कानाच्या आरोग्याविषयी पडणाऱ्या 10 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे; लगेच जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अंघोळ करताना कानात साबणाचे पाणी जाणे, बरेच दिवस कान स्वच्छ न करणे, रस्त्यावरची धूळ माती कानात साचणे, कानामध्ये इन्फेक्शन होणे अश्या अनेक समस्यांमुळे अनेकदा कानाचे दुखणे डोकं वर काढते. पण हे त्रास फार वेदनादायी नसल्यामुळे अनेकदा यांकडे दुर्लक्ष केला जातो. परिणामी मोठ्या आणि गंभीर आजारांना आमंत्रण दिले जाते. पण आपल्यापैकी अनेकजण असे असतात जे आरोग्याच्या बारीक सारीक कुरबुरींकडे बारकाईने लक्ष देतात. अशा प्रत्येक व्यक्तीला एक तरी असा प्रश्न पडतोच जो अनुत्तरित असतो. म्हणूनच कानाच्या प्रत्येक लहान सहान दुखण्याबाबत तुमच्या मनात जे काही प्रश्न येत असतील त्यातील महत्वाच्या १० प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि हो आपल्या मनाने नाही बरं का.. तर तज्ञांनी दिलेली उत्तरे आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
१) कानात मळ जमा होणे हि क्रिया सामान्य आहे का?
उत्तर – कानामध्ये सौम्य प्रमाणात मळ साचणे अतिशय सामान्य बाब आहे. तर कान स्वच्छ करणे हि गरज.
२) कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती?
उत्तर – अनेकांना कान कसे पटकन स्वच्छ करायचे असतात. मग एखादा बकपिन किंवा बांगडीचा पिन कानात घालून घालून मळ काढण्याचा केविलवाणा प्रयत्न अनेकजण करतात. तर मित्रांनो तज्ञ सांगतात कि अशा पद्धतीने कान स्वच्छ करणे कानाच्या पडद्याचे नुकसान करू शकते. म्हणून, कानाचा बाहेरील भाग सुती आणि मऊ कापडाने स्वच्छ करा आणि कानाच्या आत बेबी ऑईल, एअर ड्रॉप वा मिनरल ऑईलचे २ ते ३ थेंब टाका. यामुळे कान व्यवस्थित स्वच्छ होतील.
३) कान किती दिवसांनी स्वच्छ करावे?
उत्तर – मित्रांनो, कान स्वच्छ करण्यासाठी पंचांग वा मुहूर्ताची आवश्यकता नाही. तर कानामध्ये मळ साचायला सुरवात झाली की कान स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र नियमित वा आठवड्यातून दोनवेळा कान स्वच्छ केल्याने कानात दाह आणि कोरडेपणाचा त्रास वाढतो.
४) कानातला मळ साफ करताना कोणत्या गोष्टींचा वापर टाळावा?
उत्तर – कानातला मळ साफ करण्यासाठी कोणताही पिन, बोटं किंवा टोकदार वस्तू, कापसाचा बोळा यांचा वापर टाळा. अन्यथा कानाचे नुकसान होऊ शकते. तसेच कानाच्या पडद्याला इजा होण्याचा धोका असतो. तर कापसाच्या बोळाने मळ अधिक खाली ढकलला जातो. त्यामुळे ऐकू येण्याची क्षमता कमी होते.
५) कानातील मळ आजाराचे संकेत देतो का?
उत्तर – स्वाभाविकपणे कानातील मळ हि नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे तो कोणत्याही आजाराचे संकेत नाही. मात्र वारंवार आणि अधिक मळ साठत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
६) कान चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करण्याची सवय कानाचे नुकसान करू शकते का ?
उत्तर – आता लवकर बरे होण्यासाठी सगळी औषधे एकत्र खाल्ली तर बरे व्हाल का आजारपण वाढेल? याचे उत्तर जितके सोप्पे आहे तितकेच सोप्पे या प्रश्नाचे उत्तर आहे. आपले कान साफ करण्यासाठी कोणत्याही चूकीच्या वस्तूचा वापर करालं तर साहजिकच कानांचे नुकसान होईल. यामुळे कानात असह्य वेदना, कानाच्या पडद्याला सूज, कमी ऐकू येणे अशा समस्या वाढतात.
७) कोणत्या परिस्थितीमध्ये कानांकडे विशेष लक्ष द्यावे?
उत्तर – आपल्या कानामध्ये तीव्र वेदना जाणवल्यास तसेच ऐकण्यामध्ये त्रास जाणवणे आणि कानामध्ये विशिष्ट घुरर घुरर आवाज येणे असे जाणवल्यास त्वरित ENT डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशावेळी कानाच्या पडद्याला जखम वा गंभीर इजा झालेली असू शकते.
८) इअर कॅन्डल्सचा वापर करून खरचं कान स्वच्छ होतात का?
उत्तर – अनेकजण सोप्पा आणि आधुनिक पर्याय म्हणून इअर कॅन्डल्सचा वापर करतात. पण त्यामुळॆ कान स्वच्छ होत नाहीत तर कणांचे गंभीर नुकसान होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे तुम्हीही असा समज बाळगून असालं तर वेळीच सुधरा.
९) कानातील खडान् खडा मळ काढणे योग्य का अयोग्य?
उत्तर – कान स्वच्छ करणे एखादी वस्तू स्वच्छ करण्यासारखे नसते आधी हे समजून घ्या. त्यामुळे कानांना हाताळताना नाजूकपणे हाताळा. शिवाय कानातील केवळ अतिरिक्त मळ काढून टाकणे गरजेचे आहे त्यामुळे कानातील सर्व मळ बाहेर पडावा म्हणून शर्थीचे प्रयत्न करून कणांचे नुकसान करू नका. कानातील अतिरिक्त मळ काढण्यासाठी बाजारात अनेक इअर ड्रॉप्स उपलब्ध आहेत. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांपैकी कोणत्याही एकाचा वापर करा.
१०) कानात जमा होणारा जास्तीचा मळ कसा टाळावा?
उत्तर – मित्रांनो खार सांगायचं तर, कानात मळ येऊ नये किंवा कमी यावा यासाठी कोणतेही विशेष उपाय नाहीत. मात्र हा त्रास वारंवार जाणवल्यास त्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे निदर्शनास आले तर सतत कान साफ करायची सवय कमी करा. तसेच विशिष्ट कालांतराने कान स्वच्छ करा. यामुळे कान स्वच्छ सुद्धा राहतील आणि त्यांचे नुकसानदेखील होणार नाही.