बुळबुळीत शिराळं पोषक घटकांनी परिपूर्ण; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोकांना आपल्या आहारात शिराळ्याची भाजी म्हणजे नकोच वाटतं. त्यामुळे हे लोक शिराळ्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. पण मित्रांनो जिभेला न आवडणारं आरोग्याला आवडतं नसेल असं काही नाही हा! त्यामुळे कधी कधी चवीला थोडं बाजूला ठेवा आणि आरोग्याच्या दृष्टीने आहार घ्या. याचा फायदा असा होईल कि तुमचे आयुष्य बहुतांशी निरोगी जगण्यास सहाय्य मिळेल. शिराळ्याची भाजी अशीच काहीशी असते. चवीला फार उत्तम नसली तरीही आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. कारण शिराळं अनेक पोषक घटकांनी परिपूर्ण असते. यामध्ये उच्च प्रतीची फायबर्स, व्हिटामिन सी, आयर्न तसेच इतर अनेक पोषणद्रव्यं असतात. तसेच शिराळ्यात कॅलरीचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन वाढायचीही चिंता नाही. म्हणून आपल्या दैनंदिन आहारात बुळबुळीत असली तरीही शिराळ्याची भाजी खा असा सल्ला आम्ही देऊ. चला तर जाणून घेऊयात शिराळ्याची भाजी खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-
१) पित्ताचा त्रास कमी होतो – आयुर्वेदानुसार शिराळं शरीरातील पित्त कमी करण्यास अत्यंत फायदेशीर असल्याचे सांगितले आहे. शिराळ्यातील मिनरल्स शरीरात अल्कलाईन घटक निर्माण करतात. त्यामुळे पित्त कमी होते आणि शरीराला आराम मिळतो. शरीरात अल्कलाईन घटकांची निर्मिती झाल्याने मूत्रविसर्जन करतेवेळी होणारी जळजळ कमी होते. शिवाय अल्सर आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होण्यास मदत होते.
२) शारीरिक दाह कमी होतो – शरीरातील उष्णता वाढल्यास त्याची तीव्रता त्वचेवर दिसून येते. यावर शिराळ्याची पाने त्वचेवर लावणे लाभदायक आहे. यामुळे दाह कमी होतो. तसेच आहारात शिराळ्याचा समावेश केल्यास शरीरातील जळजळ, कफ आणि लिम्फ ग्रॅंल्डसवरील सूज कमी होते.
३) कुष्ठरोग्यांसाठी वरदान – कुष्ठरोगाशी ग्रासलेल्या रुग्णांना आजही समाजाकडून वेगळी वागणूक मिळते. पण या आजाराशी झुंजणाऱ्या व्यक्तीलाच त्याची तीव्रता माहित असते. अशा कुष्ठरोगींसाठी शिराळ्याची भाजी वरदान आहे. कारण शिरल्याची भाजी खाल्ल्याने त्यांच्या शरीरातील जळजळ आटोक्यात येते. तर अंगावर झालेल्या जखमांसाठी शिराळ्याची पानं व लसूण यांची पेस्ट लावणे फायदेशीर ठरते.
४) मधूमेहावर नियंत्रण – मधुमेहींनी निर्धास्त जगायचं असेल तर आहारात शिराळं खाणे आवश्यक आहे. कारण शिराळ्यातील कमी कॅलरीज आणि अँटी ऑक्सिडंट हे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात. शिवाय शिराळ्यातील हायपोग्ल्यासमिक क्षमता रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
५) त्वचारोगावर आराम – शिराळं खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होते. परिणामी पिंपल्स, अॅक्ने, ब्रेकआऊट्सची समस्या कमी होते. म्हणून त्वचेशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी आहारात शिराळ्याचा समावेश करावा. यामुळे रक्त शुद्ध होऊन विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. परिणामी त्वचारोग व संसर्ग कमी होतो.
६) केसांच्या आरोग्यात सुधार – सुकवलेले शिराळे खोबरेल तेलात मिसळून केसांना लावून ठेवा आणि १ तासानंतर केस सौम्य शॅम्पूने धुवा. असे केल्यास अकाली केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. तसेच शिराळ्यातील पोषणद्रव्य केसांच्या मुळांना मजबुती देते. परिणामी केसांचे आरोग्य सुधारते.
७) वजन घटवते – शिराळ्यामध्ये उच्च प्रतीचे डायटरी फायबर्स असतात. यामुळे ते शरीरात शोषून घेण्यास अधिक वेळ लागते. यामुळे अधिकवेळ पोट भरलेले राहते. तसेच शिराळ्यामध्ये कॅलरी कमी आणि पाण्याचा अंश अधिक असतो. यामुळे वजन घटवण्यास शिराळे फायदेशीर ठरते.