जिभेच्या चवींवर असेल नियंत्रण तर आजारपणाची भीती विसरा; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या भारतीय संस्कृतीला आयुर्वेदाची अतिशय प्राचीन संस्कृती लाभलेली आहे. यामुळे आजही आपल्याकडे आयुर्वेदात सांगितलेल्या औषधांचा मोठ्या पद्धतीने वापर केला जातो. आजकालची जीवनशैली हि आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानीकारक झाली आहे. यामुळे आपले शरीर अनेक आजारांचे घर झाले आहे. या अनेक आजारांचे कारण म्हणजे “विरुध्द वा अति आहार”. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे जो आहार नीट पचत नाही आणि तसाच शरीरात साठून राहतो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा शरीरातील इतर घटकांमध्ये मिसळून व्याधी निर्माण करतो त्याला विरुध्द आहार असे म्हणतात. असा विरुद्ध आहार आपण रोजच्या दैनंदिन जीवनशैलीत घेत असतो. याचे कारण आपल्या जिभेचे चोचले. कशावर काय खावे आणि कधी काय खावे यासह कोणता पदार्थ किती खावा यावर नियंत्रण नसेल तर अनेक व्याधी होऊ शकतात. म्हणून सगळ्यात आधी तर जिभेवर ताबा ठेवायला शिका. जाणून घ्या दैनंदिन जीवनातील आहारविषयक चुका खालीलप्रमाणे:-
१) दुधासोबत फळ – दुधासोबत कोणतेही फळं मिसळून खाणे. कितीही चविष्ट असले तरीही टाळा. जसे की – मिल्क शेक,केळी शिकरण, फ्रूट क्रीम, फ्रूट कस्टर्ड.
२) दही, दूध आणि भात – दही दूध भात एकत्र करून खाणे चुकीचे आहे. यामुळे पोटात बिघा होऊ शकतो. म्हणून एकतर दूध भात खा वा दही भात. कोणतीही आंबट गोष्ट दुधात मिसळून खाऊ नये.
३) दूध लोणचे भात – वर सांगितल्याप्रमाणे कोणतीही आंबट गोष्ट दुधात मिसळून खाणे शरीराचे आतून नुकसान करते.
४) कडू पदार्थात दूध – कडु पदार्थात दूध घालून पिऊ नये. जसे कि, मेथी मटर मलाई यात क्रीम आणि दूध असते. तर पदार्थांचा हा संयोग चुकीचा आहे.
५) ग्रेव्हीयुक्त भाज्या – ग्रेव्हीच्या भाज्या ज्यात टोमॅटो आणि क्रीम एकत्र केलेले असते. अश्या भाज्या कितीही चविष्ट असल्या तरीही बनविणे आणि खाणे टाळा.
६) गरम पाणी आणि मध – अनेकजण सांगणात कि गरम पाण्यात मध मिसळून प्यायल्याने लाभ होतो. तर मित्रांनो हा संयोग चुकीचा आहे. त्याजागी कोमट पाणी आणि मधाचा वापर करणे योग्य ठरेल.
७) दूध आणि मासे – दूध आणि मासे एकत्र करून खाऊ नयेत. यामुळे अंगावर पांढरे चट्टे येऊ शकतात. शिवाय फूड ऍलर्जी होऊ शकते.
० वरील संयोगयुक्त आहार कुणासाठी लाभदायक नाही?
– ज्यांना त्वचा विकार आहे. तसेच ज्यांचा खाण्याचा कोटा अधिक आहे आणि ज्यांचे रोजच्या रोज पोट साफ होत नाही. यासह अंगावर पित्त उठणे , आमवातचा त्रास असणाऱ्या लोकांनी वरील आहार घेऊ नये.