किचनमधले मसाले सारखे होतात खराब? मग या टिप्स वापरा ना; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुमच्या मते, किचनमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं..? डाळ? तांदूळ? का मग जिरं – मोहरी? बरं .. बरं .. हे सगळंच महत्वाचं असतं आणि मसाले? ते महत्वाचे नसतात का? अहो किचन म्हटलं कि खवय्यांची दुखती नस. कारण एका पदार्थाला दुसऱ्या पदार्थाची साथ नसेल तर खाना भी कोई खाने कि चीज है? असं होत. त्यामुळे किचनमध्ये वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट अर्थात प्रत्येक पदार्थ महत्वाचाही आहे आणि त्याची काळजी घेणे हे देखील महत्वाचे आहे.
त्यात पावसाळा म्हटलं की सतराशे साठ कटकटी मागे लागतात. बघा ना..! अगदी कपडे न वाळण्यापासून ते किचनमधले मसाले ओले, बेचव, रंगहीन आणि खराब होण्यापर्यंत अनेक समस्या उदभवतात. मुख्य म्हणजे पावसाळी हंगामाचा सर्वाधिक प्रभाव हा मसाले किंवा मीठ, साखर यांच्यावर जास्त होत असतो. कारण वातावरण दमात असल्यामुळे हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असते. परिणामी पदार्थांमध्ये पाणी तयार होते आणि पदार्थ खराब होतो. बऱ्याचदा साखर आणि मीठाला पाणी सुटल्याचे आपण पहिले असेल. त्याचे मूळ कारण दमट वातावरण असते. अनेकदा मसाल्यामध्ये छोटे किडे किंवा बुरशी जमा होते. ज्यामुळे मसाले खराब होतात आणि वापरण्यायोग्य राहत नाहीत. अश्या समस्या तुम्हालाही जाणवत असतील काही सोप्प्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या किचनमधील मसाल्यांची काळजी घेऊ शकाल खालीलप्रमाणे:-
१) मीठ असो, साखर असो किंवा मग मसाले असोत तुम्ही हे सर्व पदार्थ खराब होऊ नये म्हणून काचेच्या बाटलीमध्ये ठेवू शकता.
२) तुम्ही वापरात असलेला काचेचा डबा किंवा बरणी कायम एअर टाइट असणे गरजेचे आहे.
३) कोणतेही मसाल्याचे पदार्थ, साखर किंवा मीठ ठेवण्यासाठी चीनी मातीचं भाडं वापरणं देखील फायद्याचे ठरते.
४) मीठ किंवा साखरेचा ओलावा शोशून घेण्यासाठी खडा मसाल्यातील लवंग हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे लवंगाचे दाणे साखरेमध्ये ठेवा यामुळे साखरेला पाणी किंवा मुंग्या लागत नाहीत.
५) याशिवाय मसाले खराब होऊ नये म्हणून मसाल्यांमध्ये बिब्बा वापरावा. बिब्ब्यामुळे मसाल्यामध्ये किटक होत नाहीत किंवा बुरशीदेखील लागत नाही.
६) सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक घरात मसाले असो किंवा मीठ, साखर या पदार्थाना ओले हात लावू नका. शिवाय ओला चमचा देखील वापरू नका. एका पदार्थातील चमचा दुसऱ्या पदार्थात घालू नका. प्रत्येक पदार्थासाठी एक एक वेगळा चमचा ठेवा. कारण चमचा किंवा हात ओले असतील तर त्यामुळे पदार्थाना बुरशी लागण्याचा धोका अधिक असतो.
७) तांदळाचे दाणे हे पदार्थातील बाष्प शोषून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी तुम्ही जेव्हा डब्यात साखर किंवा मीठ भारत तेव्हा तळाला आधी तांदुळाचं एक छोटं पुडकं बांधून ठेवा. यामुळे बरणीत दमटपणा नाहीसा होतो आणि पदार्थाला पाणी सुटणार नाही.