आपणांस माहित आहे का, सायनस’ म्हणजे काय? आणि त्यावरील ‘हे’ प्रभावी उपचार
हॅलो आरोग्य ऑनलाईन : सायनसमध्ये वाजवीपेक्षा अधिक पातळ पाणी बनू लागले आणि ते नाकावाटे वाहू शकत नसल्यामुळे सायनसमध्येच साठून राहिले तर तिथे जिवाणूसंसर्ग होण्याची शक्यता असते. अशा रुग्णांना नाकात घट्ट आणि पिवळ्या रंगाचा शेंबूड येत असतो. काही जण याला ‘सर्दी पिकली’ असेही म्हणतात! ही पिवळी सर्दी खूप दिवस टिकते. सायनसचा त्रास म्हणतात तो हाच. चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या हवेच्या पोकळ्या. ही सायनसेस दोन्ही डोळ्यांच्या खालच्या बाजूस, डोळ्यांच्या वर कपाळामध्ये, दोन डोळ्यांच्या मधल्या बाजूस आणि नाकाच्या मागे असतात. सायनसमध्ये हवा राहात असल्यामुळे चेहऱ्याला हलकेपणा देणे हेच त्यांचे प्रमुख काम आहे. हे काम करतानाच सायनसेस सतत एक प्रकारचा पातळ स्राव ‘म्यूकस’ तयार करत असतात. प्रत्येक सायनसचे लहानसे दरवाजे नाकाच्या आत उघडणारे असतात. त्याद्वारे सायनसने तयार केलेला पातळ म्यूकस आधी नाकात उतरतो आणि पुढे नाकावाटे घशात उतरतो. ही क्रिया आपल्या प्रत्येकाच्या नकळत सातत्याने घडत असते. काही कारणाने सायनसमध्ये तयार होणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढले तर तो स्राव नाकातून घशात जाऊ शकत नाही आणि नाकावाटे वाहायला लागतो. यालाच आपण सर्दी म्हणतो.
सायनसचा त्रास कसा होतो?
नाकाच्या पडद्याला सेप्टम म्हणतात. तो एका बाजूला थोडा वाकलेलाच असतो. अगदी सरळ असा कोणाचाच नसतो. दोन नाकपुड्यांना वेगळं करणारा हा पडदा उपास्थी (कार्टिलेज) आणि हाडांनी बनलेला असतो. आणि सगळ्याच व्यक्तींमध्ये या पडद्यात बाक असतो. त्याचा त्रास होत असेल तर लक्ष द्यायला हवं. एरवी नुसता बाक असणं, हे काळजीचं कारण नाही. या पडद्याला बाक दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे एकाच नाकपुडीत जास्त बाक, हा इंग्रजी ‘सी’ या मुळाक्षरासारखा असतो. दुसरा म्हणजे दोन्ही नाकपुड्यांमध्ये आसणारा बाक हा इंग्रजी ‘एस’ या मुळाक्षरासारखा असतो. असा वाक जन्मतःच असू शकतो किंवा नाकाला अथवा चेहऱ्याला मार बसल्यास पडद्याला वाक येतो. नाकाला जास्त वाक असेल तर ज्या बाजूला नाक वाकलंय तिकडे श्वास घेताना अडथळा येतो. नीट श्वास घेता येत नाही. या अडथळ्यामुळे नाकाच्या त्या बाजूला असलेल्या सायनसमध्ये संसर्ग होतो. घोरणं सुरू होतं. नाकातून रक्त येतं. कानाच्या समस्याही निर्माण होतात. कानाचा पडदा आत ओढला जाऊ शकतो, कानात पाणी होऊ शकतं, तात्पुरता बहिरेपणा येऊ शकतो.
(अक्यूट सायन्यूसायटिसची) सायनसच्या त्रासाची लक्षणे-
- सर्दी.
- चेहऱ्यावर जडपणा येणे.
- चेहरा आणि गाल सुजल्यासारखे दिसणे.
- पुढच्या बाजूस किंवा खाली वाकल्यावर डोके आणि गाल दुखणे.
- वरच्या दातांमध्ये ठणका लागणे.
- 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ जो सायनसचा त्रास राहतो त्याला वैद्यकीय भाषेत ‘क्रोनिक सायन्यूसायटिस’ असे म्हणतात. यात सकाळी उठल्यावर नाक श्िंाकरले की घट्ट पिवळा शेंबूड येतो, सतत चेहऱ्यावर जडपणा राहतो, ताजेतवाने वाटत नाही, नाक बंद झाल्यासारखे वाटते, रात्री झोपतानाही नाक जड आणि बंद होते.
- ज्या सायनसच्या त्रासात वारंवार आणि खूप दिवस टिकणारी सर्दी होते, त्याला ‘रीकरंट सायन्यूसायटिस’ म्हणतात. ही सर्दी २-३ महिन्यांनी पुन:पुन्हा होते आणि एकदा सर्दी झाली की ती ८ ते १२ दिवस राहते. या सर्दीची लक्षणेही ‘अक्यूट सायन्यूसायटिस’सारखीच असतात.
उपाय काय?
- एरवी आपण सर्दी साठून राहू नये आणि ती नाकावाटे वाहती व्हावी यासाठी जे घरगुती उपाय करतो, तेच सायनसचा त्रास कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतात. यात वाफ घेणे, गरम पाण्यात भिजवून पिळून काढलेल्या टॉवेलने चेहरा शेकणे याचा समावेश होतो.
- वाफ घेण्याच्या पाण्यात काही जण निलगिरीचे तेल किंवा नाकाला लावण्याचा बाम घालतात. त्यामुळे नाक मोकळे झाल्यासारखे वाटते.
