कोरोना होऊन गेल्यावर नखं तुटत असतील तर करा हे उपाय; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। गतवर्षापासून कोरोना विषाणूने अनेक लोकांचा प्राण घेतला आहे. यानंतर आता कुठे थोडा दिलासा मिळू लागला आहे. कारण संक्रमित लोकांच्या बरे होण्याची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र चिंतेची बाब अशी कि, कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांना कोरोनातून बरे झाल्यावर फंगल इनफेक्शन, लाल डाग, अंगावर चट्टे अशा समस्या जाणवत आहेत. तर काहींची नखं ठिसूळ होत आहेत. अश्यावेळी नखे मोठ्या प्रमाणात तुटू लागतात. यासाठी नखांची घरच्याघरी काळजी घेणे गरजेचे आहे.
मुळात कोरोनामुळे शरीर डिहायड्रेट होते आणि अशा समस्या उदभवू लागतात. दरम्यान नखे पांढरी पडणे वा ठिसूळ होऊन तुटणे या समस्या जाणवतात. यासाठी कोरोनाच्या काळात आणि कोरोनातून बरे होताना नखांची स्वच्छता आणि काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया, कोरोनमुक्तीनंतर नखांची काळजी कशी घ्यावी..
– कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा परिणाम शरीरातील प्रत्येक अवयवावर होत असतो. त्यामुळे या दरम्यान इतर अवयवांप्रमाणे नखांची काळजी घेणेदेखील तितकेच आवश्यक आहे. कोरोना झाल्यावर अथवा कोरोनामधून बरं होताना जर नखांची खालीलप्रमाणे काळजी घ्याल तर नखांचे सौंदर्य कधीच कमी होणार नाही. शिवाय नखं ठिसून असणे हे आरोग्य बिघडल्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. तेव्हा नखांच्या ठिसूळ होण्यामधून आरोग्याची स्थिती ओळखा आणि वेळीच काळजी घेऊन आरोग्य सुधारा. खालीलप्रमाणे घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही नखांचे आरोग्य राखू शकता.
१) ऑइल मसाज – साध्या तेलानेही हाताची आणि नखाची काळजी घेता येते. फक्त यासाठी दररोज रात्री झोपताना हातांना आणि नखांना नारळाचे तेल, बदामाचे तेल किंवा तुमच्याकडे उपलब्ध असणारे कोणतेही बॉडी ऑईल लावा. असे दररोज केल्याचे नखांचे आरोग्य सुधारते व नखे तुटण्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळते.
२) स्क्रब – कोरोना व्हायरसचा प्रभाव शरीरातील प्रत्येक अवयवावर पडत असतो. यामुळे कोरोनातून बरं होताना हात नियमित स्क्रब केले पाहिजे. यामुळे इनफेक्शन नष्ट होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर हातावरील डेड स्किन आणि नखांचे तुटलेले क्युटिकल्ससुद्धा निघून जातात.
३) सौम्य साबणाचा वापर – कोरोनानंतर जर नखं ठिसूळ वा कमकुवत होऊन तुटत असतील, तर नखांसाठी सौम्य साबण अथवा सौम्य शॅम्पूचा वापर करावा. एवढंच नव्हे, तर हात स्वच्छ धुतल्यावर हात आणि नखं यांवर चांगल्या प्रतीचे मॉइस्चराईझर देखील लावा. याचा नक्कीच फायदा होईल.
४) हॅन्ड क्रिमचा वापर – हात आणि नखांची काळजी घेण्याचा अगदी सोपा उपाय म्हणजे दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना हॅन्ड क्रिमचा मसाज करणे. यामुळे हात आणि नखे कोरडे पडणार नाहीत आणि परिणामी कमकुवतपणा येणार नाही.