नखं देतात आरोग्यातील बिघाडाचे संकेत; कसे ते जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। नखं सुंदर ठेवणे हा भाग सौंदर्याशी संबंधित असतोच मात्र त्याहीपेक्षा नखांची काळजी घेणे हे आरोग्याशी संबंधित असते. आपण नेहमीच आपल्या नखांचे सौंदर्य राखण्यासाठी मॅनिक्युअर, पॅडीक्युअर यांसारख्या पर्यायांचा अवलंब करतो. मोठी नखे स्त्रियांच्या हातांच्या सौंदर्यात भर घालतात. दरम्यान एक असा काळ होता जेव्हा नखांना फक्त गोलच आकार दिला जायचा. मात्र आता नखे आणखी सुंदर दिसावीत म्हणून त्यांना विविध आकार दिले जातात. हे सगळं झालं सौंदर्याबाबत. मात्र आरोग्याचं काय?
तुम्हाला माहित आहे का? आपले आरोग्य कसे आहे हे आपली नख अगदी सहजरित्या सांगत असतात. परंतु ते आपल्या लक्षात येत नाही. आपल्या नखांची वाढ ते त्यांवर उमटणाऱ्या विविध प्रकारच्या रेषा आपल्या आरोग्याशी निगडित अनेक गोष्टी सांगत असतात. चला तर मग जाणून घेऊया कि, नखांवर येणाऱ्या या रेषा नक्की काय सांगतात.
१) वारंवार नखे तुटणे – जर आपली नखे वारंवार तुटत असतील तर त्याचा अर्थ आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमकुवत आहे. तसेच हे लक्षण थायरॉइडचे देखील असण्याचे संकेत देतात.
२) नखांची वाढ खुंटणे – जर आपली नखे कापल्यानंतर लवकर वाढत नसतील तर आपल्या शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी झाली असल्याचे हे संकेत दर्शविते.
३) उभ्या लांब रेषा – नखांवर उमटणाऱ्या उभ्या आणि लांब रेषा हे आपले वाढते वय आणि त्या वयोमानानुसार आरोग्याशी संबंधित उदभवणाऱ्या समस्या दर्शवतात. या रेषा २० ते २५ टक्के लोकांमध्ये दिसतात.
४) आडव्या रेषा – जर आपल्या नखांवर आडव्या रेषा दिसत असतील, तर हे आपल्या नखांच्या वाढीसंबंधित समस्या असल्याचे संकेत दर्शवितात.
५) लहान/ पुसट पांढरे डाग – आपल्या नखांवर जर पांढरे डाग दिसत असतील तर हे डाग आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता असल्याचे संकेत दर्शविते. शिवाय केसांच्या गळतीची समस्या आणि त्वचे संबंधित अन्य समस्यांचेदेखील हे एक लक्षण मानले जाते.
६) लांब/ गडद काळ्या रेषा – आपल्या नखांवर जर लांब अथवा गडद अश्या रेषा दिसत असतील, तर दुर्लक्ष करणे अतिशय धोकादायक ठरू शकते. कारण या रेषा आपल्या हृदयाशी संबंधित आजारांबाबतचे संकेत देत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या रेषा दिसत असल्यास हलगर्जीपणा न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.