पावसाळ्यात ‘हि’ रानभाजी खाल तर आरोग्यास होईल लाभ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम भजी, कणीस आणि वाफाळलेल्या चहाची डिमांड एकदम जोरावर असते. हे सारे पदार्थ धूसर धुके आणि रिमझिम सरींचा आनंद द्विगुणित करतात. मात्र यातील एकही पदार्थ आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम नाही. आपण सारेच जाणतो कि पावसाळ्याच्या दिवसात विशेष करून काही अश्या भाज्या बाजारात दिसतात ज्या भाज्या बाकी वर्षभर सहसा उपलब्ध होत नाहीत. मात्र पावसाळा सुरु झाला कि अनेको भाज्यांचा ढीग बाजारात दिसतो. या भाज्यांना रानभाज्या म्हणून ओळखले जाते. आपल्या महाराष्ट्रात अनेको जिल्ह्यांमध्ये पावसाळी दिवसांत या रानभाज्यांचा विशेष महोत्सव भरतो. या महोत्सवांमध्ये या रानभाज्या विविध पद्धतीने बनवून सादर केलेल्या असतात. ज्या आपण स्वेच्छेने चाखू शकतो. या रानभाज्या अतिशय चमचमीत नसल्या तरीही चविष्ट आणि आरोग्यासाठी लाभदायक असतात. यांपैकी एक भाजी म्हणजे ‘कुडा’ची भाजी. हि भाजी चवीने उत्तम आणि आरोग्यासाठी अतिउत्तम आहे. कुडाच्या शेंगा आणि फुले या दोघांचीही भाजी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हि भाजी प्रामुख्याने बल्लारपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, जिवती या भागांमध्ये आढळते. चला तर जाणून घेऊयात हि भाजी बनविण्याचे साहित्य, कृती आणि भाजीचे औषधी गुणधर्म खालीलप्रमाणे:-
१) कुडाच्या फुलांची भाजी
० साहित्य
– कुडाची फुले २ वाटी
– तेल १ चमचा
– बारीक चिरलेला कांदा १ मोठा
– हिरवी मिरची २ – ३
– लसूणीच्या पाकळ्या ५- ७
– जिरं १ छोटा चमचा
– तिखट १ चमचा
– मीठ चवीनुसार
– हळद १ छोटा चमचा
– टोमॅटो १
– कोथींबीर
० कृती
– एका पातेल्यात एक ग्लास पाण्यात कुडाची फुले उकळून घ्या. यानंतर त्यातील पाणी नितळून घ्या. यानंतर एक पातेले घेऊन त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, लसुण, जिरं, बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित परतून घ्या. यानंतर त्यात हळद, तिखट आणि मीठ घालून अर्धवट शिजवून घ्या. पुढे यात उकळलेली कुडाची फुले घाला आणि व्यवस्थित परतून शिजू द्या. एकदा भाजी शिजली कि त्यात वरून चिरलेली कोथींबीर घाला. तुमची कुडाच्या फुलांची भाजी तयार.
२) कुडाच्या शेंगांची भाजी
० साहित्य
– कुडाच्या शेंगा ५ ते ७
– चिरलेला कांदा १ मध्यम
– लसूण ५ ते ७ पाकळ्या
– जिरं १ चमचा
– हळद १ छोटा चमचा
– लाल तिखट २ चमचे
– गोड मसाला १ चमचा
– काळ्या तिळाचे कूट १ चमचा
– तेल २ चमचे
– मीठ चवीनुसार
– कोथिंबीर
० कृती
– एका पातेल्यात तेल गरम करून त्यात लसूण, जिरं आणि कांदा परतून घ्या. यानंतर त्यात हळद, लाल तिखट, गोडा मसाला घालून व्यवस्थित परतून घ्या. यानंतर त्यात कुडाच्या शेंगा घालून मसाला भाजीला लागेल इतक्या काळजीने मिक्स करा आणि हलक्या पाण्यात शिजू द्या. भाजी हलकी शिजल्यानंतर त्यात मीठ आणि काळ्या तिळाचे कूट घाला. यानंतर झाकण लावून ५ ते ७ मिनिटे भाजी शिजुद्या. भाजी शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर वरून घाला. तुमची कुडाच्या शेंगांची भाजी तयार.
० कुडाच्या भाजीतील औषधी गुणधर्म खालीलप्रमाणे:-
– अनेको औषधांमध्ये कुडाच्या मुळाचे सालं आणि बिया यांचा वापर केला जातो. हि औषधे कुष्ठरोग, त्वचारोग यांमध्ये गुणकारी असते. धावरे, रक्तस्रावयुक्त मुळव्याध, थकवा या समस्यांवर कुडाच्या बिया लाभदायक आहेत. तसेच या बियांचे चूर्ण चिमूटभर रोज खाल्याने आपण खाल्लेले अन्न व्यवस्थितरीत्या जिरते. तसेच पोटात वायु (गॅस) धरत नाही आणि अतिसार, ताप, काविळ, कुष्ठरोग, कफ, त्वचा विकार, पित्तकोष या आजारांसाठी कुडाची साल गुणकारी आहे.