पायाच्या टाचांना वारंवार भेगा पडत असतील, तर करा हे उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या पायाच्या टाचा या आपल्या शरीराचा एक अविभाज्य भाग आहेत. या टाचांच्याच मदतीने आपण आपल्या पायांवर उभे राहतो आणि चालतो. आपण अनेकदा पहिले असाल कि अनेकांच्या टाचा सोलपटलेल्या किंवा भेगा पडलेल्या असतात. कित्येकदा या भेगा गंभीर जखमांचे स्वरूप देखील घेतात आणि यामुळे सेप्टिक होण्याची शक्यतादेखील बळावते. मात्र अनेकदा लोक या भेगांकडे दुर्लक्ष करतात. तर चार चौघात दिसताना वाईट दिसत म्हणून आपल्या टाचा लपवण्याची प्रयत्न देखील करतात. मात्र आता आपल्या टाचा लपवण्याची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहोत जे अगदी सोप्पे आणि कुणीही सहज करू शकेल असे आहेत. मात्र कोणतीही उपाययोजना करण्याआधी आपल्याला टाचांना भेगा पडण्याची कारणे ठाऊक असणे अत्यंत गरजेचे आहे, म्हणून टाचांना भेगा पडण्याची कारणे जाणून घ्या.
खालीलप्रमाणे :
– चुकीची जीवनपद्धती
– चुकीचे खाणे पिणे ते ही चुकीच्या वेळी
– शरीरात कॅल्शियम, व्हिटॅमिन इ आणि आयर्नची कमतरता
– शारीरिक गरजेपेक्षा कमी पाणी पिणे
जाणून घ्या करावयाचे उपाय खालीलप्रमाणे:
१) घरात मऊ पादत्राणांचा वापर – घरात कुठेही वावर करतेवेळी मऊ आवरणाच्या चप्पलचा वापर करा. जेणे करून टाचांचा थेट जमिनीशी संपर्क होणार नाही व टाचांवर भेगा पडणार नाहीत.
२) ऑलिव्ह ऑईलची मॉलिश – आठवड्यातून किमान ३ वेळा झोपण्याआधी ऑलिव्ह ऑईलने पायाच्या टाचांची हलक्या हाताने मॉलिश करा आणि झोपा. यामुळे आपल्या टाचांची त्वचा मऊ होईल.
३) मिठाच्या पाण्यात पाय बुडविणे – आठवड्यातून किमान २ वेळा आपल्या टाचांना मिठाच्या पाण्याने चांगले स्वच्छ करा. यासाठी कोमट पाण्यात मीठ घाला आणि त्यात आपले पाय काही वेळ बुडवून ठेवा. यानंतर ब्रश किंवा दगडाने हळुवार चोळा. यामुळे टाचेवर साचलेली घाण व माती निघून जाईल. यानंतर टाचा स्वच्छ व मऊ कापडाने पुसा आणि त्यावर नारळाचे तेल लावा. यामुळे टाचा स्वच्छ आणि मऊ होतील.
४) लिंबू व मलई – दररोज रात्री झोपण्याआधी पाय चांगले स्वच्छ धुवावेत. यानंतर, लिंबू आणि मलई टाचांना लावून झोपा. साधारण आठवड्याभरातच आपल्याला टाचांच्या भेगांपासून आराम मिळेल.
५) तांदळाची पिठी – तांदळाची पिठी त्वचेसाठी स्क्रब म्हणून काम करते. यासाठी एका भांड्यात २ चमचे तांदळाचे पीठ, १ चमचा मध आणि १ चमचा लिंबाचा रस घालून जाडसर लेप तयार करावा. जर आपल्या टाचांमध्ये खूप भेगा असतील, तर आपण १५ ते २० मिनिटे हलक्या गरम पाण्यात आपले पाय ठेवावेत. यानंतर तयार स्क्रबचा वापर करून टाचा स्वच्छ कराव्या. याचा आठवड्यात ३ वेळा वापर केला असता भेगांपासून मुक्तता मिळते.
६) जवस पीठ व जोजोबा तेल – साधारण २ चमचे जवसाचे पीठ आणि आवश्यकतेप्रमाणे जोजोबा तेल घेऊन एक दाट पॅक तयार करून भेगाळलेल्या टाचांवर अर्धा तास लावून ठेवावा. यानंतर थंड पाण्याने धुवून घ्या. यामुळे काहीच दिवसात भेगांपासून आराम मिळेल.
७) ग्लिसरीन व गुलाबजल – एका बाटलीमध्ये अर्ध गुलाब पाणी आणि अर्ध ग्लिसरीन मिसळून त्यात लिंबाचे २- ३ थेंब मिसळा. रात्री झोपण्याआधी आपले पाय स्वच्छ पाण्याने धुवून त्यावर हे मिश्रण लावा. याच्या वापराने अगदी काहीच दिवसात आपल्याला फरक जाणवेल.