|

अचानक कुणाला फिट आली तर काय कराल?; जाणून घ्या लक्षणे, कारणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अपस्मार हा मेंदूच्या चेता संस्थेसंबंधित एक आजार आहे. हा आजार असणाऱ्या व्यक्तीस फिट येते. या आजारात जन्मतः मेंदूत असणारा दोष किंवा डोक्याला एखाद्या अपघातामुळे झालेली गंभीर वा किरकोळ इजा यामुळे फिट किंवा झटके येतात. मुळात अपस्मार हा कोणत्याही वयातील लोकांना होऊ शकतो. पण स्वाभाविकपणे हा आजार लहान मुलांमध्ये दिसतो आणि दिवसागणिक वाढतच जातो. या आजारात येणाऱ्या फिटस् टाळता येत नाहीत मात्र त्यावर नियंत्रण मिळविता येते.

– एखादी व्यक्ती अगदी सेकंदात बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळते आणि तीचे हात, पाय अगदी घट्ट आवळून घेत काही विचित्र शारीरिक हालचाली करते. इतकेच काय तर असे झाले असता त्या व्यक्तीच्या तोंडातून फेस किंवा लाळ येते. हि स्थिती एक विकार असून याला फिट येणे, फेफर येणे, मिरगी किंवा एपिलेप्सी म्हणून ओळखले जाते. चला तर जाणून घेऊयात फिट येण्याची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय.

० लक्षणे –
१) चालता चालत अचानक तोल जाणे.
२) अशक्तपणा येणे.
३) चक्कर येऊन बेशुद्ध पडणे.
४) शरीर आखडणे.
५) संपूर्ण शरीर ताठरणे.
६) विचित्र शारीरिक हालचाली होणे.
७) दातखिळी बसणे.
८) तोंडातून फेस येणे.
९) डोळे फिरविणे.
१०) शुद्ध हरपणे.

० कारणे – मुख्य म्हणजे मानसिक थकवा, कामाचा ताण, अपूर्ण झोप, तीव्र ताप, उच्च रक्तदाब, रक्तातील साखर कमी होणे, मासिक पाळी, नैराश्य, तीव्र जखमा, कडक उन, अतिगरमी, घुसमट यामुळे फिट येण्याची संभावना वाढते.

० अचानक कुणाला फिट आली तर काय कराल..?
१) घाबरू नका.
२) शांत राहा.
३) फिट आलेल्या व्यक्तीस जबरदस्ती हलवू नका.
४) आजूबाजूला इजा पोहचविणाऱ्या वस्तू असल्यास त्या दूर करा.
५) त्या व्यक्तीस एका कुशीवर वळवावे. ज्यामूळे तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस बाहेर पडेल.
६) रुग्णाला पाठीवर पालथे झोपवून डोक्याखाली उशी ठेवा.
७) रुग्णाचे तोंड उघडण्यासाठी कोणतीही वस्तू वापरू नका.
८) चप्पल, कांदा यासारख्या वस्तू रुग्णाच्या नाकाला लावू नका.

० घरगुती उपाय –
१) आवश्यक आहे तितकी झोप घ्यावी.
२) दररोज योग व ध्यानधारणा करावी.
३) चहा, कॉफी, सिगारेट, बीडी, तंबाखू आणि अल्कोहोल यांचे सेवन प्रामुख्याने टाळावे.
४) नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
५) डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत.

महत्त्वाचे – डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,  ह्या आजाराला पूर्ण क्युअर नाही. म्हणजे अगदी रेअर केसेस मध्ये औषधे न घेता माणूस राहू शकतो. फिट्स कंट्रोल करण्यासाठी आयुष्यभर औषधे घेणे हे एकच सोल्युशन आहे.

या झटक्यामध्ये साधारण २-३ मिनिटपर्यंत रुग्णाची शुध्द हरपते आणि थोड्या वेळात रुग्ण आपोआप शुद्धीवर येतो. पण १० मिनिटांहून अधिक वेळ रुग्ण शुद्धीवर आला नाही, तर त्याला तातडीने दवाखान्यात न्यावे कोणतेही अन्य उपाय करत बसू नये.

टीप – अशा रुग्णांनी आपल्या खिशात किंवा पर्समध्ये आपले नाव, पत्ता, घरातील जबाबदार व्यक्तींचे संपर्क क्रमांक लिहिलेली आणि सोबत आपण या आजाराने ग्रस्त असल्याचे लिहून ठेवावे. शिवाय फिट आल्यास काय करता येईल हेदेखील नमूद करावे.