ओठांची काळजी घेण्यासाठी घरच्याघरी बनवा नैसर्गिक लीप बाम; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। बाजारात मोठ्या प्रमाणात विविध कंपनी आणि ब्रॅण्डची सौंदर्य प्रसाधने उपलब्ध असतात. पण यामध्ये विविध घातक रसायने वापरलेली असतात याची आपल्याला जाणीव देखील नसते. अनेकांना दररोज मेकअप करण्याची सवय असते. तर काहींना दररोज बॉडी लोशन आणि लीप बाम वापरण्याची सवय असते. यामुळे दररोज हि उत्पादने वापरणाऱ्या लोकांची त्वचा आणि ओठ काळे पडतात, कोरडे होतात अगदी त्वचा फटू लागते आणि जखमही होते. यामुळे कृत्रिम गोष्टींचा वापर करून बनवलेल्या कृत्रिम लीप बाम आणि लिपस्टिकपासून स्वतःचा बचाव करा. आता हा बचाव कसा करायचा असा एक मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर घाबरू नका. यासाठी सोप्प उत्तर आमच्याकडे आहे. उत्तर कसलं पर्यायच म्हणा ना. कारण आज आम्ही तुम्हाला घरच्याघरी लीप बाम कसा बनवायचा ते सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) स्ट्रॉबेरी लीप बाम
० साहित्य – १ व्यवस्थित पिकलेली स्ट्रॉबेरी, ३ चमचे नारळाचे तेल
० कृती – स्ट्रॉबेरी चांगल्या पद्धतीने वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या. यानंतर त्या पेस्टमध्ये नारळाचे तेल मिसळून हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. आता मिश्रण घट्ट झाल्यावर स्ट्रॉबेरी लीप बाम वापरण्यासाठी तयार आहे.
० फायदे – स्ट्रॉबेरीमध्ये विटामिन सी असते. तसेच स्ट्रॉबेरी हे नैसर्गिक एक्सफोलीएटर आहे. ज्यामुळे ओठांना पडलेल्या भेगा लवकर भरतात. ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. स्ट्रॉबेरीमुळे ओठांचा मूळ रंग टिकतो. तर नारळाच्या तेलामुळे ओठ मऊ व चमकदार होतात.
२) डाळिंब लीप बाम
० साहित्य – १/४ कप डाळींबाचे दाणे, १ चमचा खोबरेल तेल
० कृती – डाळिंबाचे दाणे एका वाटीत घेऊन त्यावर चमच्याने दाब देऊन त्यांचा रस काढा. आता यात १ चमचा वितळवलेले खोबरेल तेल मिसळून ती वाटी फ्रीजमध्ये ठेवून द्या. हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर लीप बाम म्हणून वापरा.
० फायदे – डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. शिवाय डाळिंबामुळे ओठांना नैसर्गिक लाल रंग मिळतो. तसेच नारळाच्या तेलामुळे ओठ मऊ राहतात.
३) बीट लीप बाम
० साहित्य – १/२ कप बीट कीस, १ चमचा तूप
० कृती – बीटचा कीस करून तो घट्ट पिळून त्याचा रस काढा आणि यात १ चमचा तूप मिसळून हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर मिश्रण घट्ट झाल्यानंतर लीप बाम म्हणून वापरा.
० फायदे – बीटरूटमध्ये बिटॅनिन हे पिगमेंट असते. त्यामुळे ओठांचा नैसर्गिक रंग टिकतो. तसेच तुपामुळे ओठ मऊ व चमकदार होतात.
४) दालचिनीचा लीप बाम
० साहित्य – दालचिनी तेलाचे २ ते ३ थेंब, १ चमचा कोको बटर
० कृती – दालचिनीच्या तेलात कोको बटर मिसळून हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. हे मिश्रण घट्ट झाल्यावर दालचिनीचा लीप बाम वापरण्यासाठी तयार आहे.
० फायदे – दालचिनीमध्ये भरपूर एंटीऑक्सीडंट्स असतात. तर कोको बटरमुळे ओठ मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होते. ह्या लीपबाममुळे ओठांच्या त्वचेचे पोषण होते आणि ओठ काळे पडत नाहीत.
५) विटामिन ई लीप बाम
० साहित्य – विटामिन ई ३ कॅप्सूल, २ चमचे नारळाचे तेल, १ चमचा कोको बटर, १ चमचा ग्रीन टी पावडर, २ थेंब इसेन्शियल ऑईल
० कृती – गॅसच्या मंद आचेवर नारळाचे तेल वितळवून त्यात ग्रीन टी पावडर मिसळा. मंद आचेवर हे मिश्रण काही काळ तसेच ठेवा. थंड होऊन ग्रीन टी पावडर खाली बसल्यावर मलमलच्या कपड्याने हे तेल गाळून घ्या. आता या तेलात विटामिन ई कॅप्सूल उघडून त्यातील औषध मिसळा. यानंतर त्यात कोको बटर आणि इसेन्शियल ओईल मिसळा. यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिसळून ३ तास फ्रीजमध्ये ठेवा. तुमचा लीप बाम तयार आहे.
० फायदे – विटामिन ई’मध्ये नवीन पेशी तयार करण्याची क्षमता असते. त्यामुळे ओठांना पडलेल्या भेगा लवकर भरतात. तसेच ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडंट्स असतात. तर इसेन्शिअल ऑइल आणि कोको बटर मुळे ओठ मऊ व चमकदार राहतात.