्हणजे यांच्या तब्येतीच्या तक्रारी अधिक असतात. त्यात उतारवयात होणाऱ्या घरगुती दुर्घटना ज्यांना ‘डोमेस्टीक फॉल्स’ असे म्हटले जाते याची समस्या या वयोगटात जास्त दिसून येते. वारंवार पडल्याने होणाऱ्या अपघातामुळे अनेक वयोवृद्धांना अपंगत्वाचा सामना करावा लागतो. तर अनेकांना प्राणदेखील गमवावा लागतो.

एकदा का वयाची साठी ओलांडली की, शरीराला विविध आजार ग्रासतात. दरम्यान शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होऊन मेंदूचे कार्य धीम्या गतीने होते. यामुळे अनेक वृद्धांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण जास्त दिसते. शिवाय उच्च रक्तदाब, मधुमेह, स्नायूंचे आजार, मणक्याचा त्रास आणि डोळ्यांचे विकारदेखील या वयोगटात आढळतात. तसे पाहता आजकाल विज्ञान इतके प्रगत झाले आहे कि माणसाचे आयुष्य वाढवता येते मात्र म्हातारपण? ते काही टाळता येत नाही. त्यामुळे आपल्या वडीलधाऱ्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे. त्यामुळे आपल्याला त्यांची काळजी घेण्याकरिता आधी ‘डोमेस्टीक फॉल्स’ का होतात ते जाणून घ्यायला हवे आणि मग त्यावर उपाययोजना करायला हवी.

‘डोमेस्टीक फॉल्स’ची प्रमुख कारणे, दुखापती आणि उपाय पुढीलप्रमाणे :-

१) वयोमानानुसार होणारी शारीरिक स्थिती- स्नायुंना ठिसूळपणा/ कमकुवतपणा येणे, चालताना तोल सावरता न येणे, आकलनशक्तीची कमतरता, प्रदिर्घ आजार (संधीवात, पार्किन्सस, अल्झायमर, हायपरटेन्शन), शारीरीक बदल, ऐकण्याच्या व पाहण्याच्या क्षमतेत कमतरता येणे.

२) सभोवतालची भौगोलिक परिस्थिती – घरात/खोल्यांमध्ये अपुरा प्रकाश असणे, अस्ताव्यस्त विखुरलेले वा पडलेले सामान, सैल झालेले कार्पेट, निसरड्या वा ओल्या जागा अथवा फरशी, सुरक्षित साधनांचा अभाव, झोपेच्या/ गुंगी आणणाऱ्या औषधांचा दैनंदिन वापर करणे

३) डोमेस्टीक फॉल्स’मूळे होणाऱ्या दुखापती व त्यांची तीव्रता – खुब्याच्या हाडाचे फ्रॅक्चर, मनगटाच्या हाडाचे फ्रॅक्चर, मणक्याच्या हाडाचे फ्रॅक्चर, घोट्याजवळील हाडाचे फ्रॅक्चर, डोक्यास गंभीर दुखापत. यापैकी कोणतीही दुखापत झाली असता मरणोत्तर एका जागी स्थित होणे वा घाबरल्याने तीव्र हार्ट अटॅकची शक्यता किंवा गंभीर जखम झाल्यास मृत्यू.

४) डोमेस्टीक फॉल्स’ टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी – न घसरणाऱ्या चप्पल अथवा बुटांचा वापर, घरात पुरेसा प्रकाश करणे (मुख्य करून वृद्धांच्या झोपायची खोली, बाथरुम, जिना, हॉल), जमिनीला कार्पेट फिक्स करणे, बाथरुम व संडास येथे हात पकडण्यासाठी बार लावून घेणे व जिन्याच्या दोन्ही बाजुंना आधार घेण्यासाठी रेलींग करावेत, वृध्द लोकांनी शिडीवर/ स्टुलवर चढणे टाळावे, घरातील ओलं असणाऱ्या जागांची नियमित साफसफाई करणे, कान – डोळे यांची नियमित वैद्यकीय तपासणी करणे.

लक्षात ठेवा: आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती हे ओझं नसून आपली जबाबदारी असते. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आपले प्राधान्य आहे.