अंडाशयाचा कर्करोग म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अंडाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसागणिक वाढताना दिसत आहे. यामुळे वेळीच याविषयी जनजागृती होणे अत्यावश्यक आहे. कारण जनजागृतीचा अभाव, उशीरा होणारे निदान आणि उपचारांची हळू कार्यगती यामुळे हा रोग वेगाने वाढत आहे. साधारण ३५ वयोवर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या महिलांनी सीए-१२५ रक्त चाचणी आणि ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड करुन घ्यावे. कारण या कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास रुग्णांमधील मृत्यूचा दर कमी होऊ शकतो.
मैत्रिणींनो अंडाशयाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये तिसरा आणि अगदी सामान्यपणे आढळणारा कर्करोग आहे. सामान्यतः ५५ ते ६४ वयोगटात हा कर्करोग दिसतो. एका वैज्ञानिक संशोधन आर्टिकलनुसार, हा कर्करोग जगातील सर्वसामान्य कर्करोगांपैकी एक असून ८व्या क्रमांकावर आहे. तर भारतात सर्व कर्करोगाच्या मृत्यूंपैकी ३.३४% मृत्यू हे अंडाशयाच्या कर्करोगामुळे होतात. बहुतेक प्रकरणांचे निदान तिसऱ्या, चौथ्या किंवा शेवटच्या टप्प्यात होते. त्यामध्ये जगण्याचा दर २८% म्हणजे साधारण ५ वर्ष असतो. वेळेवर महिला उपचारासाठी येत नसल्याने निदानास उशीर होतो आणि उपचार करणं अवघडं होतं. पण मुळात अंडाशयाच्या कर्करोगाचं वेळीच निदान झालं तर रूग्णाचा जीव वाचवणे शक्य होते, हे समजून घेणे आवश्यक आहे.
० अंडाशयाचा कर्करोग म्हणजे काय?
– अंडाशयाचा कर्करोग म्हणजे एक घातक ट्यूमर. स्त्रीचे अंडाशय आणि ओटीपोटाच्या अवयवांमध्ये आणि एखाद्याच्या उदर आणि फुफ्फुसातदेखील हा कर्करोग पसरतो.
० लक्षणे – ओटीपोटात दुखणे, सूज येणे, वारंवार लघवी होणे, अचानक वजन कमी होणं, थकवा येणं, आतड्यांच्या कार्यात अडथळा निर्माण होणं हि या कर्करोगाची प्रमुख लक्षणे असून यांकडे दुर्लक्ष करू नये.
० कारणे – गर्भपात, कमी वयात मासिक पाळी सुरू होणे, उशीरा होणारी रजोनिवृत्ती, पहिल्या गर्भधारणेचे उशीरा वय ३५ वर्षांपेक्षा जास्त असणे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, तंबाखू, धूम्रपान आणि कौटुंबिक इतिहास (अनुवंशिकता) इत्यादी.
० उपचारपद्धती – अंडाशयाच्या कर्करोगाचा उपचार हा कर्करोगाचा टप्पा, ट्यूमरचा आकार आणि स्थानावर अवलंबून असतो. शिवाय प्रत्येक व्यक्तीमध्ये याची तीव्रता भिन्न असते. त्यामुळे वेळोवेळी आपल्या शरीराची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे, अंडाशयाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी निश्चित तपासणी तंत्र नाही. मात्र एक नियमित तपासणी ज्यात ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंड (TVUS) आणि सीए १२५ रक्त चाचणी समाविष्ट आहे. याद्वारे कर्करोगाचे निदान करता येते. कारण ट्रान्सव्हॅजिनल अल्ट्रासाऊंडची निवड करून, त्यातील ध्वनी लहरी गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशय तपासण्यास मदत करतात. त्यामुळे कोणतेही लक्षण आढळल्यास वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधने आवश्यक आहे.
० अंडाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी काय करावे?
– अंडाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची काळजी घ्या.
– खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित करा.
– दररोज किमान ७-८ तास शांत झोप घ्या. दररोज व्यायाम करा.
– संतुलित आहार घ्या.
– धूम्रपान करू नका.
– अल्कोहोलचे सेवन टाळा.
– स्तनदा मातांनी बाळाला स्तनपान करा.