| | | |

आपणांस माहीत आहेत का? बहुगुणी तुळशीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे  

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्याकडे जवळपास प्रत्येक घरांमध्ये अंगणात नाहीतर गॅलरी मध्ये तुळशीचं छोट रोपटं किंवा झाड पाहायला मिळतं. हिंदू धर्मात तुळशीचं खास महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत पूजनीय असणाऱ्या तुळशीचे औषधीय गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. तुळस आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानली जाते. तुळशी है घरगुती औषध म्हणून उत्तम आहेच, पण आयुर्वेदिक औषधे बनवितानासुद्धा तुळशी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. औषध घेताना अनुपान म्हणूनही तुळशीचा रस वापरला जातो. तुळशीची पाने, बी आणि मूळ औषधात वापरले जातात. तुळशी अनेक औषधी गुणांनी युक्त असते, आरोग्यासाठी जणू वरदान असते. प्रत्येक घरात असायलाच हवी अशी अत्यंत बहुगुणी आणि उपयुक्त वनस्पती म्हणजे तुळशी. हिरवी तुळस, कृष्ण तुळस, रानतुळस असे तुळशीचे अनेक प्रकार असतात. भारतीय परंपरेप्रमाणे किंवा ज्योतिष शास्त्राप्रमाणे दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त असतात,  त्याची खरी सुरवात जणू तुळशीच्या लग्नानेच होत असते. प्रत्यक्ष श्रीकृष्णाबरोबर जिचा विवाह होतो ती तुळशी खरोखरच सर्वगुणसंपन्न आणि आपणा सर्वांचे रक्षण करणारी कशी आहे हे आज जाणून घेऊया.

तणाव कमी करते

तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची पानं खाल्ल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते.

महिलांना मासिक पाळी समस्या

महिलांना मासिक पाळीदरम्यान अनेक प्रकारच्या समस्या होत असतात. या दिवसांत महिलांना अतिशय त्रासाला सामोरं जावं लागतं. अशा त्रासावेळी तुळशीच्या बिया फायदेशीर ठरतात. मासिक पाळीमधील अनियमितता दूर करण्यासाठी दररोज तुळशीच्या पानांचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

सर्दी-खोकला

तुळशीचा काढा सर्दी-खोकल्यावर रामबाण मानला जातो. काढा बनवण्यासाठी तुळशीची पानं पाण्यात टाकून त्यात काळी मिरी आणि खडीसाखर मिसळून त्याचे सेवन करा. सर्दीसाठी हा काढा अतिशय गुणकारी ठरतो. वनस्पतीशास्त्रानुसार तुळशीला “ऑसिमम सॅन्क्टम’ म्हटले जाते. यातील “ऑसिमम’ शब्दाचा अर्थ गंध’ असा आहे तर “सॅन्क्टम’ शब्द “पवित्र’ या अर्थाने आला आहे. तुळशीला मंजिऱ्या येतात. मंजिऱ्यामध्ये बारीक बी भरलेले असते. मंजिऱ्या आल्या, की तुळशींच्या पानातील गुण कमी होतो असे सांगितले जाते. त्यामूळे औषधासाठी तुळशीची पाने हवी असतील तेव्हा ती मंजिऱ्या न आलेल्या तुळशीची घ्यायची पद्धत आहे. तुळशीची कार्ये चरकसंहितेमध्ये पुढीलप्रमाणे समजावलेली आहेत, हिक्का कासविषश्वास- पार्श्वशूलनिनाशन: ।पित्तकृत् कफवातघ्न: सुरस: पूतिगन्धहा ।।…चरक सूत्रस्थान.

उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यामध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळशी उपयुक्त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळशी दुर्गंधाची नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो. तुळशीच्या आसपास रोगसंक्रामक जीवजंतूचे प्रमाण निश्चित कमी असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीत सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, जतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो. तुळशीची पाने, मंजिन्या वाळवून त्याचा करण्याने तुळशीच्या जंतुन गुणाचा फायदा मिळू शकतो. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते.  आहारापासून सप्तधातू बनविण्याचे काम जठराग्नी व धात्वाग्री करत असतात. तुळशी उष्ण वीर्याची असल्यामुळे जठराग्रीला संधुक्षित करते, शरीरातील आमाचे पचन करते. विशेषत आम साठल्यामुळे जीभ पांढरी होते, अंग जखडल्यासारखे व जड होते तेव्हा तुळशीचा चांगला उपयोग होतो.

