|

शरीरातील रक्तपेशी वाढविण्यासाठी ‘हे’ उपाय जरूर करा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपले शरीर निरोगी, सुदृढ आणि कार्यक्षम राहण्यासाठी शरीरातील रक्तपेशींचे प्रमाण योग्य आणि संतुलित असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा आजारपणात वा प्रामुख्याने तापात आपल्या शरीरातील रक्त पेशी कमी होऊ लागतात. यामुळे शारीरिक कमकुवतपणा, अंगदुखी तसेच काम करण्याची इच्छा मरणे, शरीरातील त्राण निघून जाणे अश्या समस्या जाणवू लागतात. अनेकदा शरीरातील रक्तपेशी कमी झाल्यास अनेको आजार आपल्या शरीरात घर करून बसतात. त्यामुळे शरीरातील रक्तपेशी कमी होत असल्यास वेळीच त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. आज आपण या समस्येवर घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. खालील उपाय केले असता शरीरातील रक्तपेशींची संख्या वाढण्यास मदत होते.

१) गव्हांकुर – गव्हांकुर हे रक्तपेशी वाढवण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. कारण गव्हांकुरामध्ये फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन्स, झिंक असे पोषक तत्त्व समाविष्ट असतात. यामुळे गव्हांकुर खाल्ल्यास शरीराला पुरेसे पोषण मिळते. परिणामी शरीरातील पेशी कमी झाल्या असतील वा कमकुवत झाल्या असतील तर गव्हांकुराचा रस काढा आणि तो नियमित प्या.

२) लिंबू – लिंबात व्हिटॅमिन सी’चे प्रमाण भरपूर असते आणि व्हिटॅमिन सी हे एक उत्तम अॅंटि ऑक्सिडंट आहे. यामुळे रक्तपेशींची वाढ होण्यास सहाय्य मिळते. म्हणूनच पेशी कमी झालेल्या रूग्णांच्या आहारात लिंबाचा रस समाविष्ट करा.

३) आवळा – आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठीच शरीरातील पेशी कमी झाल्या तर लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यावा. ज्यामुळे हळूहळू प्रतिकारशक्ती वाढते आणि रक्तपेशींमध्ये वाढ होते.

४) भोपळा आणि भोपळ्याच्या बिया – शरीरातील पेशी वेगाने वाढण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ए’ची गरज असते. लाल भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. तसेच भोपळ्याच्या बियांमध्ये इम्यूनोमॉड्यूलेटरी गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील पेशी कमी होतात तेव्हा त्या रूग्णाची रोग प्रतिकारशक्तीदेखील कमी झालेली असते. यावर उत्तम उपाय म्हणून लाल भोपळा ज्यूस, भाजी वा सूप कोणत्याही स्वरूपात खावा. याशिवाय लाल भोपळ्याच्या बियादेखील तितक्याच गुणकारी ठरतात.

५) पपई आणि पपईची पाने – शरीरातील रक्त पेशी कमी झाल्या असतील तर त्या झपाट्याने वाढण्यासाठी पपई आणि पपईची पाने दोन्ही खाणे फायदेशीर आहे. एका संशोधनानुसार, डेंग्यूमुळे जर शरीरातील पेशी कमी झाल्या असतील तर पपई किंवा त्याची पाने खाल्ल्यास त्या झपाट्याने वाढतात. पपईमध्ये असे अनेक केमिकल्स असतात ज्यामुळे शरीरावर चांगला परिणाम होतो. यासाठी अशा रुग्णांनी १/४ किलो पपईची कोवळी पाने चावून खा. पपईची पाने पाण्यात उकळून त्याचा अर्क काढा आणि तो प्या. नियमित पपई खाण्यामुळेदेखील शरीरातील पेशी वाढतात.