- सर्दीत पिवळा शेंबूड येणे हे जिवाणूसंसर्गाचे निदर्शक असते. अशा वेळी प्रतिजैविकांसह सर्दी पातळ करणारी औषधे दिली जातात. सायनसच्या त्रासात नाकात सूज येऊन आतील सायनसची दारे लहान होतात. ही सूज कमी करून सायनसेस मोकळी होण्यासाठीही औषधे दिली जातात.
- ज्यांना पुन:पुन्हा आणि खूप दिवस टिकणारा सायनसचा त्रास होतो, त्यांनी सर्दी न होण्यासाठी प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि नाक मोकळे राहण्यासाठी प्राणायाम करण्यासारखे उपाय करता येतील. ‘जलनेती’ (नेझल वॉश) ही आयुर्वेदात सांगितलेली क्रियादेखील सायनसच्या त्रासात उपयुक्त ठरते. यात औषधयुक्त पाणी नाकावाटे आत घेतले जाते आणि सायनसेसना धुऊन हे पाणी पुन्हा बाहेर पडते. मात्र ही क्रिया रीतसर शिकून घेऊन मगच करावी.
- काही व्यक्तींच्या नाकाची आंतररचना मुळातच काहीशी अडचणीची असते. नाकाच्या आत नाकाचे दोन भाग करणारा पडदा असतो. नाकाचे हाड वाढले तर काही जणांच्या बाबतीत हा पडदा कुठल्यातरी बाजूस झुकलेला असतो. त्यामुळे सायनसेसच्या तोंडावर या पडद्याचा दाब पडू लागतो. तसेच नाकाच्या आत उघडणारे सायनसचे तोंड मुळातच लहानही असू शकते. या कारणांमुळे सर्दी आत साठून राहते. असे झाल्यास शस्त्रक्रियेचा पर्याय अवलंबला जाऊ शकतो.
केवळ डोके दुखणे म्हणजे सायनसचा त्रास नव्हे
सारखे डोके दुखले तरी काही जण आपल्याला सायनसचा त्रास असल्याचे सांगतात. हे खरे नाही. डोके दुखण्याचे कारण कोणतेही असू शकते. त्यामुळे प्रत्येक डोकेदुखी हा सायनसचा त्रास नव्हे. विषाणूजन्य सर्दी होते, तेव्हा ताप येतो, नाकात जळजळ होऊन शिंका येतात, नाकातून पातळ पांढरे पाणी वाहते आणि नाक बंद होते. तर काहींना अॅलर्जीच्या त्रासामुळे शिंका येणे, नाकातून पाणी येणे असे त्रास होतात. अशी सर्दी सायनसच्या त्रासामुळे झालेली नसते. उलट काही जणांना सकाळी उठल्यावर नाक शिंकरले की घट्ट पिवळा शेंबूड येणे ही बाब अगदी सामान्य वाटते. प्रत्यक्षात या लोकांना सायनसचा त्रास असतो आणि ते वर्षांनुवर्षे तो सहन करत असतात.
सायनसच्या सुरुवातीच्या लक्षणांवर काही घरगुती उपचारांचा अवलंब केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊया हे कोणते घरगुती उपाय आहेत –
वाफ घेतल्यास सायनस पासून आराम मिळेल
सायनसचा त्रास होत असताना वाफ घेतली पाहिजे याने सूज दूर होईल. याशिवाय पाण्यात मीठ आणि थोडीशी बेकिंग पावडर घालून वास घेतल्याने चोकएप झालेलं नाक मोकळं व्हायला मदत होईल.
सायनसमध्ये आल्याचा वापर फायदा देईल
आलं निसर्गताहाच खूप गरम आहे, म्हणून सायनसमध्ये त्याचा वापर ते खूप फायदेशीर ठरतो. आलं कफ दूर करण्यातही मदत करते. सायनसची समस्या उद्भवल्यास दिवसभर आल्याचा रस आणि मध समान प्रमाणात मिसळा आणि चाटण बनवून याचे सेवन करा. यामुळे खोकला आणि कफ बरा होतो.
तुळस सायनससाठी आहे गुणकारी औषध
तुळशीत अनेक जीवाणू विरोधी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत, म्हणून तुळशीचे सेवन केल्यास समस्या सुटू शकतात. सायनसमध्ये दररोज तुळशीची 4-5 पाने खाल्यास आराम मिळतो किंवा आपण तुळशी चा एक काढा बनवून घेऊ शकता. या काढ्यात तुळस, काळी मिरी, आले, लवंगा इत्यादी मिसळावे आणि निम्मे होईपर्यंत उकळवावे. आता त्यात मध मिसळून थोडेसे प्यावे.
सायनसवर लसूण प्रभावी
लसूण शरीरास उष्णता प्रदान करते. लसणाच्या वापरामुळे कफच्या समस्या दूर होतात. लसणाच्या 2-3 कळ्या नियमितपणे खाल्ल्यास आराम मिळेल.
या गोष्टी लक्षात ठेवा व खबरदारी घ्या
सायनस असताना काही प्रमाणात सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे. यावेळी, फक्त कोमट पाणी प्यावे. थंड पाण्याच्या वापरामुळे ही समस्या आणखी वाढू शकते. सायनसचा त्रास असलेल्या लोकांनी पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.सायनसच्या समस्येमध्ये प्राणायाम केल्याने आराम मिळतो. प्राणायाम केल्याने सायनसची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त, फुफ्फुसंदेखील मजबूत होतात.
वरील उपाय हे घरगुती प्राथमिक स्वरूपातील आहेत. यापेक्षा अधिक त्रास होत असेल तर मात्र तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून पुढील उपचार केलेले उत्तमच !!!