  • आम वाढल्यामुळे जिभेवर पांढरा थर जमला असता, तोंडाची चव गेली असता तुळशीच्या रसाचे गूळ किंवा साखरेबरोबर बनविलेले चाटण घेण्याचा उपयोग होतो. बरोबरीने अगदी हलका घ्यावा.
  • पोटात गॅस झाल्यामुळे दुखत असता, पोट जड झाले असता तुळशीची 10-12 पाने कपभर पाण्यात मंद आचेवर उकळावीत. एक कप पाणी उरले की त्यात चवीपुरते काळे मीठ व अर्धा चमचा साजूक तूप टाकून घोट घोट घ्यावे.
  • तुळशी तिखट विपाकाची व तिखट रसाची असल्याने उत्तम जंतनाशक असते. प्रकृतीला सोसवेल अशा प्रमाणात, साधारणत एक ते दीड चमचा तुळशीच्या रसात वावडिगाचे चूर्ण टाकून काही दिवस घेण्याने पोटातील कृमी नष्ट होतात.
  • तुळशी उष्ण वीर्याची असल्याने वातशमन करते. मात्र तिचा रस व विपाक व इतर गुण वातवर्धन करत असल्याने तुळशी एकट्या वातदोषावर वापरली जात नाही वाताबरोबर कफाचा संबंध असलेल्यांना तुळशी उत्तम वातघ्न ठरते.
  • हनुवटीचा साधा जखडला असता तुळशीच्या पानांच्या रसाचे नस्य करण्याचा उपयोग होतो.
  • तुळशी, निर्गुडी, ओवा व सुंठ यांचा काढा घेतल्यास आमपचन होऊन सांधेदुखी, अंगदुखी वगैरे लक्षणात फायदा होतो.
  • पोटऱ्या दुखत असतानाही तुळशीने सिद्ध केलेल्या तेलाचा अभ्यंग करण्याचा उपयोग होतो.
  • तुळशी आपल्या रस, गुण, वीर्य, विपाक यांच्यायोगे शरीरातील कफदोष कमी करते, विशेषत कफदोष जेव्हा द्रव, स्निग्ध गुणाने वाढतो तेव्हा तुळशी उपयुक्त असते.
  • खोकला, दम्यासारख्या रोगात जेव्हा श्वासाला दुर्गधी येते, तेव्हा तुळशीचा रस मधाबरोबर घेण्याचा चांगला उपयोग होतो.
  • खोकल्यामुळे वा दम्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, छातीत कफ भरून राहिला असल्यास तुळशीची बारीक केलेली पाने सुती कपड्यात बांधून पुरचुडी तयार करावी व ही पुरचुडी ज्येष्ठमधाच्या गरम काढ्यात बुडवून छातीवर, पोटावर व पाठीवर शेक केल्यास कफ सुटायला मदत मिळते व बरे वाटते.
  • कफ असंतुलनामुळे सर्दी, खोकला झाला असता तुळशीचा रस, आल्याचा रस व मध एकत्र करून तयार केलेले चाटण घेतल्यास बरे वाटते.
  • तुळशी उष्ण वीर्याची असल्याने घाम आणण्यास उत्तम असते, त्यामुळे तापात, विशेषत थंडी वाजून येणाऱ्या तापात तुळशी उपयोगी असते. तुळशीच्या काढयात पाय बुडवून व अंगावर ब्लॅकेट घेतले तर घाम येऊन ताप कमी होतो.
  • लहान मुलाना सर्दी, खोकला, उलट्या होत असता तुळशीचा रस व मध हे चाटण थोडे थोडे चाटविण्याचा उपयोग होतो, विशेषत दात येत असताना या प्रकारचा त्रास होत असल्यास सहजपणे येण्यास उपयोग होतो.
  • तुळशी ही उत्तम जंतुघ्न असते त्यामुळे संक्रामक आजारांमध्ये पाणी, हवा वगैरेतून रोगसक्रमण होऊ नये, यासाठी तुळशीचा वापर करता येतो. विशेषत पावसाळ्यात रोगसंक्रमण होऊ नये म्हणून तीन-चार तुळशीची पाने टाकून पाणी उकळून घ्यावे.

अशाप्रकारे तुळशी अनेक औषधी गुणांनी युक्त असते, आरोग्यासाठी जणू वरदान असते. म्हणूनच घरातल्या लाडक्या मुलीबाळीप्रमाणे तुळशीला घराघरात प्रेमाचे आणि हक्काचे स्थान  असावे, असे आपली भारतीय संस्कृती सांगते याचेच प्रतीक म्हणून दरवर्षी श्रीकृष्णावरोबर तुळशीचा विवाह केला जातो.