Virus
| |

डेल्टा, ओमिक्रॉननंतर आता डेल्मिक्रॉन वाढविणार चिंता?; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गेल्या २ वर्षांपासून कोरोना विषाणूने बघता बघता संपूर्ण जगाला हादरवून टाकले. कोरोनामुळे काही काळासाठी लोकं जणू जगणंच विसरले होते. सर्वत्र भयावह परिस्थती आणि मरणाची भीती कायम होती. आत्तापर्यंत कोरोनाचे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, डेल्टा प्लस असे वेगवेगळे व्हेरियंट आपण पाहीले. या प्रत्येकावर मात करून आता कुठे लोकांनी सुटकेचा श्वास सोडला तोच कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले. हे कमी का काय? तर यात भर म्हणून आता आणखी एका नव्या व्हेरियंटची जगभर चर्चा सुरू झाली आहे. या नव्या व्हेरियंटचं नाव आहे डेल्मिक्रॉन.

० काय आहे डेल्मिक्रॉन?
– ‘डेल्मिक्रॉन’ हा कोरोनाचा दुसरा व्हेरियंट आहे. तूर्तास तो पश्चिमेतील देशांमध्ये पसरतोय असे निदर्शनास आले आहे. सध्या जगभरात ओमिक्रॉन आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही व्हेरियंटला एकत्रित करून ‘डेल्मिक्रॉन’ असं नाव ठेवण्यात आलं आहे.

– डेल्मिक्रॉनच्या बाधितांची सर्वाधिक संख्या युरोप आणि युएसमध्ये आढळून येत आहे. हि माहिती राज्य सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांनी दिली आहे. रिपोर्टनुसार, भारतात डेल्टाचे रुग्ण सर्वाधिक होते. मात्र देशात ओमिक्रॉन किती भयंकर स्वरूप दर्शवेल हे काही सांगू शकत नाही. कारण जगभरात ओमिक्रॉनचा कहर पाहता त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे असल्याचे WHO च्या अधिकाऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

० काय सांगतात तज्ञ?
– डेल्मिक्रॉनविषयी बोलताना तज्ञ सांगतात कि, हा कोरोनाचा डबल व्हेरियंट आहे. तज्ज्ञांच्या मते, वास्तविक डेल्मिक्रॉन हा डेल्टा आणि ओमिक्रॉन या व्हेरियंटचे मिश्रण आहे. हे दोन्ही व्हेरियंट भारतात अस्तित्वात आहेत. त्यामुळे डेल्मिक्रॉनकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल. शिवाय हि लाट धोकादायक ठरू शकते, असे तज्ञांचे निकष सांगतात. सध्या संपूर्ण जग डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरियंटचा सामना करत आहे आणि यांची रुग्णसंख्या वाढल्यानेच डेल्मिक्रॉनचा संसर्ग निर्माण झाला आहे.