दिवाळीचा फराळ खूप झाला आता जरा आरोग्याकडे लक्ष देऊया?; जाणून घ्या बॉडी डिटॉक्सिफिकेशनसाठी जबरदस्त उपाय
हॅलो आरोग्य ऑनलाईन। नुकतीच दिवाळी झाली म्हणजे दिवाळीच्या फराळाचा आस्वाद उठता बसता घेतला असेलच. अर्थात तेलकट, तुपकट आणि गोड पदार्थांचा पोटावर भरपूर मारा. त्यात सण म्हटलं म्हणजे मित्र मंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट एकत्र आले कि झालं. मग काय? दिवाळीचा फराळ आणि सोबत चमचमीत सुग्रास भोजन. सणात आपण काय खातो आणि किती खातो यावर आपला ताबा राहत नाही आणि याचा नंतर त्रास होतो. खूप जणांना अतिजेवणाचा त्रास होतो आणि मग ॲसिडीटी, अपचन, पोटदुखी, अस्वस्थता असे त्रास जाणवू लागतात.
अति खाण्यामुळे शरीरात जे टॉक्सिन्स तयार झाले आहेत, ते एकदा शरीरातून बाहेर काढण्याची गरज असते. यालाच बॉडी डिटॉक्स करणे म्हणतात. मुळात फिट राहण्यासाठी ठराविक काळानंतर बॉडी डिटॉक्स करणे आवश्यक असते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. म्हणजेच शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. या प्रक्रियेमध्ये यकृत, किडनी, फुफ्फुसे, त्वचा यांच्यामधील विषारी घटक बाहेर पडतात. चला तर जाणून घेऊयात बॉडी डिटॉक्स करण्याचे सोपे उपाय खालीलप्रमाणे:-
१) भरपूर पाणी प्या – जेवढे जास्त पाणी प्याल तेवढे शरीराचे शुद्धीकरण होते. त्यामुळे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी प्या. साधारण ८ ते १० ग्लास पाणी दिवसभरातून पोटात जाईल याची काळजी घ्या. पाणी जास्त प्यायल्यास किडनी, यकृत आणि त्वचा या तिघांचेही डिटॉक्सिफिकेशन होते आणि शरीर आतून स्वच्छ होत जाते.
२) दररोज सकाळी कोमट पाणी प्या – बॉडी डिटॉक्स करण्याचा उत्तम पर्याय म्हणून दररोज सकाळी कोमट पाणी प्या. यासाठी १ ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळा आणि त्यात १ टे.स्पून मध टाका. हे पाणी पिऊन सकाळची सुरुवात कराल तर वेटलॉससाठीदेखील फायद्याचे ठरेल.
३) फळांचा रस आणि भाज्यांचे सूप – फळ आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, फॉलिक ॲसिड, लोह व पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे फळांचा फ्रेश रस घेतला तर त्यामुळे शरीर शुद्ध होते. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी फळांचा रस आणि भाज्यांचे सूप जास्त घ्या.
४) ग्रीन टी – बॉडी डिटॉक्स करण्यासाठी ग्रीन टी सर्वोत्तम पर्याय आहे. यासाठी दिवसातून ४-५ वेळा ग्रीन टी प्या. ग्रीन टीमध्ये संत्री, मोसंबीचा रस, लिंबू पिळून टाकल्यानेही चांगला फायदा होतो.
५) कार्बोहायड्रेट्स भरपूर खा – बॉडी डिटॉक्स प्रक्रियेत पोटावर अन्नाचा मारा करायचा नसतो. त्यामुळे कमी अन्न खाऊन शक्ती टिकवायची असते. यासाठी कार्बोहायड्रेट्स भरपूर खा. असे केल्यामुळे पाेट भरल्यासारखे वाटते अणि वारंवार भूक लागत नाही. दूध, दही, ताक, लस्सी, डाळींचे पाणी, भात, बीन्स, वाटाणे या पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात कार्बाेहायड्रेट्स असतात.
६) उपवास करा – उपवास करणेदेखील बॉडी डिटॉक्ससाठी उत्तम उपाय आहे. पण उपवास करायचा म्हणून त्यादिवशी भगर, साबूदाणा, तळलेले, तुपकट पदार्थ खाणे असे टाळा. यादिवशी शिजवलेले कोणतेही अन्न खाऊ नका. याऐवजी दूध, दही, ताक, फळे, कच्च्या भाज्या, सॅलड खा.