जेवताना अन्न चघळून आणि पाणी सांभाळून प्या; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ
हॅलो आरोग्य ऑनलाईन। कोणत्याही वेळेचे जेवण असो, म्हणजे दुपार वा संध्याकाळ जेवताना खाल्ला जाणारा प्रत्येक घास किमान ३२ वेळा चावला पाहिजे असे घरातले मोठे सांगतात. पण पाणी कसे प्यायचे याविषयी कधी कुणी कोणता नियम तुम्हाला सांगितला आहे का? नाही..? अहो जसं अन्न ३२ वेळा चावून खाणे हा एक जेवणाचा नियम आहे अगदी तसेच काही नियम पाणी पिण्यासाठीदेखील आहेत. जस कि, पाणी पिताना थेट पिऊ नये. थोडा वेळ तोंडात ठेवा आणि मग हळू हळू प्या.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे सगळं कश्यासाठी..? थेट पाणी पिता येतंय ना. तर मित्रांनो हे नियम आम्ही बनविलेले नाहीत तर हे नियम तज्ञांनी केलेल्या अभ्यासात सिद्ध झाले आहेत. तसेच अन्न व्यवस्थित चघळून आणि बारीक बारीक चावून खाल्ले पाहिजे याचे काय फायदे होतात ते देखील आपण जाणून घेणार आहोत.
तज्ञांच्या अभ्यासानुसार, अन्नपचनक्रिया हि तोंडापासून सुरू होते. तर अन्न चघळल्यानंतर तोंडात तयार होणारी लाळ हि अन्नाला मऊ करते आणि शरीराला आवश्यक पोषण सोडण्यास पुरेसा वेळ मिळतो. यात अन्न पचवण्यासाठी, ते शक्य तितकं आतड्याच्या संपर्कात येणं आवश्यक आहे. पाणी पितानाही गटागट एकदम पोटात घेणं चुकीचं आहे. त्यामुळे पाणी पिताना हळूहळू एक एक घोट घ्या. अशा प्रकारे पाणी पिण्याचा शरीराला फायदा होतो.
तसेच आपण खात असलेले अन्न जेव्हढे जास्त चघळले जाईल तेव्हढे ते आतड्यांच्या संपर्कात येईल आणि बारीक होईल. यामुळे अन्न पचवणारे एन्झाइम्स पुरेशा प्रमाणात अन्नात मिसळतील. मुख्य म्हणजे अन्न चघळल्याशिवाय वा कमी चघळून खाल्यामुळे जास्त खाल्ले जाण्याची शक्यता खूप वाढते. तसेच खूप लवकर- लवकर खाल्ल्याने मेंदूला उशीरा पोट भरण्याचे संकेत मिळतात. त्यामुळं अन्न भुकेपेक्षा जास्त खाल्लं जाऊन आपल्या शरीरात जाणाऱ्या कॅलरीजचं प्रमाण वाढतं. याचा परिणाम म्हणजे लठ्ठपणा
० अन्न चघळून खाण्याचे फायदे
- भूक आणि शरीरातील कॅलरीजचं प्रमाण संतुलित राखायचे असेल तर अन्न व्यवस्थित चघळून खाणे आवश्यक आहे. तसेच जेवणानंतर आतड्यात घ्रेलिन नावाचं हार्मोन कमी होतं. हे हार्मोन भूक नियंत्रित करते. यासोबत जेवणानंतर आतडे जे हार्मोन्स सोडतात, त्यामुळे पोट भरल्याची भावना येते. या प्रक्रियेला साधारण २० मिनिटे लागतात.
- अन्न चघळल्याने खाण्याचा वेग कमी होतो आणि शरीरातील कॅलरीजचे प्रमाण कमी होते. याचा परिणाम म्हणजे स्थूलपणा कमी होतो. कारण, शरीराला आवश्यक तेवढ्या कॅलरीज मिळतात.
- जेव्हा अन्न चघळलं जातं, तेव्हा ते लहान तुकड्यांमध्ये बदलते. जे गिळल्यावर घशावर पडणारा ताण कमी होतो.
- अन्न चघळण्यानंतर बारीक झालेले अन्नाचे कण आतड्यांपर्यंत पोहोचतात तेव्हा एन्झाईम्स यात सहज विरघळतात. परिणामी पोषण अधिक तयार होतं आणि शरीरात वेगानं शोषलं जातं. यामुळं कमी अन्न खाऊनही शरीराला अधिक पोषण आणि प्रथिनं मिळतात.
० अन्न आणि पाणी घाईघाईत खा खाऊ नये..?
जेव्हा अन्न योग्य प्रमाणात चघळले जात नाही आणि पाणी वेगाने प्यायले जाते तेव्हा पचनसंस्थेमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. तसेच शरीरात एन्झाईम्स पुरेशा प्रमाणात तयार न झाल्यामुळे पोटफूगी, जुलाब, छातीत जळ-जळ आणि जास्त प्रमाणात ऍसिड तयार होते. याशिवाय पोटदुखी, कुपोषण, अपचन आणि गॅस यांसारख्या समस्या निर्माण होतात.