शौचालयात जास्त वेळ बसू नका; जाणून घ्या कारण
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोकांना सकाळी झोपेतून उठल्या उठल्या शौच करण्याची सवय असते. तर अनेकांना शौचालयात बसून बराच वेळ मोबाईल किंवा वर्तमानपत्र वाचण्याची सवय असते. इतकेच काय अनेकांना तर शौचालयातच चहा आणि कॉफी पिण्याचीही सवय असते. या सगळ्या सवयी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत वाईट प्रभाव टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे या बहुतेक लोकांच्या श्रेणीत तुम्हीही येत असाल तर आताच सावध व्हा! कारण ही सवय कुणाच्याही आरोग्यासाठी हानिकारकच आहे. याबाबत तज्ञांनी मुद्देसूद कारण स्पष्ट केले आहे. जाणून घेऊया तज्ञ काय सांगतात..? खालीलप्रमाणे:-
ब्रिटनमध्ये तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, ‘शौचालयात १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालविणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या सवयीमुळे मूळव्याधीची समस्या होऊ शकते. याबाबत सविस्तर सांगताना तज्ञांनी सांगितले कि, गुरुत्वाकर्षण हा मित्र असू शकत नाही. कारण हे नेहमी गोष्टी स्वतःकडे खेचते. त्यामुळे जेव्हा व्यक्ती टॉयलेट सीटवर बसते तेव्हा रक्ताचा प्रवाह गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने अर्थात खालच्या दिशेने होतो. परिणामी रक्तवाहिन्यांवर दाब पडल्यामुळे रक्तस्त्राव म्हणजेच मूळव्याध होण्याचा धोका निर्माण होतो.
अशा प्रकारच्या तणावामुळे रक्तवाहिन्या फुगतात. त्यामुळे मग टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसल्याने रक्तप्रवाह खालच्या दिशेने वाढतो. परिणामी गुदाशयावरील नसांवर अनावश्यक दबाव पडल्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. यालाच मूळव्याध म्हणतात. त्यामुळे टॉयलेटमध्ये १० मिनिटांपेक्षा अधिक काळ बसू नये.
याशिवाय टॉयलेट सीटवर बसून राहणे आणखी एका कारणामुळे आरोग्याचे नुकसान करू शकते. टॉयलेट करतेवेळी आपण त्याच सीटवर बराचवेळ बसून राहिल्यास आपल्या गुदद्वारावर बॅक्टरीया हल्ला करू शकतात. यामुळे अन्य हायजिन विषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
तसेच बराचवेळ एकाच स्थितीत बसून राहिल्यामुळे पायांच्या स्नायूंवर ताण निर्माण होतो. परिणामी पाय सुन्न होणे. पायाला मुंग्या येणे अशा समस्याही जाणवतात. यामुळे वाताची समस्या देखील होऊ शकते.