केसात चाई पडलीय? ‘या’ घरगुती उपायांनी दिसाल पूर्वीसारखे
हॅलो आरोग्य ऑनलाईन : डोक्यावरील काही भागातील केस गळून पडून ते पुन्हा न उगवल्यामुळे तेथे टकलासारखा तुळतुळीत भाग दिसतो त्याला ‘चाई’ असे म्हणतात. चाई काही वेळा आनुवंशिक असते, तर काही वेळा पौरूषजन (अँड्रोजेन) या हॉर्मोनामुळे (अंतःस्रावी ग्रंथीपासून निर्माण होणाऱ्या स्रावामुळे) हा विकार दिसतो असे मानण्यात येते. या समस्येला वैद्यकीय भाषेत अलोपेशिया एरेटा असे म्हणतात. चाईमुळे गेलेले केस हे अनेकदा आपोआपच पुन्हा उगवतात. म्हणजेच हा आजार आपोआप ९०% होऊ शकतो. दाढी, मिश्या, डोक्यातील केस आणि भुवयांमधील केस चाई जाऊ शकतात.
चाईचे तीन प्रकार आढळतात.
- एखाद्या मर्यादित जागेचे केस जाणे,
- सर्वच केस जाणे आणि
- अनेक ठिकाणांचे केस कमीच उगवणे.
चाईमुळे केस जाण्याची पुढील कारणे आहेत. ज्यामुळे हि समस्या उद्भवू शकते.
- थायरॉईड
- मानसिक ताणतणाव
- त्वचेचं इन्फेक्शन
- रजोनिवृत्ती आणि गर्भधारणा
- हार्मोन्स असंतुलन
- आनुवंशिकता
- डायबेटिज
- आमवात
दाढी अथवा डोके येथील केस गळून पडल्याने तेथे वर्तुळाकार असे टक्कल दिसते त्याला ‘वर्तुळी अलोमता’ असे म्हणतात. त्याचे निश्चित कारण अज्ञात असले, तरी भावनिक संक्षोभामुळे हे होत असावे असे मानतात. केशमूलाच्या भोवती शोथ (दाहयुक्त सूज) आल्यामुळे तेथे अपपुष्टी (पोषक द्रव्यांची उणीव) उत्पन्न होते व त्यामुळे केसाला अन्नपुरवठा होत नसल्यामुळे केस गळून पडून पुन्हा उगवत नाहीत.
सामान्य विकारात गोल किंवा लंबगोल आकाराचे लहान लहान तुकतुकीत टक्कल दिसू लागते. त्याच्या भोवतालच्या जागेतील केस उद्गारचिन्हासारखे (!) टोकाशी जाड व मुळाशी बारीक असे दिसतात. सुरूवातीस गळून पडलेले केस पुन्हा उगवतात परंतु पुढे ही उगवण बंद पडते. एके ठिकाणी चाई उत्पन्न होत असता दुसऱ्या ठिकाणच्या चाईतील केस उगवू लागल्याचेही दिसते. तेथे नव्याने आलेले तुरळक केस बारीक, पांढरे अथवा पिंगट रंगाचे असतात.
निदान सोपे असले तरी त्वचेमध्ये झालेल्या कवकसंसर्गामुळे (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतीच्या संसर्गामुळे) अशीच अलोमता दिसते; त्याचे व्यवच्छेदक (वेगळेपणा निश्चित करणारे) निदान करावे लागते. प्रौढ माणसात आघात (जखम, भाजणे, क्ष-किरण इ.), रासायनिक द्रव्ये, काही औषधे, कवकसंसर्ग, उपदंशाचे (गरमीचे) लक्षण म्हणून अथवा त्वचेच्या इतर विकारांमुळेही चाईसारखेच केस गेलेले दिसतात. जखम होऊन गेल्यानंतर तेथे जो वण राहतो त्या ठिकाणी केस येत नाहीत. त्या प्रकाराला ‘व्रणी अलोमता’ असे म्हणतात.
आयुर्वेदिक उपचार किंवा चिकित्सा:
- लिंबूरस, आले, कांदा आणि लसूण याचे ताजे मिश्रण
- जास्वंदीच्या फुलांचा आणि पानांचा समसमान भागाची पेस्ट करावी व त्यात खाण्याचा सोडा घालून चाईवर लावावे
- जयपाल बी किंवा जमालगोटा बी उगाळून चाईवर लावावे. हे बीज उष्ण असल्याने लावलेल्या जागेवर थोडीशी आग होऊ शकते.
- खोबरेल तेल आणि मोहरी वाटून हे मिश्रण एक दिवस मुरवत ठेवावे व त्यानंतर चाईवर लावावे.
- गुंजा बी सलग तीन दिवस उगाळून लावल्यानेही चांगला फरक पडतो.
तसेच दर आठवड्यातून एकदा जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांचा उपचार घेतल्यास त्याचा उपयोग होतो. शरीरात कोठे [उदा, दात, हिरड्या, गिलायू (टॉन्सिल्स), आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) वगैरे ठिकाणी] चिरकारी (दीर्घकालीन) जंतुसंसर्ग असल्यास त्याच्यावर उपाय केल्यासही त्याचा उपयोग होतो. अलीकडे स्टेरॉइड औषधांचाही उपयोग करतात. त्याचप्रमाणे हिरव्या पालेभाज्या आणि मोड आलेली कडधान्ये, प्रथिनयुक्त आहार, ड्राय फ्रुट चा समवेत जर आपल्या दैनंदिन आहारात केला तर त्याचाही उपयोग चाई कमी होण्यासाठी किंवा नाहीशी होण्यासाठी होतो.