कलरफुल तुती आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। तुती हे एक असे फळ आहे जे दिसायला अत्यंत आकर्षक आणि वेगळेसे असते. हे फळ त्याच्या खास चवीसाठी ओळखले जाते. थोडं गोड आणि तीक्ष्ण असणारे हे फळ मोरस अल्बा म्हणूनही ओळखले जाते. तुतीचे फळ लाल, काळ्या आणि निळ्या रंगात आढळते. यातील काळी तुती उत्कृष्ट चवीचे फळ मानले जाते. या फळाचा वापर सरबत, जाम, जेली, पाई, चहा इत्यादी बनवण्यासाठी वापरले जाते. हे फळ असेच देखील खायला उत्तम असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण हे फळ अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन-सी, के, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस भरपूर असतात. शिवाय फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्सदेखील असतात. यामुळे तुती खाल्ल्याने बरेच आरोग्यविषयक फायदे मिळतात. चला तर जाणून घेऊयात तुती खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे :-
१) रोग प्रतिकारशक्तीत वाढ – तुतीमध्ये व्हिटॅमिन- सी मोठ्या प्रमाणात आढळते. ज्यास कोणत्याही रोग किंवा बाह्य घटकांविरूद्ध एक शक्तिशाली बचावात्मक शस्त्र मानले जाते. यामुळे तुती खाणे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे आपले संसर्गांपासून रक्षण होते.
२) रक्तदाब नियंत्रणात – तुतीचे नियमित सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानले जाते. कारण तुती खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रित होण्यासाठी मदत होते. तुतीमध्ये आढळणारे गुणधर्म रक्तवाहिन्यांना शिथिल करतात आणि रक्त गुठळ्या, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यासारख्या आजारांची शक्यता कमी करतात.
३) पचन सुधार – तुतीमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. जे पाचक आरोग्य सुधारण्यास मदत करते. यामुळे तुतीचे नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठता आणि पेटके कमी होतात. शिवाय तुतीमध्ये आढळणारे गुणधर्म शरीरात लाल रक्त पेशी तयार करण्यास प्रोत्साहन देतात.
४) हाडांसाठी फायदेशीर – तुतीमध्ये व्हिटॅमिन-के, कॅल्शियम तसेच फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे घटक मोठ्या प्रमाणात समाविष्ट असतात. जे हाडांच्या ऊतींची निर्मिती आणि देखभालसाठी फायदेशीर ठरतात. हे हाडे मजबूत बनवतात आणि हाडांशी संबंधित विकार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.
५) निरोगी केस – तुतीमध्ये आढळणारे काही गुणधर्म केसांना निरोगी बनविण्यास मदत करतात. हे केसांच्या वाढीस प्रोत्साहित करतात आणि केस गळतीस प्रतिबंध करतात. शिवाय तुती खाणे त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते. हे फळ चेहऱ्यावरील गडद डाग कमी करते.