Almonds
| |

हिवाळ्यात बदामाचे पौष्टिक लाडू जरूर खा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि बदाम खाणे आरोग्यासाठी किती लाभदायक आहे. अगदी लहान मुलांपासून, किशोरवयीन मुले ते वृद्ध व्यक्ती अश्या प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्तीसाठी बदाम खाणे लाभदायक आहे. उत्तम आणि निरोगी आरोग्यासाठी बदाम कोणत्याही स्वरूपात खाणे लाभदायकच मानले जाते. याचे कारण म्हणजे बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, फायबर, प्रथिने, रिबोफ्लेविन, मॅंगनीज, फोलेट यांसारख्या १५ पोषक तत्वांचा समावेश असतो. यामुळे बदाम हे उत्तम आरोग्याचे वरदान मानले जाते. शिवाय नियमितपणे बदाम खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य, मधुमेह, त्वचेचे आरोग्य आणि वजन व्यवस्थापन यासह अनेक फायदे होतात. बदाम भिजवून खा वा असेच त्यातील पोषक तत्व घटत नाहीत.

साधारणतः हिवाळ्याच्या दिवसात पचन प्रणाली कमकुवत होते. मात्र भुकेचे प्रमाण दुपटीने वाढते. त्यामुळे सतत खावे वाटते. या सतत खाण्यामुळे वजन वाढते. शिवाय एवढं सगळं खाऊनही शरीराला आवश्यक तितकी ऊर्जा मिळतच नाही. मग हे खाण्याचा काय फायदा. पण बदाम एक असा पदार्थ आहे जो खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा प्राप्त होते. उत्साही वाटते आणि मुख्य म्हणजे सतत भूक लागत नाही. यासाठी हिवाळ्यात प्रामुख्याने बदामाचे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही खाताय ना बदामाचे लाडू? नाही? मग आम्ही सांगतो ती रेसिपी जाणून घ्या आणि बनवा चविष्ट आणि पौष्टिक असे बदामाचे लाडू. जे हिवाळ्यातही तुमच्या आरोग्याची काळजी घेईल.

० बदामाचे लाडू बनविण्यासाठी लागणारे साहित्य
– १ कप बदाम
– १ कप किशमिश (बेदाणे)
– १/२ वाटी गूळ
– वेलचीपूड

० कृती – सगळ्यात आधी एक पॅन गरम करा. यानंतर १ कप कच्चे बदाम मंद वा मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत चांगले परतून घ्या. यात बेदाणे मिसळा. आता गॅस बंद करा आणि एका भांड्यात भाजलेले बदाम व बेदाणे काढा. आता या दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये नीट वाटून घ्या. यानंतर यात वेलचीपूड ,गूळ घालून पुन्हा एकदा मिक्सर मध्ये वाटून घ्या. आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढा. यानंतर तळहातावर थोडं तूप लावून हातात या मिश्रणाचे छोटे छोटे भाग घ्या आणि मग लाडूचा आकार द्या. असेच सर्व मिश्रणाचे लाडू बनवा आणि मस्त पौष्टिक बदामाच्या लाडूचा आस्वाद घ्या.

० टिप्स –
१) बदाम भाजताना ते ढवळत राहा.
२) बदाम जळणार वा करपणार नाहीत याची काळजी घ्या.
३) बदाम मायक्रोवेव्हमध्येही भाजता येतात.
४) लाडू वळताना जास्त तूप वापरणे टाळा.