कडू पण आरोग्यदायी कारल्याची भाजी अशी कराल तर मुलंही आवडीने खातील; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असं होत कि लहान मुलं आपल्या आईला अगदी हौसेने हुंदडत विचारतात कि आई ग आज जेवणात काय भाजी बनवलीस..? आणि मग आई उत्तर देते कारल्याची. हे उत्तर मिळाल्यानंतर मुलांची तोंड अगदी पाहण्यासारखी होतात. कारल्याच्या कडवटपणापेक्षा अधिक कडू त्यांची तोंड पाहून आईलाही हसू आवरत नाही. कारलं चवीला कडू असल्यामुळे अनेकांना ते खाणे आवडत नाही.
पण मुळात कारलं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असत. त्यामुळे कारल्याचे सेवन आवश्यक आहे. पण मुलांना कारलं खाऊ घालणे म्हणजे जणू दिव्यचं. म्हणूनच आम्ही आज कारल्याची भाजी करण्याची एक वेगळी पद्धत तुम्हाला सांगणार आहोत. हि भाजी बनवल्यानंतर लहान मुलांपासून अगदी नाकं मुरडणाऱ्या मोठ्यांपर्यंत सगळे हि भाजी खातील. चला तर जाणून घेऊयात साहित्य, कृती आणि कडू कार्ल खाण्याचे फायदे.
० कारल्याची भाजी करण्याची पद्धत :-
– साहित्य :
कारले २५० ग्रॅम
मोहरी १ छोटा चमचा
जीर १ छोटा चमचा
तेल १ चमचा
लिंबाचा रस २ चमचे
साखर १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
हिंग चिमूटभर
लसणाची पेस्ट १ टेबलस्पून,
लाल तिखट १ चमचा
हळद पावडर १/४ चमचा
धणा पावडर १/२ चमचा
गोडा मसाला १ चमचा
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट २ चमचे
भाजलेल्या कारळांच कूट १ चमचा
भाजलेल्या तिळाचे कुट १/२ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर छोटी वाटी
– कृती :
कारल्याचे गोल आणि पातळ काप करून त्यातील बिया काढून टाका. एका कढईत तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या. जीरं – मोहरी तडतडली की त्यामध्ये कारल्याचे काप घालून थोडी शिजवा आणि मग त्यामध्ये मीठ घाला. यानंतर त्यात लिंबाचा रस घालून भाजी परतून घ्या आणि त्यात साखर घाला. यानंतर कारले चांगले शिजू द्या. यावेळी गॅस पूर्णपणे मंद असू द्या म्हणजे भाजी जळणार नाही. भाजी थोडी नरम झाली की त्यामध्ये आलं – लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गोडा मसाला किंवा काळा मसाला आणि शेंगदाणा तिळाचे कूट, कारळाचे कूट घालून भाजी व्यवस्थित मिसळा. जर भाजी कोरडी झाली असेल, तर त्यात थोडासा पाण्याचा हापका मारा. आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. झाली तुमची कडू कारल्याची चविष्ट भाजी तयार.
० कारल्याच्या भाजीचे फायदे –
१) दमा असणाऱ्यांसाठी कारल्याची भाजी लाभदायक असते. त्यामुळे या रुग्णांनी कारल्याचा आहारात समावेश करावा.
२) पोट खराब होण्याचा आणि गॅसेसचा त्रास वारंवार होत असेल तर कारल्यासारखा उत्तम इतर कोणताच पर्याय नाही.
३) कारल्यासोबत कारल्याची पानेसुद्धा आरोग्यदायी असतात. कारल्याची भाजी खाल्ल्याने आणि कारल्याचा रस प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.
४) रक्त शुद्धी करणासाठी कारले मदत करते. त्यामुळे ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांच्यासाठी कारले आरोग्यदायी आणि अतिशय फायदेशीर ठरते.
५) तसेच कारले खाल्ल्यामुळे त्वचादेखील टवटवीत आणि डागरहित राहते.