केसांच्या वाढीसाठी कढीपत्त्याचे हेअर मास्क फायदेशीर; जाणून घ्या कसा कराल वापर
हॅलो आरोग्य ऑनलाईन। केसांच्या समस्या सौंदर्याला धक्का लावतात. ज्यामुळे केसांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. पण आजकालची बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे केसांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मग विविध महागडी सौंदर्य प्रसाधने आणि विविध ब्युटी ट्रीटमेंटचा वापर करून सौंदर्य टिकवण्याचा अतोनात प्रयत्न केला जातो. एव्हढे करूनही जर हाती काहीच येत नसेल तर निराशा उत्पन्न होते. शिवाय वेळ आणि पैसे वाया गेल्याचे दुःख मोठे वाटते. ताण येतो आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. म्हणूनच कोणत्याही समस्येवर आधी घरगुती व आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब करणे कधीही चांगले. आता केसांच्या समस्येसाठी काय करायचे..? तर आम्ही सांगू कि केसांच्या समस्येसाठी कढीपत्त्याचे नैसर्गिक हेअर मास्क वापरा. यामुळे केसांचे आरोग्य राखले जाईल.
कढीपत्ता हा भारतीय स्वयंपाकघरातील एक सामान्य मसाला आहे. जो विशेषतः केसांसाठी अत्यंत प्रभावी आणि उत्तम उपाय मानला जातो. कारण कढीपत्त्यामध्ये बीटा- कॅरोटीन, प्रथिने, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि फॉस्फरसचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यामुळे केसगळती रोखली जाऊन अकाली पांढरे होणाऱ्या केसांचा देखील बचाव होतो. शिवाय केसांच्या आरोग्यासाठी कढीपत्त्याचा वापर आहारात देखील करता येतो. मात्र आज आपण केसांच्या पोषक तत्वांची कमतरता भरुन काढणाऱ्या कढीपत्त्याच्या हेअर मास्कविषयी जाणून घेणार आहोत.
हेअर मास्क १ – कढीपत्ता आणि दही
यासाठी कढीपत्त्याच्या २ काड्यांची पाने धुवून मिक्सरच्या सहाय्याने वाटून घ्या. आता त्यात केसांच्या लांबीनुसार दही मिसळून पुन्हा एकदा व्यवस्थित वाटून घ्या. यानंतर हा मास्क केसांना लावा. साधारण २० ते ३० मिनिटे हा मास्क असाच ठेवा आणि नंतर केस धुवून टाका. आठवड्यातून किमान एकदा या हेअर मास्कचा वापर केल्यास केसांना नैसर्गिक चमक येते. कोंडा दूर होते. केसांची वाढ मजबूत होते.
हेअर मास्क २ – कढीपत्ता आणि कांदा
केसांच्या लांबीनुसार कढीपत्त्याची पाने आणि कांद्याचे माप घेऊन त्याची एकत्र पेस्ट करुन घ्या. आता तयार पेस्ट हेअर मास्कप्रमाणे केसांना लावा. साधारण अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुऊन टाका. आठवड्यातून २ वेळा या हेअर मास्कचा वापर केल्यास केस मुलायम होतील. कोंडा दूर होईल आणि अकाली पांढरे झालेले केस काळे होतील. शिवाय केस मजबूत होतील.
याशिवाय केसांच्या निरोगी आरोग्यासाठी तुम्ही कढीपत्त्याचे तेल वापरू शकता. यासाठी नारळाचे तेल गरम करुन त्यात कढीपत्त्याची पाने टाकून गॅस बंद करा. यानंतर तेलात मेथी दाणे, जास्वंदाच्या पाकळ्या आणि १ चमचा अळीव घालून हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी वस्त्रगाळ करून हे तेल काचेच्या बाटलीत भरून ठेवा. आठवड्यातून दोनदा हे तेल केसांना लावल्यास अगदी १५ दिवसात केसांच्या वाढीत झालेला फरक जाणवतो.