रक्तदान; सर्वश्रेष्ठ दान!!! ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा रक्ताचा अनोखा आणि दुर्मिळ प्रकार जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन : कोव्हीड १९ या विषाणूने संपूर्ण जगाला मेटाकुटीला आणले आहे. खाजगी किंवा सरकारी कोणत्याही हॉस्पिटल मध्ये गेले तरी सगळीकडे बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमेडिसिवीर आणि रक्त या गोष्टीचीच चर्चा चालू आहे. आपल्याकडे अशी अनेक मंडळी आहेत जे तीन महिन्यातून एकदा रक्तदान करत असतात. तर काही लोक रक्तदान म्हटले कि पळवाटा काढायला सुरवात करतात. ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान’ असे आधुनिक काळात का म्हटले जाते ते आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या तांबडय़ा रक्तपेशींच्या पृष्ठभागावर काही पदार्थ असतात. त्यांना ‘अँटिजेन’ असे म्हणतात. ज्यांच्याकडे ‘ए’ प्रकारचे अँटीजेन आहेत त्यांचा रक्तगट ‘ए’, ज्यांच्याकडे ‘बी’ प्रकारचे अँटीजेन आहेत ते ‘बी’ रक्तगटाचे, तर दोन्ही ‘अँटीजेन’ असलेली मंडळी ‘एबी’ रक्तगटाची. ज्यांच्याकडे दोन्ही अँटीजेन नाहीत ते साहजिकच ‘ओ’ रक्तगट. पण ही रक्तगटांची केवळ ‘ए-बी-ओ’ प्रणाली झाली. अशा प्रकारे रक्तगटांची विभागणी करणाऱ्या पस्तीसहून अधिक प्रणाली वैद्यकशास्त्राला ज्ञात आहेत.
रक्ताचे प्रमुख गट:
रक्ताचे चार प्रमुख गट आहेत. (ए, बी, एबी आणि ओ) हे गट रक्तात असलेल्या विशिष्ट घटकांप्रमाणे केलेले आहेत. या ए, बी घटकांशिवाय ‘आर-एच’ नावाचा एक घटकही सुमारे 85 टक्के व्यक्तींत असतो. अशा व्यक्तींच्या रक्तगटाला + (पॉझिटिव्ह) म्हणतात. ज्या व्यक्तींत हा घटक नसतो त्याला – (निगेटिव्ह) म्हणतात. मराठीत धन (+) व ऋण (-) असे शब्द वापरता येतील.एखाद्याचे रक्त चालणे किंवा न चालणे म्हणजे काय हे आता समजावून घेऊ या. रक्तात एखादा पदार्थ गेला की त्यावर प्रथिनांच्या कणांचा हल्ला होतो हे आपण शिकलो आहोत. या न्यायाने A गटाच्या व्यक्तीस B गटाचे रक्त दिल्यास B पदार्थावर हल्ला होईल. कारण निसर्गतः A गटाच्या व्यक्तीत B घटक सापडत नाही. सुरुवातीस हे काही प्रमाणात खपून जाते. नंतर मात्र अशी चूक झाल्यास वरीलप्रमाणे मोठा घोटाळा होतो. हे आपण पुढच्या विवेचनात पाहणार आहोत.
म्हणून सर्वसाधारणपणे रक्त द्यायचे झाल्यास त्याच एका गटाचे रक्त चालते. उदा. ए + (पॉझिटिव्ह) व्यक्तीला रक्त द्यायचे असल्यास ए + लागते. B+ve व्यक्तीला B+ve रक्त चालते. दुसरे रक्त दिल्यास रक्तात गाठी होऊन मृत्यू येऊ शकतो. ओ – रक्तात कोठलाच घटक नसतो. त्यामुळे हे रक्त कोणालाही दिले तर चालते.
कोणत्या गटाचे रक्त कोणत्या रक्तगटास चालते हे खालील तत्क्यात स्पष्ट केले आहे.
‘एबी पॉझिटिव्ह’ या व्यक्तीला कोणाचेही रक्त चालते.
