पोळलेल्या तोंडासाठी करा घरगुती उपचार; जाणून घ्या
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांना जेवण असो वा चहा दोन्ही कसं गरमागरम पाहिजे असतं. मग भले तोंड भाजुदे. तर अनेकांना असे गरम पदार्थ घाईघाईत खाल्ल्याने किंवा प्यायल्याने लागणारा चटका सहन होत नाही. खरंतर असे गरम पदार्थ घाईने खा किंवा आवडीने प्या त्रास हा अगदी सेमच असतो. यामुळे एकतर जीभ दुखावते शिवाय टाळू भाजतो. एकदा का अश्या पद्धतीने तोंड पोळले कि मग काहीही खाणं कठीण होतं. अगदी बोलतानाही अवघड होऊन जातं. याचं कारण म्हणजे तोंडातील त्वचेचे टिश्यूज फार नाजूक असतात. परिणामी गरम खाद्य पदार्थांमुळे तोंड पोळले जाते. यासाठीच घरगुती उपायांचा बराच फायदा होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तोंड पोळल्यास त्यावर करावयाचे घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यांच्या सहाय्याने तोंड भाजल्यास होणारी जखम लवकर भरते आणि आराम मिळतो. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-
१) थंड पाणी प्या – गरम पदार्थ खाल्ल्यामुळे तोंड पोळले असेल तर सर्वात आधी थंडगार पाणी प्या किंवा तोंडात बर्फ ठेवा. अगदी १० मिनीटे थंड पाण्याचा तोंडाला शेक मिळाला की भाजलेल्या भागाला थंडावा मिळतो. यामुळे लगेच जळजळ थांबते आणि आराम मिळतो.
२) तोंडाने श्वास घ्या – जेव्हा आपण तोंडाने श्वास घेतो तेव्हा तोंडात थंड वाऱ्यामुळे गारवा निर्माण होतो. म्हणून तोंड भाजले तर तोंडात असा थंडावा निर्माण करण्यासाठी थोडावेळ तोंडाने श्वास घ्या.
३) मधाचे चाटण लावा – तोंड भाजले तर मधाचे चाटण लावून आराम मिळवता येतो. कारण मधासारख्या गोड, पातळ आणि औषधी पदार्थांमुळे जीभ आणि टाळूवर एक आवरण निर्माण होते. यात मधामधील अॅंटि मायक्रोबायल घटकांमुळे तोंडामधील जखम बरी होणे सोपे जाते.
४) दही खा – दह्याचा गुणधर्म हा अँटी मायक्रोबायल आणि थंड आहे. यामुळे गरम खाल्ल्याने तोंड पोळले असेल तर थंड दही खाणे फायदेशीर आहे. यामुळे जखम बारी होण्यास सहाय्य मिळते.
५) दूध प्या – भाजलेले तोंड बरे करण्यासाठी थंड दूध प्या. ज्यामुळे तोंडाचा दाह कमी होण्यास मदत होईल. तसेच तोंडात होणारी जळजळ कमी झाल्यामुळे आराम मिळेल. शिवाय दुधामुळे तोंडात ओलसरपणा निर्माण होईल आणि जखम लाळेने लवकर बरी होईल.
६) पुदिनाच्या गोळ्या तोंडात ठेवा – पुदिना अॅंटि बॅक्टेरिअल आणि थंड असतो. यामुळे पुदिन्याच्या गोळ्या तोंडात ठेवल्याने फायदा होतो. शिवाय तोंडात इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो. जर तुमच्याकडे पुदिनाच्या गोळ्या नसतील तर पुदिनायुवर टुथपेस्ट तोंडाला लावू शकता.
७) व्हिटॅमिन ई तेलाने मसाज करा – तोंड भाजल्यावर व्हिटॅमिन ईची गोळी फोडून त्यातील तेल तोंडाला लावा आणि हलक्या हाताने टाळूवर मसाज करा. यामुळे तोंडातील त्वचेच्या टिश्यू लवकर बऱ्या होतील आणि तुम्हाला आराम मिळेल.
८) उष्ण व जाळ निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळा – तोंड भाजल्यावर गरम पदार्थ, मीठाचे, तिखट, कुरकुरीत पदार्थ, मद्यपान, तंबाखू, दालचिनीयुक्त पदार्थ, टोमॅटो वा संत्री अशी आंबट फळे मुळीच खाऊ नका. यामुळे त्रास कमी होणार नाही तर जास्त वाढेल. याऐवजी आठवडाभर थंड आणि जलयुक्त आहार घ्या.