शरीराचा दाह कमी करण्यासाठी दुर्वा म्हणजे सर्वोत्तम पर्याय; जाणून घ्या इतर फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। संपूर्ण जगतातील लाडके आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा आणि आपल्या बाप्पाला मोदक, जास्वंद आणि २१ दुर्वांची जुडी फार प्रिय आहे. बाप्पाला दुर्वा प्रिय असण्यामागे एक मोठी आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या राक्षसाने जेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये थयथयाट माजवला होता तेव्हा बाप्पाने त्याचा संहार करून सर्वांचे रक्षण केले होते. पण झाले असे कि, हा राक्षस काही साधासुधा नव्हता. अहो अनल अर्थात अग्नी. पण सृष्टीच्या रक्षणासाठी बाप्पाने या असूराला गिळून टाकले. पण यामुळे बिचाऱ्या बाप्पाच्या शरीरामध्ये जणू ज्वाला उसळू लागल्या. आगीचा गोळा गिळल्याप्रमाणे बाप्पाच्या अंगाची अगदी लाही लाही होऊ लागली. शेवटी ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी बाप्पाला खाण्यास दिल्या. यानंतर अचानक चमत्कार झाला आणि बाप्पाच्या पोटातली जळजळ कमी झाली आणि बाप्पा आनंदे नाचू लागला. तेव्हा बाप्पाने सांगितले होते कि, मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल.
बघा.. ज्या दुर्वा गणांचा अधिपती गणपती बाप्पाची चिंता मिटवू शकतात, त्या तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकणार नाहीत का? दुर्वांना जसे अध्यात्मात विशेष महत्व आहे तसेच आयुर्वेदातही दुर्वांना उच्च स्थान आहे. कारण दुर्वामध्ये कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रोटीन या सर्व आवश्यक तत्त्वांचा मुबलक साठा समाविष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊयात दुर्वांचे आरोग्याशी संबंधित फायदे खालीलप्रमाणे:-
– दुर्वा ही एक औषधी वनस्पती असून आरोग्याशी संबंधित अनेको तक्रारींवर प्रभावी आहे. पोटात जळजळ आणि इतर विकारांसाठी दुर्वा सर्वोत्तम पर्याय आहे. शिवाय मानसिक शांतीसाठीसुद्धा दुर्वा लाभकारक आहेत. इतकेच काय तर, कर्करोगाच्या रुग्णांवरही दुर्वा लाभप्रद असल्याचे शास्त्रज्ञांना एका संशोधनात आढळून आले आहे.
१) हृद्याच्या कार्यप्रणालीत सुधार – दूर्वांमुळे आपल्या शरीरातील रक्तात असणाऱ्या साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. याशिवाय बॅड कोलेस्ट्रेरॉलच्या वाढीवरदेखील दुर्वा रोख लावतात. परिणामी ह्द्याचे कार्य सुधारते आणि हृदय रोगाची शक्यता कमी होते. यासाठी दुर्वांचा रस पिणे फायद्याचे ठरते.
२) रोग प्रतिकारक शक्तीत वाढ – निरोगी आरोग्यासाठी उत्तम रोग प्रतिकारक शक्ती असणे गरजेचे आहे. यासाठी दुर्वांचा रस फायदेशीर ठरतो. कारण दूर्वांमुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती सुधारते आणि कमकुवत रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होत. यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला सक्षमपणे लढण्याची क्षमता मिळते.
३) रक्त शुद्धीकरण – दुर्वांमध्ये आपल्या शरीरातील रक्त नैसर्गिकरित्या शुद्ध करण्याची ताकद असते. तसेच दुर्वांमूळे इजा, जखम किंवा मासिकपाळीत होणारा अतिरिक्त प्रमाणातील रक्तप्रवाह थांबतो. यासाठी दूर्वांसोबत सुंठ, हळद आणि मध मिसळून काढा बनवून प्यावा.
४) लाल रक्तपेशींत वाढ – दुर्वा शरीरातील लाल रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात. परिणामी शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण व्यवस्थित राहते. यामुळे अॅनिमियावर मात करता येते. यासाठी दुर्वांचा काढा फायदेशीर ठरतो.
५) रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते – दुर्वांमध्ये ‘हायपोग्लायस्मिक इफेक्ट’ असतो असे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे मधूमेहींनी दुर्वांचा रस पिणे फायदेशीर ठरते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि मधुमेहींना फायदा होतो.
६) पचनप्रक्रिया सुधारते – नियमित दुर्वांचा रस प्यायल्यामूळे पचनप्रक्रिया सुरळीत होते. शिवाय पोट साफ राहते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मात करता येते.
७) पित्तावर प्रभावी – नियमित दुर्वांचा रस सकाळी काहीही न खाता प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होतो आणि शरीर नैसर्गिकरित्या डीटॉक्स होते.
८) तोंडाचे आरोग्य सुधारते – दुर्वांमध्ये ‘फ्लॅवोनाईड्स’ या पोषक घटकांचा समावेश असतो. त्यामुळे तोंडातील अल्सर होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय हिरड्यांचे आरोग्य सुधारते आणि हिरडेदुखी, हिरड्यांतून रक्त येणे यावर आराम मिळतो. तसेच तोंडातील दुर्गंधीसुद्धा कमी होते.
९) स्त्रियांसाठी फायदेशीर – पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये युरिनरी ट्रॅक इंन्फेकशनची समस्या अधिक आढळते. यासाठी दुर्वा दह्यासोबत खाल्ल्याने मूळव्याध तसेच अंगावरून पांढरे जाणे या समस्या दूर होतात.
१०) त्वचा विकारांपासून सुटका – त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, रॅश येणे अशा त्वचाविकारांवर दुर्वा उपयुक्त आहे. कारण दुर्वांमध्ये असणारे दाहशामक आणि अॅन्टीसेप्टिक गुणधर्म हे आजार कमी करतात. यासाठी दुर्वा हळदीत मिसळून त्याची पेस्ट विकार झालेल्या त्वचेवर लावावी. याचा अधिक गुणकारी प्रभाव मिळतो. तसेच कुष्ठरोगासारख्या गंभीर त्वचारोगांमध्ये दुर्वा उत्तम असा नैसर्गिक उपाय ठरतात.