पूर्ण रक्त गरज:
शस्त्रक्रिया, रक्तस्राव याप्रसंगी पूर्ण रक्त दिले जाते. मात्र हल्ली पूर्ण रक्त क्वचितच द्यावे लागते. केवळ लाल रक्तपेशी (पॅकड् रेड ब्लड सेल) रक्तपांढरीत रक्त देण्याची गरज असेल तर हे वापरतात. यात द्रवपदार्थ नसतो. तो आधीच वेगळा काढलेला असतो. तो इतर रुग्णांना उपयोगी असतो. केवळ रक्तपेशी दिल्याने हृदयावर जादा दाब येत नाही हा फायदा असतो.
रक्तकणिका (प्लेटलेट)
काही आजारांमध्ये रक्तस्रावाची प्रवृत्ती वाढते. डेंगू ताप, बाळंतपणातला रक्तस्राव, इ. साठी केवळ रक्तकणिका वापरल्या जातात. यामुळे दोन-तीन तासात रक्तस्रावाची प्रवृत्ती दुरुस्त होते. अर्थात यासाठी एक पॅक पुरत नाही, गरजेप्रमाणे जादा द्यावे लागतात.
ताजा रक्तद्रव (प्लाझ्मा)
याची गरज काही विशिष्ट आजारांमध्ये असते. आर-एच गट व गर्भनाश, आर-एच रक्तगटाचे एक विशेष महत्त्व आहे. आई आर एच (-) आणि पिता आर.एच (+ve) असेल तर २०% बाळे ही आईच्या गटाची असतील व ८०% बाळांचा गट हा वडिलांसारखा असेल. आई व बाळाचा गट एक असेल तर बाळाला धोका नसतो. पण जर आई व बाळाचा रक्तगट विरुध्द असतील म्हणजे बाळ आर.एच (+ve) असेल तर पहिल्या बाळंतपणात सूक्ष्म प्रमाणात आई व बाळाचे रक्त एकमेकांत मिसळते. यामुळे आईच्या रक्तात आर एच घटका विरुध्द प्रतिघटके तयार होतात.
पुढच्या बाळंतपणातही जर बाळ विरुध्द गटाचे असेल तर ही प्रतिघटके बाळाला गर्भातच त्रास देतात. हा गर्भ पोटातच मरुन जाण्याची शक्यता असते. पूर्ण वाढ होऊन जन्म झाला तर पहिल्या काही तासांत गंभीर कावीळ होऊ शकते. तसेच बाळाचा रक्तनाश होण्याचाही धोका असतो. म्हणून गर्भारपणात आईचा रक्तगट तपासणे महत्त्वाचे असते. जर आई आर एच (-) असेल तर बाळाच्या जन्मानंतर लगेच बाळाचा रक्तगट तपासणी करतात. जर बाळ आर.एच (+ve) असेल तर पुढील बाळाला त्रास होऊ नये म्हणून पहिल्या 24 तासात आईला ‘ऍन्टी डी’ चे इंजेक्शन द्यावे लागते. हे इंजेक्शन खूपच महाग असते. (सुमारे 1500 ते 1600रु.) व सध्यातरी सरकारी इस्पितळात मिळत नाही. पण जर आईच्या रक्तात आर एच रक्ताविरुध्द प्रतिज्घटके तयार झाली तर प्रत्येक आर.एच (+ve) बाळाला गंभीर धोका होऊ शकतो.
