फिटनेस | आहार | बातम्या | लाईफ स्टाईल
मस्त आरोग्यासाठी सुस्थपणा सोडा आणि जेवणानंतर न विसरता चाला; जाणून घ्या फायदे
हॅलो आरोग्य ऑनलाईन। संपूर्ण दिवसातील दगदग, कामाचा ताण हा साहजिकच घरी आल्यानंतर डोक्यावर असतो. यामुळे अनेकांना घरी आल्यानंतर भूक तहान असं काही सुचत नाही. असं वाटत थेट अंथरुणात जाऊन पडाव. याच कारण म्हणजे संपूर्ण दिवसाच्या ताणामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही थकून जातात. यामुळे शरीरातील सुस्ती वाढते. परिणामी जेवणानंतर लगेच झोप येते आणि आपण झोपी जातो. पण यामुळे शरीरातील जडपणा कायम राहतो आणि खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही. मग यासाठी काय करालं..? तर नेहमी रात्री जेवल्यानंतर चालत जा. कारण चालल्यामुळे शांत आणि गाढ झोप लागते. शिवाय जेवण देखील व्यवस्थित पचते. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यावर येणारी सुस्ती घालवून शांत आणि गाढ आरामदायी झोप घ्यायची असेल तर दिवसभराच्या कामाचा थकवा दूर करा. यासाठी जेवून झाल्यानंतर न विसरता चाला. जाणून घ्या फायदे:-
१. प्रतिकारशक्ती वाढते - जेवल्यानंतर आपले शरीर खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया करू लागते. दरम्यान शरीराची थोडी हालचाल केल्यास अन्नाचे व्यवस्थित पचन होते. अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले की शरीराच्या सर्व भागात त्याचे पोषक घटक पोचतात. परिणामी प्रतिकारशक्ती चांगली राहते.
२. चयापचय व्यवस्थित होते - जेवणानंतर ठराविक प्रमाणात चालल्यामुळे खाल्लेल्य़ा अन्नाचे चांगले पचन होते. परिणामी शरीरातील गॅसेस ढेकरच्या माध्यमातून बाहेर पडतात. यामुळे अॅसि़डीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी त्रास देत नाहीत.
३. जेवणानंतर पुन्हा खावेसे वाटत नाही - अनेकांना जेवल्यानंतर पुन्हा खायची सवय असते. यामुळे पोट भरलेले असेल तरीही आपण नको तेव्हढे खातो. याचे कारण म्हणजे आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचलेले नसते. पण जेवण झाल्यावर चालल्याने खाल्लेले अन्न पचते आणि पुन्हा काहीही खाण्याची इच्छा होत नाही.
४. ताण तणाव कमी होतो - काम असो वा चिंता याचा ताण आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करतो. पण चालल्याने हा ताण बऱ्याच अंशी कमी होतो. याचे कारण म्हणजे चालल्यामुळे शरीरात एंडोर्फिनची निर्मिती होते आणि आपल्याला नकळत फ्रेश वाटू लागते.
५. शांत झोप लागते - जेवणानंतर लगेच झोपल्याने आपण सुस्त झोप घेतो. यामुळे शरीरातील मेद वाढतात. परिणामी वजन वाढणे, रक्तदाबाच्या समस्या आणि ब्लड शुगरचा त्रास होतो. शिवाय पोट जड असल्यामुळे झोप नीट लागत नाही. मात्र चालल्यामुळे जेवण व्यवस्थित पचते आणि पोट हलके होते. परिणामी शांत आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.