निरोगी आरोग्यासाठी कोथिंबीर अतिशय गुणकारी; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोथिंबीर असा पदार्थ आहे जो प्रत्येक घराघरातील गृहिणीच्या वापरात असतो. कोथिंबिरीची पाने स्वच्छ धुवून चिरली आणि पदार्थांवर पसरली कि पदार्थांचे रुपडे अगदी पाहावे तितके मोहक भासते. मात्र कोथिंबिरीचा वापर हा पदार्थ सजविण्याकरिता मर्यादेत नसून तिचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी १०० टक्के गुणकारी आणि लाभदायक असते. कारण कोथिंबिरीमध्ये आपले आरोग्य निरोगी राखण्याचे सर्व गुणधर्म सामील असतात.
कोथिंबीरीची हिरवीगार पाने आपल्या आहारात असल्यास अनेक व्याधींपासून दूर राहता येते. कोथिंबीर ताज्या ताकात टाकून प्यायल्याने अपचन, मळमळ, अतिसार आणि आतड्याला आलेली सूज यांपासून आपला बचाव होतो. तर जाणून घेऊयात कोथिंबीरीचे आरोग्यवर्धक फायदे.
१) चेहऱ्यावरील मुरुमांपासून बचाव – कोथिंबीरमध्ये अँंटीसेप्टिक आणि अँटीऑक्सीडंट गुण असतात जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. शिवाय यामध्ये विटामिन सी असल्यामुळे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास याची मदत होते. कोथिंबीरीच्या ताज्या पानांचा केवळ एक चमचा ज्यूस आणि त्यात थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर मुरूमांच्या जागी लावल्यास अगदी काहीच काळात ते बरे होतात.
२) पोटाच्या समस्या – कोथिंबीरीची पाने विशेषतः पचन तंत्रासाठी फायदेशीर आहेत. हे यकृत नीट राखण्यासाठी मदत करतात. यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. कोथिंबीर, हिरवी मिर्ची, किसलेले ओले खोबरे आणि एक लहान तुकडा आले घालून चटणी तयार करून त्याचे सेवन केले असता अपचनाच्या समस्यांवर मात करता येते. शिवाय अर्धा ग्लास पाण्यात दोन चमचे कोथिंबिरीच्या बिया अर्थात धणे टाकून प्यायल्याने आतड्यांची सूज कमी होते आणि पोटदुखीची समस्या देखील दूर होते.
३) मासिक पाळीदरम्यान त्रास – मासिक पाळीच्या वेळी अनेक स्त्रियांना अधिक रक्तस्त्राव होण्याची समस्या भेडसावते. याकरिता ६ ग्रॅम धणे साधारण अर्धा लीटर पाण्यात उकळून घ्या. हे पाणी त्याच्या प्रमाणापेक्षा अर्धे झाल्यानंतर त्यात चिमूटभर साखर मिसळून ते गरम पाणी प्या. यामुळे मासिक पाळीदरम्यान जाणवणारे अन्य त्रास देखील दूर होतात.
४) टायफाइड – टायफाइड झाला असल्यास कोथिंबिरीच्या ताज्या पानांचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर असते. शिवाय कोरडे धणे पाण्यात उकळून पाणी गाळून थंड करून ते पाणी प्यायल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होते.
५) डोळ्यांच्या समस्या – कोथिंबीरमध्ये विटामिन ए असते. जे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. याकरिता नियमित हिरव्या कोथिंबीरची पाने न शिजवता किंवा शिजवून आहारात खाणे फायदेशीर ठरते. जेणेकरून डोळ्यांच्या समस्यांपासून सुटका मिळते. शिवाय कोथिंबीरीत आढळणारे अँटीऑक्सिडंट गुण हे डोळ्यांना येणारी खाज, सूज आणि नेत्रविकारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात.