|

कोरोनाची लाट आणि मुसळधार पाऊस यांचा आरोग्यावर होईल का परिणाम?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात मान्सून दाखल झाला आहे. यामुळे बर्‍याच भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरवर्षी पाऊस आला कि वेगवेगळ्या आजारांची साथ येते जाते. मात्र यावेळी चित्र थोडे वेगळे आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने आधीच लोकांना हैराण केले आहे. त्यात आता पावसाच्या सरी म्हणजे आरोग्यविषयक अनेक चिंता उपस्थित राहणार याची लोकांना चिंता वाटत आहे.

दरम्यान डॉक्टरांच्या मते, पावसाचा कोरोना विषाणूवर परिणाम होतो आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ड्रॉपलेट्सचे खूप मोठे योगदान होते, हे सर्वांनाच ठाऊक आहे. यावर तज्ज्ञ म्हणतात की, हवामानातील आर्द्रतेमुळे कोरोना आणि इतर विषाणूजन्य रोगांचा संसर्ग अत्याधिक होत असतो. तर हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे, विषाणूची वाढ होण्यास मदत होते. अशा परिस्थितीत पावसाळ्याचा निश्चितच कोरोनावर परिणाम होईल. तर जाणून घेऊया काय म्हणतात तज्ज्ञ :-

१) हवेतील आर्द्रतेमुळे संसर्ग वाढ – डेलावेयर विद्यापीठाचे संसर्ग रोग शास्त्रज्ञ जेनिफर होर्ने यांच्या अभ्यासानुसार, पावसाचे पाणी कोणताही वायरस नष्ट करू शकत नाही. शिवाय विषाणूचा प्रसार होण्याची गती देखील कमी होऊ शकत नाही. म्हणजेच काय? तर हात केवळ पाण्याने धुतले म्हणून विषाणू मरणार नाहीत. त्यासाठी आपल्याला हात साबण लावून स्वच्छ करावे लागतील.

२) विषाणूंची तीव्रता वाढते – अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमधील अप्लाईड फिजिक्सचे विशेष तज्ज्ञ शास्त्रज्ञ जेर्ड इव्हान्स म्हणतात की, पावसामुळे कोरोना विषाणूवर काय परिणाम होईल, हे अद्याप तरी कळलेले नाही. तथापि, बहुतेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, पावसातील ओलाव्यामुळे विषाणू अधिक तीव्र होतो.

३ ) संसर्ग धोक्यात वाढ – संसर्ग रोगविषयक तज्ज्ञांचे असे मत आहे की, पावसाचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम नाही. यामुळे विषाणू नष्ट होण्याची शक्यता नाही. मात्र संसर्ग होण्याची शक्यता बळावते कारण पावसामध्ये विविध आजारांच्या साथी बळावतात.

४) विषाणू वाहून जाऊ शकतो – अनेक शास्त्रज्ञांनी जरी संसर्ग वाढेल, विषाणू संपणार नाही असे म्हटले असले तरीही वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य, औषध आणि साथीच्या रोगांचे प्राध्यापक जेई बेटेन यांनी आपले वेगळे मत आणि विचार प्रकट केले आहेत. ते म्हणाले की, पाऊस कोरोना विषाणूला विरघळवून कमकुवत करू शकतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्यामध्ये धूळ विलीन होते आणि वाहून जाते, अगदी तसेच हा विषाणू वाहून जाऊ शकतो.