रक्तदान : शस्त्रक्रिया करताना व अपघातग्रस्त व्यक्तीला रक्ताची गरज पडल्यास रक्तपेढीद्वारे निरोगी व्यक्तीचे रक्त उपलब्ध करून देता येते. भारतात अठरा वर्षावरील कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. तसेच एका वेळी एक व्यक्ती २५०–३५० मिली. रक्तदान करू शकते. रक्तदान केल्यानंतर शरीरातील रक्ताचे प्रमाण चोवीस तासात पूर्ववत होते. रक्तदानामुळे शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाहीत. मात्र रक्तदान केले की त्यानंतर तीन महिने रक्तदान करता येत नाही. दुसऱ्या व्यक्तीला ते देण्यापूर्वी रक्ताच्या कावीळ, एच्आय्व्ही व कुष्ठरोग संसर्ग इ. रोगांच्या चाचण्या केल्या जातात. रक्तदानातून प्राप्त झालेले रक्त रक्तपेढीत आठ दिवस साठवून ठेवतात. रक्त निर्जंतुक पिशवीत रक्त साठवून ठेवलेले असते आणि त्यात पोटॅशियम ऑक्झालेटचे द्रावण असते. रक्तातील कॅल्शियमची पोटॅशियम ऑक्झालेटबरोबर क्रिया होऊन त्याचे कॅल्शियम ऑक्झालेट मध्ये रूपांतर होते. रक्तात कॅल्शियमची आयने नसल्याने रक्त गोठत नाही.
बॉम्बे रक्तगट :
‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा शब्द सर्वाना कुठे ना कुठे ऐकायला मिळाला असेल. पण हा वेगळ्याच नावाचा रक्तगट कुठला हे मात्र अनेकांना माहिती नसते. हा रक्तगट प्रयोगशाळेत तपासल्यावर ‘ओ’ रक्तगटासारखाच दिसतो. पण इतर कोणत्याही ‘ओ’ रक्तगटाचे रक्त या रक्तगटाशी जुळत नाही. याचा शोध मुंबईला लागल्यामुळे ‘बाँबे ब्लड ग्रुप’ हे नावही रुढ झाले. या गटाच्या लोकांना बाँबे रक्तगटाचेच रक्त चालू शकते आणि हे लोक जगात फारच कमी संख्येने आढळतात. या रक्तगटाच्या व्यक्तीस जेव्हा प्रत्यक्ष रक्तदानाची गरज भासते तेव्हा त्याला रक्तदाता उपलब्ध होणे महत्वाचे आहे. आपल्या घरात एखाद्याचा रक्तगट ‘बाँबे रक्तगट’ असल्याचे समजले की इतर कुटुंबीयांचे रक्त त्याच रक्तगटाची शक्यता पडताळून पाहण्यासाठी तपासणे गरजेचे. त्या रक्तगटांमध्ये ‘बाँबे’ रक्तगट हा एक दुर्मिळ रक्तगट समजला जातो. १९५२ मध्ये डॉ. वाय्. एम्. भेंडे यांनी बॉम्बे रक्तगटाचा शोध लावला. अंदाजे १०००००० लोकांमागे चार व्यक्ती बॉम्बे रक्तगट असलेली आढळून येते. या रक्तगटाला ‘एच्एच्’ रक्तगट असेही म्हणतात. अर्मेनिया, अझरबैजान, जॉर्जिया, इटाली, इराण, रशिया, टर्की व जपान या देशांतही या रक्तगटाचे लोक आढळून येतात. मानवी रक्तात आढळणारी ए आणि बी प्रतिजने मूळ ‘एच्’ या प्रतिजनापासून तयार होतात. बॉम्बे रक्तगट असलेल्या व्यक्तीमध्ये ‘एच्’ प्रतिजन नसल्याने त्यांच्या शरीरात ‘ए’ किंवा ‘बी’ प्रतिजने तयार होत नाहीत. मात्र त्यांच्या रक्तात ‘एच्’ प्रतिद्रव्ये असतात. ‘एच्’ प्रतिद्रव्ये अन्य कोणत्याही रक्तात नसल्याने त्या व्यक्तीला बॉम्बे रक्तगटाखेरीज अन्य कोणत्याही रक्तगटाचे रक्त देता येत नाही. बॉम्बे रक्तगटाचे रक्त मात्र कोणत्याही व्यक्तीला देता येते.
या रक्तगटाच्या लोकांची एक राष्ट्रीय यादी असणे तर गरजेचे आहेच, पण या लोकांनीही स्वखुशीने त्या यादीत नाव नोंदवायला हवे.