|

बाळाने लवकर बोलावं यासाठी करा हे उपाय; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बाळ जन्माला आल्यानंतर ते कधी बोलणार, कधी चालणार याबाबत त्याच्या पालकांना खूप उत्सुकता असते. पण मुळात बाळाची वाढ आणि त्याचा विकास जसा होतो तश्या बाळाच्या शारीरिक हालचाली बदलतात आणि त्यातही वाढ होते. पण बाळाच्या शारीरिक हालचाली वाढल्या कि सगळ्यात जास्त उत्साह असतो तो आधी आई बोलणार कि बाबा. पण अनेकदा काही मुलांच्या बाबतीत असे होते कि मुलं फार उशिरा बोलू लागतात. सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक वेळ मुलांनी घेतला तर पालकांची चिंता वाढते. बरोबर आहे. आपले बाळ अधिक काळ अबोल राहत असेल तर कोणत्याही आई वडिलांना काळजी वाटणारच. पण दोस्तहो, असे झाल्यास घाबरण्याचे व चिंता करण्याचे खरंतर काहीच कारण नाही. कारण, प्रत्येक बाळाचा विकास विविध गोष्टींच्या आधारे वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. त्यामुळे एखादे मूळ लवकर बोलू लागले म्हणून आपलेही मूळ बोलायलाच हवे हा अट्टाहास योग्य नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आपल्या बाळाला योग्य रीतीने उच्चार शिकवून लवकर बोलायला कसे शिकवावे हे सांगणार आहोत.

० बाळ उशीरा का बोलायला शिकतं?
– बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्यात आधी जी क्रिया करताना दिसतं ते म्हणजे रडणे. पण अनेक मुलांच्या बाबतीत असे होते कि ती जन्माला आल्याआल्या रडत नाहीत. अश्या मुलांना वैद्यकीय उपचार करून रडवलं जातं. तर असे म्हणतात कि, अशी मुलं उशीरा बोलायला शिकण्याची शक्यता असते. शिवाय जर बाळ पोटात असताना आईला कोणतीही आरोग्यविषयक समस्या झाली तर, बाळाच्या विकासावर त्याचा परिणाम होतो. या व्यतिरिक्त नैसर्गिक पद्धतीने प्रसूती होताना बाळाला दुखापत झाल्यास त्याच्या ऐकण्याच्या व बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. कारण जी मुलं नीट ऐकू शकत नाहीत त्यांना बोलताना अडचणी येतात.

० बाळ कधी बोलू लागते?
– तज्ञांच्या माहितीनुसार बाळ त्याच्या जन्मानंतर साधारण ६ महिन्यांनी निरनिराळे ध्वनी समजू लागते. यानंतर एकदा का त्यांना या ध्वनीचे म्हणजेच बाहेरून येणाऱ्या आवाजाबद्दल ज्ञान झाले, की त्यांची बोलण्याची क्षमता आपोआपच विकसित होत जाते.

० बाळाने लवकर बोलावं यासाठी करा हे उपाय

१) बाळाने लवकर बोलण्यासाठी त्याची श्रवणशक्ती आधी विकसित व्हावी लागते. त्यामुळे बाळाशी शक्य तितका संवाद साधत राहा.

२) घरात अती शांतता, भांडणे असे वातावरण ठेवू नका. या उलट सतत आनंदी, हसते आणि खेळते तसेच संवादपूर्वक वातावरण ठेवल्यास बाळाची मानसिक स्थिती लवकर विकसित होते आणि बोलण्याची क्षमता येते.

३) बाळ जे आवाज अथवा उच्चार करेल ते तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या तोंडातून काढा. ज्यामुळे बाळाला ते उच्चार पुन्हा पुन्हा करण्याची बाळाला प्रेरणा मिळेल.

४) एकमेकांची नक्कल करणं किंवा एकमेकांसारखं वागणं यातून बाळाची श्रवणशक्ती लवकर विकसित होते.

५) बाळ त्याने उच्चारत असलेले शब्द तुम्ही पुन्हा बोलल्याने बाळ नक्कल करीत पुन्हा उच्चारण करते. त्यामुळे एकदा का बाळ तुमच्यासारखे बोलण्याचा उत्साह दाखवू लागले कि, त्याला नवनवे शब्द सांगा. एखादा शब्द वारंवार त्याच्यासमोर बोलून दाखवा. ज्यामुळे बाळाला नव्या शब्दांचे ज्ञान मिळेल.

६) बाळ तुटक बोलत असेल तेव्हा त्याला अखंड वाक्य बोलून दाखवा आणि ते पुन्हा बोलण्यास शिकवा. जरी बाळ पूर्ण वाक्य बोलू शकले नाही तरी तुम्ही त्याच्यासोबत हा प्रयोग सातत्याने काही दिवस करत राहा.

७) बाळाला एखादे चांगले संगीत वा गाणे ऐकवा. ज्यामुळे त्याच्या श्रवणकेंद्रांचा विकास होईल.

८) गाणं गुणगुणणे हा उच्चार शिकण्याचा एक सोप्पा आणि उत्तम मार्ग ठरेल.

९) दिवसभरात ठराविक वेळेत बाळाशी संवाद साधा. त्याला मंत्र, श्लोक, प्रार्थना म्हणून दाखवा. हा उपाय बाळाचे उच्चार स्पष्ट करण्यासाठी उत्तम आहे.