भटका कुत्रा चावल्यास त्वरित करा ‘हे’ उपचार, अन्यथा..; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा रस्त्यावरून अगदी सहज चालताना एखाद्या भटक्या कुत्र्याने आपल्यावर हल्ला केला वा ओरबाडले, चावा घेतला तर वेळीच त्यावर प्रथमोपचाराची आवश्यकता असते. साहजिकच अचानक हा प्रसंग घडल्यामुळे थोडे बाचकायला होते, घाबरायला होते. मात्र अश्यावेळी आपल्यासोबत कुणीही नसेल तर गळून जाऊ नका. आम्ही सांगतो ते प्रथमोपचार करा आणि आरोग्याची हानी टाळा. अन्यथा संसर्ग पसरण्याचा धोका असतो.
० कुत्रा चावल्यामुळे आरोग्याची हानी कशी होते?
१) संसर्ग होतो – एखाद्या व्यक्तीला कुत्रा चावला तर प्रामुख्याने संसर्गाचा धोका अधिक असतो. कारण, कुत्र्याच्या तोंडात बॅक्टेरिया असू शकतात. यामुळे कुत्रा चावल्यावर हे बॅक्टेरिया संबंधित व्यक्तीच्या शरीरात येऊ शकतात. दरम्यान कुत्र्याच्या चाव्याव्दारे त्वचा सोलली गेल्यास बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
२) जर एखादा कुत्रा खूप खोलवर चावला असेल तर तो मानवी शरीरातील नसा, स्नायू आणि रक्तवाहिन्यांना इजा करू शकतो. हि जखम लहान असली तरीही खोलवर असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
३) मोठ्या कुत्र्याच्या चाव्यामुळे मानवी शरीरातील हाडदेखील मोडू शकते. विशेषतः पाय, किंवा हाताचे हाड. अशा परिस्थितीत ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे अत्यंत आवश्यक असते.
४) रेबीज – भटका पिसाळलेला कुत्रा चावल्यास रेबीज होऊ शकतो. रेबीज ही एक गंभीर विषाणूजन्य स्थिती आहे. जी मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करते. उपचार न केल्यास, संसर्ग झाल्यानंतर काही दिवसांत पीडिताचा मृत्यू होऊ शकतो.
० कुत्रा चावल्यावर करावयाचे प्रथमोपचार खालीलप्रमाणे – जर तुम्हाला कुत्रा चावला असेल तर सर्वप्रथम खालील कृती करा.
१) जखमेतून रक्तस्त्राव थांबवण्यासाठी जखमेच्या किंवा दुखापतीभोवती स्वच्छ टॉवेल वा रुमाल ठेवा.
२) दुखापत झालेला भाग किंचित उंच ठेवण्याचा प्रयत्न करा.
३) दुखापत झालेली जागा साबण आणि पाण्याने काळजीपूर्वक स्वच्छ करा.
४) जर तुमच्याकडे अँटिबायोटिक क्रीम असेल तर ते त्वरित दुखापतीवर लावा.
५) आता जखमेवर स्वच्छ बैंडेज लावा.
६) पीडित व्यक्तीस डॉक्टरकडे घेऊन जा.
७) डॉक्टरांनी जखम पाहिल्यानंतर दिवसातून अनेक वेळा पट्टी बदलावी लागेल. त्यामुळे सहकार्य करा.
० काय करू नये?
१) घाबरू नका.
२) अति हालचाल करू नका.
३) जखम चोळू नका.
४) जखमेवर माती टाकू नका.
५) लालसरपणा, सूज, वेदना आणि ताप यासारख्या संसर्गाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
० संसर्ग टाळण्यासाठी काय करावे?
१) कुत्रा चावल्यानंतर लगेच जखम धुवा.
२) दुखापतीवर प्रतिजैविक लावण्याची खात्री करा.
३) हि जखम झाकून ठेवा.
४) दररोज पट्टी बदला.
५) संसर्गापासून सावध रहा. ( कुत्रा चावल्यानंतर २४तास ते १४दिवसांत संसर्गाची लक्षणे दिसतात )
६) संसर्ग झाल्यास ताबडतोब डॉक्टरांना भेटा.
७) डॉक्टरांनी दिलेले प्रतिजैविक १ ते २ आठवडे घ्यावेच लागतील. त्यामुळे संसर्गाची लक्षणे पूर्णपणे गायब झाली तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे थांबवू नका.
८) कुत्रा चावल्यावर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा.., जीव देखील गमावावा लागू शकतो.