मधुमेहाला वेळीच करा कंट्रोल नाहीतर ढासळेल आरोग्याचा समतोल; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। मधुमेह अर्थात डायबिटीज हा एक असा आजार आहे जो कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यात हा आजार माणसाला आतून हळूहळू पोखरत जातो. यामुळे हळूहळू तब्येतीच्या तक्रारींमध्ये होणारी वाढ माणसाची शारीरिक क्षमता शमवते. त्यात आजकालची बदलती जीवनशैली तरूण पीढीला मधुमेहाचा बळी बनवू लागली आहे. आपल्या आरोग्याचा ऱ्हास होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. यांपैकी एक म्हणजे आपल्या आत वाढणारा मधुमेह. रक्तातील उच्च साखरेचे प्रमाण अनियंत्रित झाल्यास मनुष्याला मृत्यूच्या दरवाजापर्यंत पोहोचण्यास फार वेळ लागत नाही. यामुळे डॉक्टर्ससुद्धा सांगतात कि आपल्या दैनंदिन जीवनशैलीत थोडासा बदल केल्यास डायबिटीजपासून बचाव करता येऊ शकतो. कारण योग्यवेळी लक्ष न दिल्यास मधुमेह गंभीर स्वरूप धारण करून थेट शरीराच्या विविध भागांवर परिणाम करतो. मधुमेह गंभीर झाल्यास शरीराच्या कोण-कोणत्या अवयवांवर सर्वात जास्त प्रभाव टाकतो हे आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. पुढीलप्रमाणे :-
१) शरीरातील नसा कमकुवत होतात.
– मधुमेह प्रकार २ गंभीर झाल्यास शरीरातील नसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शिवाय नसा कमकुवत झाल्यामुळे डायबिटिक न्यूरोपॅथीचा धोका आणखी वाढतो. हा आपल्या हाता – पायांवर परिणाम करतो. याची प्रमुख लक्षणे – हात पाय सुन्न होणे, झिणझिण्या येणे, जळजळ होणे, असह्य वेदना, डोळ्यांच्या समस्या आणि शारीरिक कमजोरी.
२) हृदयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
– जर वेळीच मधुमेहावर नियंत्रण केले नाही तर हाय ब्लडप्रेशर आणि हृदयाच्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे जर मधुमेह प्रकार २’ने पीडित असाल तर लो सोडियम डाएट घ्या आणि नियमित प्रकारे आपले बीपी चेक करा.
३) किडनी खराब होऊन अकार्यक्षम होते.
– रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे याचा आपल्या किडन्यांवर थेट परिणाम होतो. यामुळे किडनीच्या फिल्टर करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो आणि किडनीत अकार्यक्षमता वाढते. यासाठी रूग्णांनी काळजी घेतली पाहिजे.
४) पायांचा अल्सर होण्याची शक्यता बळावते.
– नसा आणि रक्ताभिसरण प्रक्रिया बिघडल्याने पायांना अल्सरसारखी समस्या होते. हा पायाचा अल्सर कधी-कधी संक्रमितसुद्धा होतो. यामुळे पायांच्या अल्सरपासून वाचण्यासाठी मधुमेहींनी आपले पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. शिवाय आरामदायक आणि हलके मोजे घालावे. पायांना जखम झाल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांकडे जाणे.
५) नेत्रदृष्टी कमजोर होऊन आंधळेपण येणे.
– मधुमेह प्रकार २’च्या वाढीमुळे मधुमेहींना अस्पष्ट दिसू लागते. कारण मधुमेह डोळ्यांच्या छोट्या ब्लड वेसल्सचे नुकसान करतो. यामुळे ग्लूकोमा, मोतीबिंदू आणि डायबिटिक रेटिनोपॅथीचा धोका वाढतो. काही काळानंतर डोळे कमजोर होतात. इतकेच नव्हे तर आंधळेपण येण्याची शक्यता वाढते.
६) तोंडाचे गंभीर आजार होतात.
– मधुमेहावर वेळीच नियंत्रण न ठेवल्यास तोंडाचे आरोग्य धोक्यात येते. मधुमेहामुळे ब्लड वेसल्सचे नुकसान होते. ज्या दात आणि हिरड्यांचे आरोग्य ठिक ठेवतात. यामुळे दात आणि हिरड्यांमध्ये संसर्गाचा धोका वाढतो. याकरिता मधुमेहींनी आपल्या तोंडाची स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे आहे.