रात्री झोपण्याआधी गुळाचा एक खडा खा आणि मिळवा आरोग्यदायी लाभ; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोकांना गोड खायला खूप आवडते. त्यात काही लोक तर न चुकता जेवणानंतर काही ना काही गोड खातातच. पण अधिक गोड खाणे आरोग्यासाठी लाभदायक नसते. त्यामुळे गोड खाण्याला काहीतरी पर्याय हा हवाच आणि याला पर्याय आहे तो म्हणजे ‘गुळ’. होय. कारण गुळ नैसर्गिकरित्या गोडवा देणारा पदार्थ असल्यामुळे तो खाल्ल्याने शरीराचे नुकसान होत नाही. याउलट गुळाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. त्यामुळे अगदी चहा बनवतानासुद्धा साखरेला पर्याय म्हणून गुळ वापरणे फायद्याचे ठरते.
गुल खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे गुळाचा आहारात समावेश करावा. पण ज्या लोकांना रात्री जेवणानंतर झोपण्याआधी गोड खायची सवय आहे त्यांनी रात्री गुळाचा एक खडा खाणे अधिक लाभदायक ठरते. याचे कारण असे कि, गुळामध्ये पोषक तत्त्वांचा अधिक प्रमाणात समावेश असतो. प्रोटीन, व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन बी ६, फॉलेट, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस आणि सेलेनिअम यासारख्या कित्येक पोषक घटकांचा गुळामध्ये समावेश आहे. अहो इतकेच काय तर गुळामध्ये फॅट्स अजिबात नाहीत. त्यामुळे फिट राहण्यासाठी गूळ खाणे १००% लाभदायक आहे. चला तर जाणून घेऊयात रात्री झोपण्याआधी गूळ खाण्याचे काय फायदे होतात? खालीलप्रमाणे :-
१) संसर्गापासून संरक्षण – बदलत्या वातावरणानुसार संसर्गाचे प्रमाण वाढत असते. परिणामी आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला काही ना काही उपाययोजनांची आवश्यकता असते. यामध्ये गुल फायदेशीर भूमिका निभावतो. कारण गुळाचे सेवन केल्यास त्यामध्ये आढळणारी पोषण तत्त्वे संसर्गाविरूद्ध लढण्याचे आणि शरीराचे संरक्षण करण्याचे कार्य करते.
२) निरोगी शरीर – गुळामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. हे पोटॅशिअम आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटची पातळी संतुलित ठेवते. शिवाय चयापचयाची क्षमता वाढवते. तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, गुळाचे सेवन केल्यास शरीरातील अतिरिक्त पाणी जमा होण्याची समस्या दूर होते. यामुळे शरीर निरोगी राखण्यास निश्चितच साहाय्य होते.
३) अॅनिमियावर परिणामकारक – गुळात लोहाचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात लोहाचा पुरवठा झाल्यास लाल रक्त पेशींची पातळी संतुलित राहते. तसेच शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. यामुळे गुळाचे सेवन केल्यास हिमोग्लोबिन वाढते.
४) बद्धकोष्ठतेपासून आराम – पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यासाठी उपयुक्त पोषण तत्त्व गुळात असतात. ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. विशेष करून बद्धकोष्ठतेची समस्या. गुळातील पोषक घटक डाययुरेटिक स्वरुपात कार्य करतात आणि शरीरामध्ये मल अथवा विषारी पदार्थ जमा होऊ देत नाहीत. त्यामुळे रात्री जेवणानंतर गुळाचा एक छोटा तुकडा खाल्ला तर पचनसंस्थेचं कार्य सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते.
५) यकृताचे आरोग्य – गुळातील पोषण तत्त्व आपले शरीर नैसर्गिक स्वरुपात स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यातील औषधी गुणधर्म यकृत स्वच्छ ठेवण्यास सहाय्यक ठरतात. यामुळे शरीरातील हानिकारक विषारी पदार्थ बाहेर फेकण्याचे कार्य करते. यासोबतच यकृत डिटॉक्सिफाय देखील होते. परिणामी यकृतावरील अतिरिक्त ताण कमी होतो. ज्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहते.
६) मासिक पाळीतील त्रासापासून आराम – मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी करण्यासाठी गूळ फायदेशीर भूमिका निभावतो. गुळातील पोषण तत्त्वांमुळे मूड चांगला राहतो. तसेच गुळाच्या सेवनामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोनचा स्राव होतो, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. परिणामी मासिक पाळीदरम्यान होणारी पोटदुखी कमी होण्यास मदत होते.