लिंबू कापताना आडवाच का कापायचा?; जाणून घ्या कारण
हॅलो आरोग्य ऑनलाईन। ‘लिंबू’ हे एक असे फळ आहे, ज्याच्याशी आपण सारेच परिचित आहोत. अगदी लिंबू सरबत पासून ते विविध अन्न पदार्थांची चव वाढविण्यासाठी वापरला जाणारा लिंबू आकाराने लहान असला तरीही त्याचे अनेको गुणधर्म आरोग्यदायी असतात. लिंबू आपल्या शरीराचा दाह कमी करण्यासाठी तसेच तहान शमविण्यासाठीसुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. शिवाय थकवा दूर करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठीदेखील लिंबाच्या रसाचा वापर केला जातो. देशात लिंबू उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. दरम्यान संपूर्ण देशात लिंबाचे सुमारे १८ लाख मे. टन इतके उत्पादन घेतले येते. त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे १.४० लाख मे. टन इतक्या लिंबाचे उत्पादन घेतले जाते. आपल्या देशामध्ये इतर भाज्यांप्रमाणेच लिंबालाही एक विशेष महत्त्व आहे. इतकेच काय तर लिंबाविषयी विविध समज गैरसमज देखील आहेत.
आपल्याकडे कोणत्याही स्वयंपाकघरात लिंबू आढळतोच. कारण उपमा असो नाहीतर पुलाव लिंबाचा रस हवाच. पण काय आहे, स्वयंपाक घर एक असे ठिकाण आहे जिथे अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे व्यवधान पाळावे लागते. जसे कि, कांदा चिरण्यापासून ते एखादा पदार्थ बनविण्यापर्यंत. साधारणपणे या यादीत लिंबू चिरणे ही कृतीही समाविष्ट असते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल कि, आपल्या घरातील मोठे जाणकार लोक नेहमी स्वयंपाक करणाऱ्या मुलामुलींना लिंबू आडवे कापण्याचा सल्ला देतात. आता यामागे वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात. पण मुळात याचे कारण असे कि, लिंबू उभे कापल्यास त्यातून रस बाहेर येत नाही. म्हणजेच लिंबू त्याच्या देठाकडून उभा न कापता तो आडवा धरून मध्यभागी कापणे अधिक फायदेशीर असते. या क्रियेमागे शास्त्रीय कारण आहे हे अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे लिंबू कंपन्यांच्या क्रियेबाबत अनेक विविध तर्क लावले जातात.
वास्तविक लिंबाच्या आतील भाग छोट्या छोट्या १०-१२ पाकळ्यांचा बनलेला असतो. जसे कि संत्र, मोसंबीला पाकळ्या असतात अगदी तसेच लिंबातही पाकळ्या असतात. अशा प्रत्येक पाकळ्यात लिबांचा गर रसासहित साठलेला असतो. त्यामुळे जर लिंबू उभे चिरले तर सुरी प्रत्येक खणाला भेदून प्रत्येक पाकळीच्या आरपार जात नाही. त्यामुळे अशा लिंबाच्या तुकड्याचा रस पिळल्यावर तो सहज बाहेर पडत नाही. हेच जर लिंबू आडवे कापले तर सुरी प्रत्येक पाकळीला छेदून आरपार जाते आणि लिंबाचा तुकडा पिळल्यावर त्याचा रस अगदी सहजरित्या बाहेर पडतो. म्हणूनच लिंबाचा रस सहज मिळवण्यासाठी लिंबू उभे नाही तर आडवे चिरायचे असते.